गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

महाराष्ट्रातील लोककला ५ : कीर्तन



लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला जेव्हा शिक्षणाचा आधार नव्हता, तेव्हा या लोककलांनी त्यांचे प्रबोधन केले, आजारांवर झाडपाल्यांची औषधे सांगीतली आणि ईश्वराच्या आधाराने जगण्यावरची श्रद्धा वृद्धिंगत केली.


लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.  या लोककलांचा घेतलेला एक संक्षिप्त वेध...

५. कीर्तन :

कीर्तने वाचा पवित्र। कीर्तने होय सत्पात्र।
कीर्तने प्राणिमात्र। सुशील होती...।।

समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून कीर्तनाचा महिमा स्पष्ट होतो. महाराष्ट्र ही संत-महंतांची, वारकर्‍यांची भूमी आहे. या संस्कारमय ज्ञानतीर्थावर संत ज्ञानेश्र्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला व भागवत धर्म प्रसारकांनी ही इमारत तेजस्वी बनविली. संत तुकोबांच्या रूपाने भक्तिमार्गाचा कळस आणखी तेजाने चमकू लागला. धर्मापासून ते नित्यकमांपर्यंत आणि सामाजिक प्रश्नांपासून ते मोक्षापर्यंत प्रत्येक गोष्टीत संत समाजाचे मार्गदर्शक झाले, आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी ज्या साधनाचा सशक्त आधार त्यांना लाभला, ते म्हणजे कीर्तन.

संशोधकांच्या मते - कीर्तनाचा उगम उपनिषद काळात झाला-असा उल्लेख आढळत असला, तरी पुराणकाळात ही संस्था उदय पावली असावी. तर काही अभ्यासक कीर्तन परंपरा वैदिक काळापासून आहे असेही सांगतात.

नाचु कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जगी।

असे म्हणत विश्वाला ज्ञानाची कवाडे खुली करून देणारी ही कला एवढ्या दीर्घ काळानंतरही तेवढीच रसपूर्ण आहे. खेडोपाड्यातून आजही अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. या सप्ताहात महाराष्ट्रातले वेगवेगळे कीर्तनकार बोलवून प्रबोधनाचे कार्य केले जाते. रात्री होणार्‍या या भगवत भजनास पूर्ण गाव गोळा होतो.

वक्तृत्व, कथा-कथन, एकपात्री, काव्य, संगीत या सर्वांचा सुंदर मिलाफ असणारी ही कला अवगत करणे ही तशी अवघड बाब आहे. पण अनेक वर्षे अविश्रांत अभ्यास आणि साधना करून कीर्तनकार झालेले लोक आपल्या श्रोत्यांच्या मनावर आपल्या ज्ञानाचा व सादरीकरणाचा ठसा उमटविण्यात यशस्वी होतात.

संत ज्ञानेश्र्वर माउली, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा आदी संतांच्या अभंगांच्या अनुषंगाने भक्तिमार्ग सांगितला जातो, आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते, संसारापासून अ लिप्तराहण्यास सांगितले जाते. संत नामदेव हे कीर्तन कलेचे प्रवर्तक मानले जातात, त्यांच्या या क्षेत्रातील अधिकार मोठा मानला जातो.

कीर्तनकारांचेही वेगवेगळे संप्रदाय आहेत व त्या-त्या संप्रदायाच्या नियमानुसार ते कीर्तन करत असतात. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध परंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय.

वारकरी सांप्रदायिक कीर्तन -
मध्यभागी विणेकरी आणि त्याच्या शेजारी चोपदार उभा असतो. त्यांच्यामागे अर्धगोलाकारात टाळकरी उभे असतात. एका बाजूला मृदंगवादक तर दुसर्‍या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो.

प्रारंभी वीणेकरी (ज्याच्या गळ्यात वीणा आहे तो) रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरीहे नामसंकीर्तन सुरू करतो. मृदंगवादक भजनी ठेका धरतो आणि टाळकरी पदन्यास घेऊ लागतात. नामसंकीर्तनाची गती वाढत जाईल तसा वातावरणात उत्साह भरत जातो. त्यानंतर सुंदर ते ध्यान उभे विटेवरीहा ध्यानाचा अभंग होतो. अभंगानंतर जय जय विठोब्बा रखुमाईचा गजर होतो. हा गजर सुरू असतानाच डोक्याला केशरी फेटा, अंगात नेहरू झब्बा, कमरेला धोतर, खांद्यावर उपरणं, कपाळाला अष्टगंध व बुक्क्याचा टिळा लावून कीर्तनकार व्यासपीठावर येतात.  वीणेकर्‍याचं दर्शन घेऊन ते वीणा आपल्या गळ्यात घेतात. पुन्हा रामकृष्ण हरीहे भजन होते. रूप पाहता लोचनीहा रूपाचा अभंग होतो. पुन्हा रामकृष्ण हरीभजन व त्यानंतर निरूपणासाठी घ्यावयाचा अभंग गायला जातो. यानंतर विठोब्बा रखुमाईह नामस्मरण घेऊन, वीणा दुसर्‍याकडे देऊन कीर्तनकार निरूपणाला सुरुवात करतात. दृष्टांत, कथा, विनोद, श्र्लोक, ओव्या, इतर अभंग अशा अनेक गोष्टींचा आधार घेऊन, त्या अभंगाचा अर्थ ते लोकांना उलगडून सांगतात.

वारकरी संप्रदायाबरोबरच कीर्तनकलेसाठी ओळखले जाणारे इतरही संप्रदाय आहेत. नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, भराडी हरिकथा, कैकाडी सांप्रदायिक कीर्तन, संत गाडगेबाबा संप्रदायाचे कीर्तन-असे इतर अनेक संप्रदाय असून, त्यांच्याशी संबंधित कीर्तनप्रकारआहेत. सर्व संप्रदायांतील कीर्तनांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे सामान्य जनांना लौकिक सुख-दु:खांचा सामना करण्यास सक्षम बनवणे व त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे.

स्वातंत्र्यसंग्रामा दरम्यान लोकमान्य टिळकांनी कीर्तनाला राष्ट्रजागृतीचे साधन बनविले. कीर्तनातून समाज सुधारकांची, क्रांतिकारकांची चरित्रे गायली जाऊ लागली. लोकसंपर्क आणि प्रबोधनासाठी उपयुक्त अशा या कलेने  स्वातंत्र्य समरातही आपले योगदान दिले. आजही ही कला आपले प्रबोधनाचे कार्य अखंडपणे करत आहे.

शतकानुशतके चालत आलेली ही कला मोक्षमार्गाचा, ज्ञानप्राप्तीचा, जनजागृतीचा प्रवाह बनून अखंड वाहत राहील यात शंका नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा