शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

उपहासाचा आनंदयात्री : व्हॉल्टेअर



व्हॉल्टेअर
( २१ नोव्हेंबर १६९४ – ३० मे १७७८ )
फ्रान्समधील धर्मसुधारणा चळवळीचा प्रणेता आणि जागतिक साहित्यातला एक महान लेखक


आपल्याच हाताने मानेला फास लावून घेऊन आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये म्हणून हसणारा व्हॉल्टेअर हा ऍरिस्टोफेन्स व रॅबेल्स, ल्यूथर व सैतान या सर्वांचे अजब मिश्रण होता. त्याची प्रतिभा व त्याची बुध्दि या परस्परविरोधी गुणांनीं बनल्या होत्या. तो मानवजातीचा तिरस्कार करी, पण मानवांवर त्याचे प्रेमहि असे. तो धर्मोपदेशकांची टर उडवी;  तरी पण त्यानें आपलें एक पुस्तक पोपला अर्पण केलें आहे. राजा-महाराजांची तो हुर्रे उडवी, तरी पण त्याने फ्रेडरिक दि ग्रेटनें दिलेले पेन्शन स्वीकारले. त्याला धर्मांधपणाची चीड असे पण ज्यूंच्या बाबतीत तो अनुदार होता. संपत्तिजन्य ऐटीचा तो उपहास करी; तरी त्याने स्वत: मात्र पुष्कळ धनदौलत मिळविली व तीहि सगळीच कांही प्रामाणिकपणे मिळविली नाहीं. ईश्वरावर त्याचा विश्वास नव्हता, तरी तो जन्मभर ईश्वराचा शोध करीतच होता. त्याला धर्माबद्दल आदर नसे, पण त्याने हास्याच्या आनंदाचा नवाच धर्म निर्मिला.

जगातल्या थट्टा व टिंगल करणार्‍यांचा तो राजा होता. हे जीवन म्हणजे एक मोठे हास्यरसोत्पादक नाटक आहे असे तो मानी. तो लोकांना म्हणे, ''जीवन हा एक फार्स समजा आणि मिळवितां येईल तितकी गंमत मिळवा.''  जीवन चांगल्या रीतीने जगता यावे, अनुभवता यावे, त्यांतील गंमत मिळविता यावी म्हणून अज्ञान, अन्याय, रुढी व युध्दे हीं सर्व नष्ट करून टाकली पाहिजेत. या दुष्ट वस्तू जीवनाची ट्रॅजेडी करून टाकीत असतात. या दूर केल्या तरच जीवन हे एक कॉमेडी होईल.

दुसर्‍या शब्दांत हेच सांगावयाचे तर असे म्हणता येईल की, व्हॉल्टेअरने लोकांना विचार कसा करावा हे शिकविले. तो म्हणे, ''राष्ट्र एकदा विचार करायला लागले म्हणजे मग त्याला थांबविणे अशक्य होईल.'' तो स्पायनोझापेक्षा कमी चारित्र्यवान होता, तरी त्यानेच जगावर त्या ज्यू तत्त्वज्ञान्यापेक्षा अधिक परिणाम-सुपरिणाम केला. तो व्यवहार्य गोष्टींवरच लिही व तेही लहान मुलांना सुध्दा समजावे अशा भाषेत. त्याच्या संशयवादी तत्त्वज्ञानामुळे डायनॅमिटवर ठिणगी पडली व असा प्रचंड भडका उडला की, राजांचे दंभ व धर्मांतील भोळसट रुढी यांचे भस्म झाले. जुन्या जगाचा पाया त्याने उडवून टाकला व नव्या जगाचा पाया घालण्यासाठी वाव करून दिला.

त्याचें सारें जीवन म्हणजे विरोधाभास होता. तो जन्मतांच त्याची आई मेली. २१ नोव्हेंबर १६९४ रोजी तोही मरणार असे वाटले, पण तो वाचला. त्याची प्रकृती नेहमी मरतुकडी होती. तरीही तो त्र्याऐंशी वर्षांचा होईतो वाचला. जेसुइट स्कूलमध्ये शिकून तो ग्रॅज्यूएट झाला. त्याने जेसुइटांचे सारे वर्चस्व झुगारून दिले. त्याच्या हाडांचा नुसता सांगाडा होता, त्याचे नाक लांब होते, त्याचे डोळे बारीक पण तेजस्वी होते. तो पॅरिसमधला सर्वांत कुरुप तरुण होता, तरीही तो सार्‍या स्त्रियांचा लाडका होता. त्या त्याला जणू देव मानीत!

तो कपटी व उपहास करणारा होता. त्याचे खरे नाव फ्रॅकॉइस मेरी अरोट असे होते. पंधराव्या लुईच्या रीजटचा अपमान केल्याबद्दल बॅस्टिलच्या तुरुंगांत शिक्षा भोगीत असता त्यानें नाव बदलून व्हॉल्टेअर हे नाव घेतले. अकरा महिन्यांचा तुरुंगवास त्याने नाव्हेरचा राजा हेन्री याच्यावर महाकाव्य लिहिण्यात खर्चिला. तुरुंगातून सुटला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता. त्याचा बाप व्यवहारचतुर होता. त्यानेब त्याला तीन गोष्टींबाबत सावध राहण्यास सांगितले : वाङमय, स्त्रिया व जुगार. शाळेत असता तो जेसुइटांचे मनापासून ऐके, त्याचप्रमाणे त्याने बापाचा हा उपदेश लक्षपूर्वक ऐकला. पण जेसुइटांच्या शिकवणीप्रमाणेच बापाचीही शिकवण तो पुढे विसरला.

त्याने काहीं नाटके लिहिली व ती यशस्वी ठरली. त्याला पैसेही बरे मिळाले. वॉलस्ट्रीटमधील एखाद्या ब्रोकरप्रमाणे त्याने आपले पैसे मोठ्या हुषारीने गुंतविले. फ्रेंच सरकारने काढलेली लॉटरीची सारी तिकिटे एकदा व्हॉल्टेअरने घाऊक रीत्या खरेदी केली. मॅनेजरच्या हे लक्षातच न आल्यामुळे सारी बक्षिसे व्हॉल्टेअरला मिळाली !

तो तत्त्वज्ञानी तसाच व्यवहारज्ञही हाता. सूक्ष्म विचार करणारा व धंद्यांत हुषार असा पुरुष क्वचितच आढळतो. व्हॉल्टेअरची बुध्दि मोठी विलक्षण होती. तत्त्वज्ञानांतील अमूर्त व सूक्ष्म विचार तो प्रत्यक्ष व्यवहाराशी बेमालूम मिसळी. मूर्त-अमूर्त दोहोंतही त्याची बुध्दि सारखी खेळे व्यवहार्यता व सूक्ष्म अमूर्तता दोन्ही त्याच्या ठायी होत्या. इतर नाना उलाढाली करूनही त्याला पॅरिसमधील प्रतिष्ठित व रुबाबदार मंडळीत मिसळण्यास भरपूर वेळ असे. पॅरिसमधील बेछूट, स्वछंदी व विलासी जीवनाचा तो मध्यबिंदु होता; त्याच्याभोवती पॅरिसमधील प्रतिष्ठत नबाब व पंडित जमत. तत्त्वज्ञान, व्यवहार व या बैठकी अशा त्रिविध चळवळीचा त्याच्या बुध्दीवर ताण पडे व त्यामुळे त्याचे दुबळे शरीर थके. एकदा त्याला देवी आल्या. डॉक्टरांना तो मरणार असे वाटले; पण तो नेहमीप्रमाणे बरा झाला व अधिकच उत्साहाने जीवनाच्या आनंददायी गोंधळात सामील झाला, पुन: या सुखी व विनोदी संसारांत बुडी घेता झाला.
त्याची प्रकृति यथातथाच होती. दुबळ्या प्रकृतीच्या जोडीला तिखट जिभेची आणखी एक अडचण असल्यामुळे त्याला नेहमी त्रास होई. एकदा तो म्हणाला, ''जें वाटते ते स्पष्टपणे बोलणे हा माझा धंदा आहे.'' तत्त्वज्ञानक्षेत्रातच त्याचे विचार होते तोपर्यंत सारे ठीक होते; पण माणसांविषयी आपणास काय वाटते हे तो सांगू लागला व विशेषत: सरदार-जमीनदारांविषयी लिहू लागला तेव्हा भानगडी सुरू झाल्या, त्रास होऊ लागला. एकदा त्यानें लिहिलेले एक तिखट व झणझणीत वाक्य चेव्हेलियर डी रोहन याला झोंबले; त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याने कांही गुडांना व्हॉल्टेअरला चांगले चोपून काढावयास सांगितले. दुसर्‍या दिवशी व्हॉल्टेअरने त्या सरदाराला द्वंद्वयुध्दाचे आव्हान दिले. व्हॉल्टेअरची तलवारही त्याच्या जिभेप्रमाणेच तिखट असेल असे त्या बड्या सरदाराला वाटले, म्हणून त्याने पोलिसांच्या मुख्याकडे संरक्षण मागितले. पोलिस-अधिकारी त्याचा चुलतभाऊ होता. व्हॉल्टेअर याला पुन : बॅस्टिलच्या तुरुंगांत अडकविण्यांत आले. त्याची मुक्तता होताच त्याला फ्रान्समधून निर्वासित करण्यात आले.

तो इंग्लंडमध्ये गेला. या वेळी त्याचे वय बत्तीस वर्षांचे होते. तो तेथे तीन वर्षे राहिला. त्याचे मन देशकालातीत होते. इंग्लंडमध्येही त्याला घरच्यासारखेच वाटले. तो इंग्रजी भाषा चांगलीच शिकला. एका वर्षांत त्याने शेक्सपिअरखेरीज बाकी सारे साहित्य आत्मसात केले. पण शेक्सपिअर हे इंग्लंडचे सर्वोत्कृष्ट फळ होते. शेक्सपिअरची मनोबुध्दी हा आनंदी तत्त्वज्ञानी समजू शकला नाही. इंग्लंडमधल्याही मोठमोठ्या तत्त्वज्ञान्यांना उत्कृष्ट फ्रेंच मनोबुध्दी समजू शकत नसे. व्हॉल्टेअर शेक्सपिअरला जंगली म्हणत असे आणि पुढे शंभर वर्षांनी कार्लाइलने व्हॉल्टेअरला जंगली म्हणून त्याचा सूड घेतला. पण भूतकाळातला महाबुध्दिमान शेक्सपिअर जरी व्हॉल्टेअरला जाणता आला नाही तरी समकालीन इंग्रजांत त्याला बरेचसे अनुकूल मनोबुध्दीचे लोक भेटले. इंग्रजांचे विचारधैर्य पाहून त्याला आश्चर्य वाटे. इंग्रज लोक आपले विचार धैर्याने मांडतात हे पाहून तो त्यांचे कौतुक करी. क्वेकरांशी त्याचा चांगला परिचय झाला. त्यांची शांतिमय मते त्याला लगेच पटली. तोही म्हणाला की, समुद्र ओलांडून आपल्याच बंधूंचे गळे कापावयाला जाणे हा केवळ मूर्खपणा होय. ''गाढवाच्या कातड्यावर दोन काठ्या मारून आवाज होतो'' आणि सारे मारामारीला धावतात. स्विपत्रटची व त्याची भेट झाली. त्या शतकातले सर्वांत मोठे असे दोन उपहासलेखक एकत्र बसले, बोलले. खरोखरच तो प्रसंग देवांना सुध्दा मोठ्या मेजवानीचा वाटला असता. व्हॉल्टेअरची ''छोटामोठा'' ही मनोरम कथा 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स' पासूनच स्फूर्ति मिळून लिहिली गेली असावी. स्विपत्रटच्या उपहासांतील तिखटपणाइतका तिखटपणा व्हॉल्टेअरमध्ये नसे. व्हॉल्टेटरची लेखणी गुदगुल्या करी, स्विपत्रटची लेखणी भोसकी. पण व्हॉल्टेअरची प्रतिभा अधिक समृध्द व श्रीमंत होती.

छोटामोठा-

मायग्नोमेगस हा सिरियल बेटाचा रहिवासी होता. तो पाच लक्ष फूट उंच होता. त्याला शनीवरचा एक अगदीच लहान, केवळ पंधराच हजार फूट उंच गृहस्थ भेटतो. उभयता अनंत अवकाशातून भ्रमन्ती करण्यासाठी बाहेर पडतात. सॅटर्नियनचे (शनीवरील गृहस्थाचे) लग्न नुकतेच झालेले असते. त्याची पत्नी त्याला जाऊ देत नाही. कारण त्यांनी केवळ दोनशेच वर्षे मधुचंद्र भोगलेला असतो ! इतक्या लवकर ताटातूट ! पण सॅटर्नियन तिचे समाधान करतो व म्हणतो, ''रडू नको. मी लवकरच परत येईन.'' दोघे मित्र धूमकेतूच्या शेपटीवर बसून विश्वसंचारास निघतात. ते तार्‍यांमधून जात असतात. संचार करता करता ते पृथ्वी नावाच्या एका लहानशा ढिपळावर उतरतात. भूमध्यसमुद्र म्हणजे त्यांना गंमत वाटते. ते त्यातुन गप्पा मारीत मारीत चालत जातात. त्यांना वाटेत एक गलबत भेटते. त्या गलबतावर ध्रुवाची सफर करून आलेले कांही तत्त्वज्ञानी असतात. सिरियनला ते गलबत इतके लहान वाटते की, दुर्बिणीशिवाय ते त्याला दिसत नाही. तो ते गलबत उचलून आपल्या बोटाच्या नखावर त्याचे नीट परीक्षण करण्यासाठी ठेवतो; पण त्या गलबतात सजीव अणूपरमाणू पाहून त्याला आश्चर्य वाटते. हे अणू त्याच्याशी बोलतात व त्याला म्हणतात, ''आम्ही लहान असलो तरी आमच्यात अमर आत्मा आहे.'' हे ऐकून त्या पाच लक्ष फूट उंच माणसास व त्याच्या मित्रास अधिकच आश्चर्य वाटते. ते सजीव अणू आणखी सांगतात, ''आम्ही ईश्वराची प्रतिकृति आहोत, विश्वाचे मध्यबिंदू आहोत.'' ते अधिकच आश्चर्यचकित होतात.
ते दोघे या मानवी अणूंना विचारतात, ''तुम्ही कसे जगता ? वेळ कसा घालविता ?'' ते मानवी अणू सांगतात, ''आमचा पृथ्वीवरचा बराचसा वेळ एकमेकांना मारण्यातच जातो.''  एक तत्त्वज्ञानी त्यांना सांगतो, ''या क्षणीं आमच्या जातीचें एक लाख जंतू डोक्यावर टोप्या घालून डोक्यावर पागोटी घालणार्‍या दुसर्‍या एका लाखांना मारीत आहेत.''  तो मानवी अणू पाहुण्यास पुन: सांगतो, ''ही मारामारी पॅलेस्टाइन नावाच्या एका वारुळासाठी चालली आहे.'' पुन: तो सांगतो, ''जे लाखों लोक एकमेकांचे गळे कापीत आहेत त्यांना त्या पॅलेस्टाइनच्या ढिपळावर सत्ता नाहीच मिळवावयाची. ते पॅलेस्टाइन सुलतानाच्या ताब्यांत असावे की युरोपीय राजाच्या ताब्यांत असावे यासाठी ही मारामारी, ही खुनी कत्तल ! आणि अशा कत्तली अनादि कालापासून पृथ्वीवर सारख्या चालू आहेत.'' पृथ्वी नावाचा हा ग्रह म्हणजे वेड्यांचे घर आहे असे या पाहुण्यांना वाटते व त्या मानवी अणुपरमाणूंना सोडून ते आपल्या विचारवंत लोकी त्वरेने प्रयाण करतात.

व्हॉल्टेअरच्या इंग्लंडच्या भेटीतून मायक्रोमिडास हे एकच पुस्तक जन्मले नाही, तर 'इंग्रजांसंबंधीं पत्रे’  हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे पुस्तकही निर्माण झाले. अर्थातच ते तितके मनोरंजक नव्हते हे खरे. या पत्रांमध्ये त्याने फ्रेंचांच्या गुलामीची इंग्रजांच्या स्वतंत्र वृत्तीशी तुलना केली आहे, इंग्लंडच्या नियंत्रित राजशाहीचा गौरव केला आहे व तसलेच सरकार फ्रेंचांनी फ्रान्समध्ये स्थापावे असे प्रतिपादन केले आहे. त्याने जवळजवळ 'आपला राजा फेकून द्या' असेच लिहिले आहे. 'तत्त्वज्ञानाची कथा' या आपल्या पुस्तकांत डॉ० ड्यूरांट लिहितो, '' व्हॉल्टेअरला माहीत असो वा नसो, त्याचा हेतु असो वा नसो; त्याची पत्रे म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या कोंबड्याचे पहिले आरवणे होते.''  व्हॉल्टेअरला हद्दपारीतून परत बोलावण्यांत आले. ही पत्रे प्रसिध्द व्हावी अशी त्याची इच्छा मुळीच नव्हती; खासगी रीत्या प्रचार व्हावा म्हणूनच त्याने ती लिहिली होती. पण एका अप्रामाणिक प्रकाशकाच्या हाती ती पडली व त्याने व्हॉल्टेअरची परवानगी न घेताच ती छापून टाकली ! एका सरकारी अधिकार्‍याच्या हाती एक प्रत आली. त्याने लगेच ते पुस्तक राजद्रोही, अधार्मिक आणि अनीतिमय आहे असे जाहीर केले. ते पुस्तक जाहीर रीत्या जाळण्यांत आले व त्याला पकडण्यासाठी पुन: वॉरंट निघाले.

बॉस्टिलच्या तुरुंगांत पुन: जाऊन बसण्याची व्हॉल्टेअरची इच्छा नव्हती. बॅस्टिलच्या तुरुंगाचे शिल्पकाम, त्याचा नकाशा, त्याचा आंतर भाग यांची आता त्याला पुरेपूर माहिती असल्यामुळे तो पोलिसांच्या हातून निसटून पळून गेला व आपल्या प्रियकरिणीच्या बाहुपाशांत जाऊन विसावला.

या त्याच्या प्रेयसीचे नाव मार्क्किसे डु चॅटेलेट. ती विवाहीत होती. तिचा नवरा म्हातारा व सैन्याबरोबर दूर होता. त्याच्या गैरहजेरीचा व्हॉल्टेअरने पुरापुरा फायदा घेतला तो त्याची पत्नी व त्याचा किल्ला यांचा जणू धनीच बनला. मार्क्किसे सुंदर तशीच चतुर होती. सिरे येथे तिचा बंगला होता. ही जागा यात्रेचे, विलासाचे, आनंदाचें व मेजवानीचें स्थान बनली. येथें तत्त्वज्ञानाच्या चर्चा चालत, खानपानही चाले. प्राचीन ग्रीक लोकांचे वैभव जणू पुन: सजीव झाले ! प्लेटोच्या काळापासून अशी भोजने झाली नव्हती, की अशा चर्चाही झाल्या नव्हत्या. सिरे येथील हे स्थान युरोपभर विख्यात झाले. फ्रान्समधील नामांकित विद्वान् व उत्तमोत्तम बुध्दिमान लोक व्हॉल्टेअरने येथे गोळा केले. तो त्यांना सर्वोत्कृष्ठ मद्य देईत्यांच्यासाठी आपली नाटके करून दाखवी व आपल्या विनोदी टीकांनी त्यांना पोट धरधरुन हसावयाला लावी. सिरे येथेच त्याने आपल्या अत्युत्तम Cynical कथा लिहिल्या. कॅन्डिडे, The World As It Goes, Zadig, The Pupil of Nature, The Princess of Balaglon वगैरे मनोरम कथा त्याने लिहिल्या.

या गोष्टींतील प्रमुख पात्रे म्हणजे रक्तामांसाची माणसे नाहीत. आपल्या मनांतल्या कल्पनांनाच मानवी पोषाख देऊन त्याने उभे केले आहे. ही सारी पात्रे म्हणजे कल्पनांची प्रतीके आहेत, रूपके आहेत. किती रसभरित व भव्य-दिव्य कल्पना ! आणि त्याना दिलेले पोषाखही किती कल्पनारम्य ! या अद्भुत गोष्टींपैकी कॅन्डिडे ही गोष्ट सर्वांत छान आहे. ही त्याने तीन दिवसांत लिहिली. ही लिहिताना त्याची लेखणी जणू अक्षरश: हसत होती ! या पुस्तकांत त्याने असे सिध्द केले आहे की, या जगाहून अधिक वाईट जग असणे शक्य नाही. आपण राहतो ते जग शक्य तितके वाईट आहे. या गोष्टीसाठी त्याने घेतलेल्या विषयाहून अधिक खेदोत्पादक व उदास करणारा विषय सांपडणे विरळ ! पण व्हॉल्टेअरच्या जादूच्या स्पर्शाने निराशाही हसू लागते. निराशाही अत्यंत विनोदी वस्तु म्हणून गौरवावीपूजावी असे वाटते. कॅन्डिडे ही गोष्ट म्हणजे निराशेचे बायबल; पण वाङ्मयाच्या इतिहासांतील हे अत्यंत आनंददायक पुस्तक आहे.
त्याच्या इतर अद्भुत कथाही सर्वांना 'हसा' म्हणून सांगत आहेत. स्वत:ची दु:खे व स्वत:चा मूर्खपणा पाहून हसा, असे तो लोकांना सांगत आहे, 'निसर्गाचा विद्यार्थी' (The Pupil of Nature) या पुस्तकांत अशिक्षित व जंगली मनुष्याच्या निरोगी मनाची सुधारलेल्या माणसाच्या विकृत व गुंतागुंतीच्या मनाशी तुलना केली आहे.

निसर्गाचा विद्यार्थी :

एक हुरॉन इंडियन फ्रान्समध्यें आला आहे. त्याच्या आत्म्याचा उध्दार व्हावा म्हणून मिशनरी त्याला ख्रिश्चन करू पाहतात. तो नव्या कराराचा अभ्यास करून म्हणतो, ''माझी सुंताही करा व मला बाप्तिस्माही द्या. बायबलांतील सर्वांची सुंता केली आहे. ख्रिश्चन होण्याआधी प्रत्येकाने ज्यू झाले पाहिजे!''
त्याला सर्व उलगडा करण्यांत येतो व तो पुढचें पाऊल टाकण्यास तयार होतो. बाप्तिस्म्यासाठीं तो मानेपर्यंत नदीच्या पाण्यांत शिरतो. ख्रिश्चनांना अशा रीतीनें बाप्तिस्मा द्यावयाचा नसतो असे जेव्हा त्याला सांगण्यांत येते तेव्हां तो आपले खांदे उडवितो व पुन: कपडे घालून पापांची कबुली देण्यासाठी धर्मोपदेशकाकडे जातो. पापांचा पाढा वाचून झाल्यावर तो त्या धर्मोपदेशकास खुर्चीवरून खाली ओढतो व आपण त्याच्या जागी बसून त्याला स्वत:ची पापे कबूल करावयास सांगतो. तो इंडियन त्या धर्मोपदेशकाला आग्रहपूर्वक म्हणतो, ''बायबलांत असे सांगितले आहे की, एकमेकांनी एकमेकांजवळ आपापली पापे कबुल करावी.''
पुन: गोंधळात पाडणारी विवरणे त्या इंडियनास सांगण्यात येतात तो तुच्छतापूर्वक म्हणतो : ''बायबलात न सांगितलेल्या अनंत गोष्टी तुम्ही येथे करीत आहात; आणि त्यांत जे करा म्हणून सांगितले आहे तेच नेमके तुम्ही करीत नाही. मला हे कबूल केलेच पाहिजे की, हे सारे पाहून मला आश्चर्य वाटते व रागही येतो.''
गोष्ट पुढें चालू राहते. हुरॉनचा संस्कृतीशी संबंध आल्यामुळे कोणकोणत्या संकटांतून व आपत्तीतून त्याला जावे लागते याची सारी हकीकत सांगण्यात आली आहे. नाना साहसाच्या गोष्टी हुरॉनला कराव्या लागतात. तो शेवटी अशा निर्णयाला येतो की, सैतानाची इच्छा होती म्हणून त्याने आपणास सुसंस्कृत ख्रिश्चन केले. तो म्हणतो, ''या सुसंस्कृत ख्रिश्चनांनी मला ज्या रानटी पध्दतीने वागविले त्या पध्दतीने माझ्या अमेरिकन बंधूंनी मला कधीही वागविले नसते. इंडियन रानवट असतील, सुधारलेले नसतील; पण या गोर्‍यांच्या देशांतील लोक तर सुधारलेले पशू आहेत !''

व्हॉल्टेअरच्या सर्व गोष्टीतून हे असेच प्रकार आहेत. या गोष्टींशी तुलना करण्यासारखे वाङमयांत दुसरे नाही. या गोष्टींना संविधानकच नाही. व्हॉल्टेअरच्या तत्त्वज्ञानाच्या धाग्याभोंवती गुंफलेली, नाना असंबध्द संविधानकांची ही एक मालिका आहे. त्याच्या गोष्टीतील नायक शेतकर्‍यांच्या मुलींशी, राण्यांशी, मोठमोठ्या इस्टेटींच्या वारसदारणींशी लग्न करतात. त्याचे डोळे जातात तरीही ते सुखी असतात. ते म्हणतात, ''डोळे गेले तरी आम्ही तत्त्वचिंतन करीत बसू, अंतर्मुख होऊ. त्यांचा प्रेमभंग होतो. त्यांना दु:ख इतकेच की, या बाबतीत ते तत्त्वचिंतन करू शकत नाहीत. संकटांत सांपडलेल्यांस ते साह्य करतात; पण त्यांच्यावर संकट आले असता त्यांना लाथा मिळतात. पण त्यांनी गुन्हे केले म्हणजे त्यांना संपत्ती मिळते, मानसन्मान लाभतात. थोडक्यांत सांगावयाचे तर मानवी जीवनाच्या या सर्व लुटूपुटीच्या नाटकांतली ही पात्रे व्हॉल्टेअरबरोबर हिंडतात; व्हॉल्टेअर दोर्‍या ओढून त्यांना आपल्या अतिचपल बोटांनीं नाचवील तशी ती नाचतात. व्हॉल्टेअरचा विनोद म्हणजे अखंड वाहणारी विहीर आहे. त्या विनोदाच्या विहिरीला अंतच नाही. पण या विनोदाच्या विहिरीत पाणी नसून मद्य आहे. त्याला जीवनांतील विनोदाचा कैफ चढतो. तो आपल्या तेजस्वी विचारांनी सार्‍या जगाला गुंगवून टाकतो, दिपवून सोडतो.

पण व्हॉल्टेअरची सर्वोत्तम बुध्दी तशीच प्रतिभा पाहू इच्छिणाऱ्यास अन्यत्र जावे लागेल. या गोष्टीमधील त्याची जीवनाविषयीची दृष्टी आनंददायक असली तरी खोल नाही. जरा पोरकटपणाच वाटतो. त्याची लोकप्रियता फार होती म्हणून तो दु:खी असू शकत नव्हता. त्याची चलती होती म्हणून तो फार प्रखर व तिखट होऊ शकत नव्हता. जीवनाचा अर्थ नीट समजण्याइतपत यथार्थ व पुरेसे जीवन तो अद्यापि जगला नव्हता. तो अठराव्या शतकांतील विनोदी पात्र आहे. तो युरोपचा खेळाडू आहे. पण त्याचे मन अद्यापि अपरिपक्व आहे. त्याने अद्यापि फारसे दु:ख भोगलेले नसते; मोठ्या मनुष्याच्या उंचीला तो अजून गेला नव्हता. विचारांची व भावनांची उच्चता तशीच गंभीरता त्याला अद्यापि आली नव्हती. मानवजातीला मार्ग दाखविणार्‍या थोर पुढार्‍यांपैकीं एक होण्यासाठीं दु:खाच्या सद्गुरूजवळ त्याने अजून कष्ट सोसणे जरूर होते.

१८४९ साली मॅडम डु चॅटेलेट मरण पावली. जीवनात प्रथमच दु:ख पाहून तो हंसण्याचे विसरला. त्याची प्रकृतीही ढासळू लागली व कडेलोट म्हणजे त्याला पुन: फ्रान्समधून हद्दपार करण्यात आले. १७५५ साली लिस्बन येथे भूकंप झाला. या अपघातांत तीस हजार लोक गडप झाले ! त्या दिवशी सर्व संतांचा स्मृतिदिन होता. पुष्कळ लोक प्रार्थना करीत असतानाच ठार झाले. चर्च प्रार्थना करणार्‍यांनी भरून गेले होते. आणि भूकंप आला व सारे गडप झाले !

व्हॉल्टेअर आता जगाकडे निराळ्या प्रकाशात पाहू लागला. त्याचे लेखन अधिक गंभीर होऊ लागले. त्याचे भव्य मन शेवटी एकदाचे परिपक्व झाले. त्याने एक भावनोत्कट प्रखर कविता लिहीली. ईश्वराची करुणा व त्याचे ज्ञान यांबद्दल त्याने शंका घेतली. आपल्या लेकरांना दु:खांत लोटणारा हा कसला परमेश्वर ? आरोळ्या ठोकून प्रार्थना करणार्‍या सार्‍या भक्तांना त्या निष्ठुराचे मौन हेच उत्तर ! अखेर व्हॉल्टेअरच्या लक्षांत आले की, सुटसुटीत, अर्थसुंदर नर्मवचने किंवा निश्चिंत हास्य यांपेक्षा जीवन काही तरी अधिक आहे.

''मी हसत हसत विनोदाने जगांतील सुखाची गीते, सूर्यप्रकाशाची गीते गात हातो; पण आता काळ बदलला आहे. माझ्या वाढत्या वयानेही मला नवीन दृष्टी दिली आहे. मानवजातीची क्षणभंगुरता मीही अनुभवीत आहे. सभोवती अंधार वाढत आहे. मीही प्रकाश शोधीत आहे. अशा वेळी मी दु:खीकष्टी होऊ नये तर काय करावे !''

लिस्बन येथील भुकंपाच्या बाबतीत प्रस्थापित चर्चची बेफीकिर वृत्ती पाहून तर व्हॉल्टेअरला धक्काच बसला ! या घोर आपत्तींतही त्या फादरांना ईश्वराचे हेतु दिसत होते ! त्यांनी पापे केली म्हणून प्रभूने त्यांना मारून टाकले, असे हे धर्मोपदेशक खुशाल प्रतिपादीत ! छिन्नविच्छिन्न झालेल्या लोकांच्या वेदनांवर या धर्मांतील भोळसट कल्पना आणखी मीठ चोळीत आहेत असे पाहून या चर्चची व्हॉल्टेअरला चीड आली. चर्चबद्दलचा तिरस्कार त्याच्या मनांत मरेपर्यंत होता.

स्विट्झर्लेंडमध्यें फर्ने येथे त्याने इस्टेट विकत घेतली. फ्रान्सच्या सरहद्दीच्या जरा बाहेरही इस्टेट होती. येथे बसून त्याने संघटित धर्माविरुध्द जोरदार लढाई सुरू केली. तो सांगू लागला की, जगांतील सार्‍या दु:खाचे मूळ म्हणजे चर्च. चर्चची धर्मान्धता तशीच असहिष्णुता, ती इन्क्विझिशन्स, ते बहिष्कार, त्या शिक्षा, ती युध्दे-सारा फापटपसारा आहे. असे हे चर्च म्हणजे मानवजातीला शाप आहे. अत:पर चर्चची सत्ता चालू ठेवणे म्हणजे सुधारणेला कलंक लावणें होय. ''चर्चला लागलेला हा कलंक धुऊन काढा' अशी घोषणा त्याने केली. ''या निंद्य गोष्टी चिरडून टाका'' हें त्याचे ब्रीदवाक्य झालें. त्याने मित्रांना लिहिलेल्या प्रत्येक पत्राच्या शेवटी ''चर्च चिरडून टाका'' हे वाक्य लिहिलेले असे.
पुस्तकाचा व पत्रकांचा त्याने नुसता पाऊस पाडला ! अत्यंत भावनोत्कटतेने त्याने हे सारे लिखाण लिहिलेले आहे. त्याचे लिहिणे जळजळीत निखार्‍यासारखे आहे. या लिखाणात उदात्त भावनेची कळकळ आहे. हे सारे लिखाण केवळ मनुष्यांच्या अंधश्रध्देविरुध्दच होते असे नव्हे, तर त्यांच्या धार्मिक आचारांविरुध्दही होते. बहुजनसमाजाने ''ईश्वर आहे'' असे मानणे ठीक आहे. ''ईश्वर नसेल तर एखादा शोधून काढावा लागेल. एपिक्यूरसचे ईश्वराशिवाय चालत असे; पण व्हॉल्टेअरला ईश्वर पूर्णतः रद्द करणे बरें वाटेना. ईश्वर म्हणून कोणी मानला म्हणजे बहुजनसमाज जरा बरा वागतो असे त्याचे मत होते. ईश्वर असणे जरूर आहे असे त्याला वाटे. इतर कोणत्याही कारणासाठी नसेना का, पण निदान आपणास त्याच्याशी भांडता यावे म्हणून तरी तो त्याला हवा असतो. ईश्वर म्हणजे जगाचे परमोच्च ज्ञान, अनंतपट कार्यक्षम असा विश्वकर्मा. पण धर्मोपदेशक या ईश्वराला इन्क्विझिटर करतात. लष्करी अधिकारी त्याला शिक्षाप्रिय सार्जंट बनवितात व अशा रीतीने श्रध्देचे भीतीत व धर्माचे भोळसटपणात रूपांतर करतात. व्हॉल्टेअर म्हणतो, ''या रुढि-राक्षसीला आपण नष्ट करू या. ही रूढी धर्मांतूनच जन्मते पण धर्मालाच छिन्नविछिन्न करते. रूढींविरुध्द बंडाचा झेंडा हाती घेऊन उभे राहतील ते सारे मानवजातीचे उपकारकर्ते होत.''

व्हॉल्टेअरने आपले उर्वरित जीवन धार्मिक रूढी व अंधळेपणा यांशी दोन हात करण्यांत दवडिले. या रूढींतून निर्माण होणार्‍या द्वेष, मत्सर, असहिष्णुता, संकुचितपणा, अन्याय व युध्द यांच्याविरुध्दही तो बंड करीत राहिला. युध्द म्हणजे मोठ्यांतला मोठा गुन्हा असे तो म्हणे. तो म्हणतो, ''हा गुन्हा अधिकच लज्जास्पद व चीड आणणारा वाटतो; कारण, सेनाधिपति होणारा प्रत्येक डाकू धर्माच्या नांवाने जाहीरनामा काढून चोरी करावयास निघतो व युध्दप्रिय देवांना आपल्या बाजूनें लढावयास बोलावतो.'' जो आपल्या विशिष्ट धार्मिक समजुतीसाठी मारावयास उठतो तो खरा धार्मिक नव्हे. शास्त्रज्ञाचे म्हणणे कोणी न मानले तर काय तो मारावयाला उठतो ? भूमितीतील सिद्धान्तासाठी का कधी युध्द झाले आहे ? पण हे धर्मोपदेशक काही धार्मिक गोष्टीसाठी खुशाल खाटिकखाना सुरू करतात ! त्यांच्या धार्मिक गोष्टी म्हणजे केवळ मृगजळ असतें. तो मिथ्या काथ्याकूट असतो. त्यांचे धार्मिक सिद्धान्त म्हणजे त्यांची स्वत:ची कांही विशिष्ट मते असतात. त्यासाठीं मारामार्‍या कशाला ? व्हॉल्टेअर म्हणतो, ''हे असे लोक म्हणजे भयंकर प्रकारचे वेडे होते. काहीही किंमत पडो, यांच्या या विषारी चळवळी बंद पडल्याच पाहिजेत.''

जगांतील धार्मिक असहिष्णुतेची पुंजी कमी व्हावी म्हणून व्हॉल्टेअरने भरपूर कामगिरी केली आहे. धार्मिक बाबतीत कोणी ढवळाढवळ करू नये, हे तत्त्व त्याने कायमचे प्रस्थापित केले व चर्च आणि स्टेट यांची कायमची ताटातूट केली. त्याने धर्मोपदेशकांच्या हातांतील तलवार काढून घेतली. व्हॉल्टेअरचे जीवनारंभकाळी 'हसा व हसू द्या' हे ब्रीदवाक्य होते. पण आता त्याने अधिक उच्च ब्रीदवाक्य घेतले : ''तुम्ही विचार करा व इतरांनाही विचार करू द्या.'' एका पत्रांत तो लिहितो, ''तुम्ही जे काही म्हणता त्यातील एका अवाक्षराशीही मी सहमत नाही. पण तुम्हांस जे म्हणावयाचे आहे ते म्हणण्याचा तुम्हास हक्क आहे आणि या तुमच्या हक्काचे मी मरेतो समर्थन करीन.'' व्हॉल्टेअरचे हे शब्द म्हणजेच त्याने मानवी सुधारणेत घातलेली मूल्यवान भर होय. अठराव्या शतकाची सुधारणेला मोठी देणगी म्हणजे हे धीरोदात्त शब्द होत.

व्हॉल्टेअरच्या मनांत अशी क्रांति चालू असता त्याचे बाह्य जीवन नेहमीप्रमाणे अशान्तच होते. फ्रेडरिक दि ग्रेटचा साहित्यिक चिटणीस म्हणून त्याची नेमणूक झाली होती. तो फ्रेडरिकशी भांडला व त्याला पुन: फ्रान्समध्यें पाठविण्यांत आले. फ्रेंच क्रांतीचे वातावरण तयार करणारे डिडरो, 'अलेंबर्ट, कॉन्डॉसेंट, वगैरे नास्तिक ज्ञानकोशकारमंडळींना व्हॉल्टेअरही मिळाला. डिडरो प्रभूति सारे लोक जुन्या विचारांना व जुन्या रूढींना धाब्यावर बसविणारे होते. ते जुन्या मूर्ती फोडून नवीन विचारमूर्ती देणारे होते. व्हॉल्टेअरने ''स्वतंत्र विचाराचा ज्ञानकोश'' तयार करण्याच्या कामी त्यांना मदत केली. ज्ञानकोशकार त्याला सनातनी म्हणत, आस्तिक म्हणत आणि सनातनी त्याला नास्तिक म्हणत. आणि या दोघांच्या मध्ये तो उभा होता. त्याचे हात कामाने भरलेले होते. इतिहासाचे तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञानाचा कोश, वगैरे शेकडो पुस्तके लिहिण्यांत तो मग्न होता. तरीही अन्याय व छळ दिसतील तेथे तेथे लेखणी घेऊन लढावयाला तो सदैव सज्ज असेच. सेंट बूव्हे लिहितो, ''प्रत्येकजण व्हॉल्टेअरकडे येई. कोणी त्याचा सल्ला मागत, कोणी त्याला आपल्यावर होणारे अन्याय निवेदीत व त्याचे साह्य मागत. तो काणासही नकार देत नसे, निराश करीत नसे.''

त्याला मनानें वा शरीरानें बरेच दिवस विश्रांती घेणे अशक्य असे. वयाची त्र्याऐंशीं वर्षे होत आली तरीही जीवनात प्रत्यक्ष धडपड करावी, स्वस्थ बसू नये असे त्याला वाटे. आपले मरण जवळ आले असे वाटून तो पॅरिसला अखेरची भेट द्यावयाला म्हणून आला. पॅरिसमध्ये त्याचे स्वागत झाले ते जणू ऐतिहासिकच होते! पण हा सारा प्रवास, हे भव्य स्वागत त्याच्या प्रकृतीस झेपले नाही. त्याच्या स्वागतार्थ रंगभूमीवर केल्या जाणार्‍या एका नाटकाला डॉक्टर 'जाऊ नका' म्हणून सांगत असताही तो गेला. सार्वजनिक रीत्या त्याचे ते शेवटचेच दर्शन होते.

तो मृत्युशय्येवर होता. एक धर्मोपदेशक त्याचा कबुलीजबाब घेण्यास आला. पण व्हॉल्टेअर म्हणाला, ''रोमन कॅथॉलिक चर्चवर माझी श्रध्दा नाही. मी ईश्वराची प्रार्थना व पूजा करीत मरतो. मित्रांवर प्रेम करीत पण शत्रूंचा द्वेष न करता रूढींचा तिरस्कार करीत मी देवाकडे जातो.'' पॅरिसमध्ये त्याला ख्रिश्चन धर्माप्रमाणें अंत्य संस्कार मिळाला नाही.

इंग्रजांवरील पत्रांत तो एके ठिकाणीं लिहितो, ''ऐझॅक न्यूटन हा सर्वांत मोठा मनुष्य होय. तो सर्वांत मोठा का? कारण, आपण त्याच्याचबद्दल मनांत पूज्यबुध्दी बाळगतो, जो सत्याच्या जोरावर आपली मने जिंकतो. बळजबरीने दुसर्‍यांची मने जिंकू पाहणाऱ्यांना आपण मान देत नाही.''  न्यूटनबद्दल व्हॉल्टेअरने लिहिलेले शब्दच व्हॉल्टेअरच्या मृत्युलेखासाठी उपयोगी पडण्यासारखे होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा