मंगळवार, ३१ मे, २०१६

आज बेडा पार पांडू!



आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?
जो तुला भेटेल नेता, त्यास जोडे मार पांडू!
दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई,
एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?
वीज कोठे? आढळेना आपल्या राज्यात 'पाणी',
राहिला हा घोषणांचा तेवढा अंधार पांडू!
संपला आता जमाना दुश्मनी टाळावयाचा,
आपुल्या भीतीवरी तू मार आता धार पांडू!
भाड खाण्याचेच ज्यांनी भक्तिभावे काम केले,
हे कशासाठी तयांचे चालले 'सत्कार' पांडू?
आजची न्यारीच होळी! पाज तू साहित्यिकांना...
तेवढा नाहीस का तू काय 'दर्जेदार' पांडू?
जाण तू आता नवे हे अर्थ शब्दांचे नव्याने,
हीच आहे देशसेवा! हा न भ्रष्टाचार पांडू!
पोसलेले 'संत' केव्हा राहती बाबा उपाशी?
जे असे मोकाट त्यांचे लाड झाले फार पांडू!
घालतो हल्ली शहाणा देवही अर्धीच चड्डी
अर्धचड्डीनेच होई आज बेडा पार पांडू!
काय मंत्री ठेवण्याचे हे नवे गोदाम आहे?
शोध या मंत्रालयी तू फक्त 'गांधी-बार' पांडू!
शेवटी सारेच झाले पक्ष एका लायकीचे!
आपुल्या ह्या भारताला कोणता आधार पांडू?
सोसणार्‍याच्या भुकेला 'जात' कैसी? 'धर्म' कैसा?
हा कशाचा धर्म ज्याचा होतसे व्यापार पांडू?
ही महागाई अशी अन् ही कशी होळी कळेना,
बोंबले हा देश सारा, बोंब तूही मार पांडू!

सुरेश भट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा