मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

साहित्याची निर्मितीप्रक्रिया आणि आस्वादप्रक्रिया


साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेत निर्मात्याची प्रतिभाशक्ती कार्यकर असते असं पौर्वात्य साहित्यशास्त्रकारांनी म्हटले आहे. पाश्चात्य साहित्यशास्त्रात प्रतीभेसाठीच कल्पनाशक्ती हि संकल्पना वापरली आहे. मात्र कल्पना हि संज्ञा विविध अर्थानी वापरली जात असल्याने साहित्याच्या संदर्भात कल्पना आणि कल्पनाशक्ती यांचा नेमका अर्थ काय असा संभ्रम निर्माण होतो. कलेच्या क्षेत्रात या संज्ञांना असाधारण प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. येथे कल्पनाशक्ती हि संज्ञा प्रतिभा, वा नवनिर्मितीकारक शक्ती या अर्थाने वापरली जाते. काहीवेळा कलेच्या संदर्भात वास्तवापेक्षा वेगळे, काल्पनिक शक्ती या अर्थाने कल्पनाशक्तीचा निर्देश केला जातो. शब्द, रचना, आशय या संदर्भातील योजकता युक्ती या अर्थानेही हि संज्ञा वापरली जाते. येथे अलौकिक विश्व निर्माण करणारी, नवनिर्माण करणारी शक्ती हा अर्थ प्रधान असतो. कलेच्या क्षेत्रात कल्पनाशक्तीचा व्यवहार कसा चालतो याबाबत तत्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कलावंत आदी अनेकांनी विवेचन केले आहे. यांचा परामर्श पुढीलप्रमाणे घेता येईल.
·         संस्कृत साहित्य परंपरेतील प्रतिभाशक्तीचे विवेचन:
काव्यनिर्मितीची कारणमीमांसा करताना मम्मटाने कवीनिर्मित विश्व आणि ब्रह्मनिर्मित विश्व यांची तुलना केली आहे. त्याच्यामते कवीनिर्मित विश्व हे अनन्यपरतंत्र, नियतीकृतनियमविरहीत आणि आनंददायक असते. त्याच्यामते प्रतीभा हि काव्यनिर्मितीसाठी आवश्यक असून तिच्याशिवाय झालेली काव्यनिर्मिती हि उपहासात्मक ठरते. तर वामनाने लोकवृत्त, शब्द आणि स्मृती या काव्यांगांचा निर्देश करून काव्यनिर्मितीसाठी काव्यपरिचय, अभ्यास, आणि प्रतिभेचा निर्देश केला आहे. तसेच राजशेखराने शक्ती आणि प्रतिभा असा भेद करून प्रतिभेला गौण स्थान दिले असले तरी वस्तुतः हा संज्ञायोजनेचा प्रश्न आहे.
प्रतिभा म्हणजे काय याचे विवेचन करताना काही साहित्यमीमांसकांनी काही संकल्पना मांडल्या आहेत. दंडीने प्रतिभेचे स्वरूप स्पष्ट करताना ती ‘नैसर्गिकी’ आणि ‘पूर्ववासनागुणानुबंधी’ असते असे म्हटले आहे. मात्र त्याच्यामते व्युत्पन्नता आणि अभ्यास यांनीही प्रतिभा साध्य करता येते. तर वामनानेही प्रतिभेस जन्मान्तरागतसंस्कारविशेषः म्हटले आहे. रुद्रटाने प्रतिभेचे सहज आणि उत्पाद्य असे प्रकार सांगितले आहेत. त्याच्यामते शास्राभ्यास आणि मणिमंत्रादी योगाने उत्पाद्य प्रतिभा साध्य करता येते. रुद्रटाला अनुसरून हेमचंद्रानेही प्रतिभेचे सहजी आणि औपाधिकी असे दोन प्रकार सांगितले आहेत. तर भट्ट तौताने प्रतिभेच्या स्वरूपाविषयी दर्शना आणि वर्णना अशा संकल्पना मांडल्या आहेत. दर्शन म्हणजे विविध वस्तूंच्या धर्माच्या तत्वांचे ज्ञान, हे ज्ञान असणाऱ्याला ऋषी म्हणत. मात्र भट्ट तौताच्या मते कवीकडे केवळ दर्शनाच नव्हे तर त्याच्या वर्णनाचीही शक्ती असते. म्हणूनच तो प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता अशी व्याख्या करतो. अभिनवगुप्तानेही प्रतिभेचे अलौकिकत्व मान्य करत तिला ‘अपूर्ववस्तूनिर्माणक्षम प्रज्ञा’ असे म्हणतो.
मात्र संस्कृतसाहित्यमीमांसकानी प्रतिभेच्या सोबतच काही इतर गुणांचीही आवश्यकता सांगितली आहे. भामहाने शब्दार्थांचे पक्के ज्ञान, इतरांच्या काव्याचे अवलोकन आणि अन्य काही विषयांचे ज्ञान, दंडीने व्युत्पन्नता आणि अभ्यास या गुणांना महत्त्व दिले. मम्मटाने शक्ती, निपुणता आणि अभ्यास यांचा काव्यकारण म्हणून एकत्रित विचार केला आहे. तर अभिनवगुप्ताने कवीबरोबरच आस्वादकाकडेही प्रतिभा असणे आवश्यक मानले आहे. रसिकाकडे असणाऱ्या प्रतिभेत प्रतिभेची विशदता आणि वैदग्ध हे गुण असले तरच कवीरसिक हृदयसंवाद शक्य होतो असे तो म्हणतो. कवीकडे असणाऱ्या प्रतिभेला कारक प्रतिभा तर रसिकाकडे असणाऱ्या प्रतिभेला भावक प्रतिभा असे म्हणतात. मम्मटानेही रसास्वादाकरिता रसिकाकडे प्रतिभा असावी असे म्हटले आहे. अशा रसिकांसाठी त्यांनी प्रतिभाजुष असा शब्द वापरला आहे.
सारांश संस्कृत साहित्यमीमांसकांनी प्रतिभेचा विचार केवळ काव्यनिर्मितीच्याच नव्हे तर काव्यानुभवाच्या अंगानेही केला आहे.
·         पाश्चात्य साहित्यपरंपरेतील कल्पनाशक्तीचे विवेचन:
पाश्चात्य साहित्यपरंपरेत प्लेटोपासून आधुनिक काळापर्यंत कल्पनाशक्तीसंबंधी वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. प्लेटोच्या मते काव्यनिर्मिती आणि काव्यानुभव हे दैवी प्रेरणेने निर्माण होतात. या दैवी प्रेरणेला प्लेटो प्रतिभा म्हणतो. एरीस्टोटलच्या अनुकृतीवादी सिद्धांतात कल्पनाशक्तीला फारसे स्थान मिळालेले दिसत नाही. मध्ययुगात कल्पनाशक्ती विरुद्ध विवेकबुद्धी असे द्वंद्व पाहायला मिळते. या काळात कल्पनाशक्तीला गौणत्व मिळाले. मात्र स्वायत्ततावाद्यांच्या काळात पुन्हा कल्पनाशक्तीवर विचार होऊ लागला. याबाबत कांट आणि कोलरीजने केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. त्यांनी कवीच्या बाजूने विवेचन केले आहे.
कलावंतातील नैसर्गिक सर्जनशिलतेला कांट प्रतिभा म्हणतो. त्याच्या मते प्रतिभा किंवा कल्पनाशक्ती म्हणजे माणसाच्या मनातील निसर्ग आहे. प्रतीभेद्वारे निसर्गच उत्स्फूर्तपणे ललितकलेत नियमितता निर्माण करतो.
मात्र या नियमिततेत निश्चित नियम नसतात. स्वायत्त सौंदर्यात, ललित कलेत अशी नियमरहित नियमितता महत्वाची असते. त्याच्यामते माणूस प्रयत्नाने, शिक्षणाने प्रतिभावंत होऊ शकत नाही. तो प्रतिभावंत म्हणून जन्माला यावा लागतो. तंत्र, कसब, कौशल्य म्हणजे प्रतिभा नव्हे. त्याने प्रतिभेचे कार्य कसे चालते याविषयीही विवेचन केले आहे. त्याच्यामते निश्चित संकल्पनेचा अविष्कार साधणे हे प्रतिभेचे उद्दिष्ठ नव्हे तर कल्पनाशक्तीला याहून अधिक स्वातंत्र्य असते. ती वास्तवातून सामग्री घेऊन प्रतिसृष्टी निर्माण करते.
तर एस. टी. कोलरीजने प्रथम श्रेणी आणि दुसऱ्या श्रेणी अशी कल्पनाशक्तीची विभागणी केली आहे. त्याच्यामते प्रथम श्रेणीची कल्पनाशक्ती ही बोधना घडविणारी जिवंत शक्ती व यंत्रणा आहे. आपल्या सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य ज्ञानात हि कल्पनाशक्ती असते. बोधना घडवण्याचे कार्य ती अजाणतेपणाने, नकळतपणे करत असते. आपला सर्व ज्ञानव्यापार व बोधनेचा व्यापार या कल्पनाशक्तीमुळे चाललेला असतो.
तर द्वितीय श्रेणीची कल्पनाशक्ती ही प्रथम श्रेणीच्या कल्पनाशक्तीचा प्रतिध्वनी असते. ती बुद्धिनिष्ठ इच्छाशक्तीच्या बरोबर असते. हि निर्माणक्षम असून जाणीवपूर्वक काम करते. प्रथम श्रेणीच्या कल्पनाशक्तीने दिलेल्या सामग्रीचे विघटन करते. जिथे हे शक्य नसेल तेव्हा ती जडाच्या विविधतापूर्ण सामग्रीला अधिकाधिक एकात्म बनवून पुनर्निर्मिती करते. कोलरीजच्या दृष्टीने कल्पनाशक्ती हि अनेकतेत एकता आणणारी संश्लेषक शक्ती आहे.
कोलरीजने चमत्कृतीशक्ती ही आणखी एक शक्ती मानली आहे. हि शक्ती जड, निर्जीव आणि पूर्वनिश्चित अशा सामग्रीची मोडतोड न करता केवळ खेळ करते. येथील एकत्रीकरणाची प्रक्रियाहि जड असते. त्यामुळे चमत्कृतीशक्ती म्हणजे देशकालादी बंधनांपासून मुक्त झालेली स्मरणशक्ती असे कोलरीज म्हणतो. त्याच्यामते कल्पनाशक्ती हि वेडाप्रमाणे तर चमत्कृतीशक्ती हि वाताप्रमाणे काम करते. यासोबतच त्याने अभ्यास आणि परिश्रमाला महत्त्व दिले आहे.
काव्यनिर्मिती हि मानसिक स्वरुपाची घटना असून एका मर्यादेनंतर स्वतः कवींनाही आपल्या निर्मितीमागील शक्ती आणि प्रेरणा स्पष्ट करता येत नाहीत. आधुनिक काळात मनोविज्ञानाने या गूढ प्रेरक शक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सिग्मंड फ्राईड आणि फ्राईडवादी मनोविश्लेषणशास्त्रज्ञांनी काव्य आणि स्वप्न यांच्या तुलनेच्या आधारे काव्यनिर्मितीवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्यामते चांगले काव्य हे स्वप्नांप्रमाणे गुंतागुंतीचे, अतार्किक आणि प्रतीकात्मक स्वरूपाचे असते. स्वप्नांप्रमाणेच काव्याची मुळेची अबोध आणि बोधपूर्व मनात असतात. काव्यातील प्रतिमा, प्रतीके, एकूणच आशय वा रुपविषय आदींचे स्वरूप विशिष्ठ प्रकारचे का आहे याचा उलगडा अबोध मनातील प्रक्रियांचे स्वरूप कळल्यावर होते. स्वप्नांप्रमाणेच काव्यानेही इच्छापूर्ती होते. या भूमिकेतील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे यात स्वप्नातील आणि काव्यातील कल्पनाशक्ती असा भेद केला जात नाही. अतिवास्तवतावाद्यांनी नेमकी अशीच भूमिका घेतली आहे. त्यांनी स्वप्नांचे सार्वभौमत्व मान्य करून अनियंत्रित कल्पनाशक्तीचा पुरस्कार केला. मात्र फ्राईडवाद्यांनी कला जी जाणीवेच्या पातळीवरील गोष्ट मानली तर अतिवास्तवतावाद्यांनी तिला नेणिवेच्या पातळीवर नेऊन ठेवले. त्यामुळे आपल्या मनाला मोकाट सोडणे हेच कल्पनाशक्तीचे स्वरूप ठरले.
फ्राईडवाद्यांनी कल्पनाशक्तीचे मूळ व्यक्तीच्या नेणीवेत तर युंगने सामुहिक नेणीवेत पहिले. मानवाच्या अस्तित्वापूर्वीच्या विविध अवस्था व त्यानंतरच्या शतकानुशतकांच्या मानवी अस्तित्वाच्या विविध अवस्था यांतील अनुभवाचा संचय म्हणजेच आपले सामुहिक वा वांशिक मन होय. प्राक्कथांची आणि चांगल्या काव्याची निर्मिती ही या सामुहिक नेणीवेतून होत असते. ती काव्यामागील प्रेरक शक्ती असते.
मार्क्सवाद्यांनी कलांचा उदय हा विशिष्ठ काळातील समाजातील आर्थिक परिस्थितीमध्ये शोधला आहे. त्यांच्यामते सर्वप्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, मानसिक संरचनेप्रमाणेच कलाही विशिष्ठ आर्थिक परिस्थितीचा परिपाक आहे. प्रतिभावंत हा विशिष्ठ काळातील आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीतून घडत असतो. तसेच प्रतिभा वा कल्पनाशक्ती  हि विशिष्ठ आर्थिक परिस्थितीने नियत होते अशी भूमिका मार्क्सवादी घेतात. त्यामुळे साहजिकच प्रतिभाशक्तीच्या वा कल्पनाशक्तीच्या दैवी रुपाला येथे स्थान नाही. मात्र तरीही कलानिर्मिती आणि आर्थिक परिस्थिती यांच्या संबधातील गुंतागुंत, व्यामिश्रता विचारात घेणारे काही मार्क्सवादी समीक्षकही आहेत.
·         कल्पनाशक्तीसंबंधी आणखी काही विचार
·         संश्लेषणप्रक्रिया
काव्यनिर्मितीत अनेक घटकांना एकात्म केले जात असते. कांट आणि कोलरीजच्या भूमिकांमध्ये हा विचार ठळकपणे पाहता येतो. आय. ए. रिचर्ड्सच्या प्रेरणासंतुलनाच्या सिद्धांतानुसार कवीची कल्पनाशक्ती म्हणजे मनातील विविध व परस्परविरोधी प्रेरणांचे संतुलन करून एक विशिष्ठ मनस्थिती निर्माण करणारी शक्ती ठरते. इलियटच्या व्यक्तिनिरपेक्ष सिद्धांतानुसार भावना आणि जाणीव कविमनाच्या संपर्कात येतात. त्यांची भाषेच्या माध्यमात जुळणी होते. अर्थात कवीचे अनुभव हे त्याच्या व्यक्तीमत्वात संयोग न पावता त्याच्याकडील माध्यमात ते संयोग पावतात. सारांश, कल्पनाशक्ती हि विविध व परस्परविरोधी घटकांना एकात्म करत असते. सेंद्रिय संश्लेषण साधत असते असे म्हणता येईल.
·         रूपकप्रक्रिया
एरीस्टोटलने काही भाग्यवंतांना, कलावंतांना सांधर्म्य पाहण्याची क्षमता लाभलेली असते असे म्हटले आहे. टी. एस. इलियटने मांडलेला वस्तुनिष्ठ समरुपाचा विचारही कवीच्या अनुभूतीत रूपकप्रक्रिया कशी घडत असते ते दाखविणारा आहे. मराठीतही मर्ढेकरांनी मांडलेल्या भावनानिष्ठ समतानतेच्या विचारातही रूपकप्रक्रिया अभिप्रेत आहे.
·         कल्पनाशक्ती: लौकिक की अलौकिक?
कवीची कल्पनाशक्ती सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या जातीची असते. अशी भूमिका अनेकांनी घेतलेली आहे. कवीच्या संवेदनवृत्तीत ज्ञानात्मक, नैतिक घटकांना कटाक्षाने वगळलेले असते. त्यामुळेच ती सर्वसामन्यांच्या संवेदनवृत्तीपेक्षा वेगळ्या जातीची, अलौकिक ठरते. परंतु कल्पनाशक्तीचे मूळ अतिशय गुंतागुंतीच्या व्यामिश्र अशा मनाच्या स्थितीमध्ये असते अशी भूमिका आधुनिक काळात घेतली गेली. याचा अर्थ कल्पनाशक्तीचा, प्रतिभेचा सर्व व्यापार मनोविज्ञानाला उलगडता आला नसल्याने तिला गूढ, अनाकलनीय मानता येईल. परंतु त्यासाठी तिला अलौकिक मानण्याचे काही कारण नाही अशी भूमिकाही काही आधुनिक समीक्षक घेतात.

      पौर्वात्य आणि पाश्चात्य साहित्यपरंपरेतील साहित्याच्या निर्मिती आणि आस्वादप्रक्रीयेविषयीच्या विचारांचा परामर्श अशाप्रकारे घेता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा