रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

गूढ ...

अनाकलनीय गूढ गंधाळत राहतं,
मनाच्या हिंदोळ्यावर
झुलत राहतं भूत-भविष्यात
मन तयार करत असतं ताळेबंद
सुख-दुःखांच्या क्षणांचा ...
जेव्हा
का, कसं, कोण, कुणासाठी,
जगण्याचं हरवलेलं प्रयोजन शोधताना
ते सापडतच नाही कुठेच अनंत प्रयत्नांती
तेव्हा अधिकच गुंतत जात गूढ
फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचं...
तरीही गूढ गंधाळत राहतं
चंदनासारखं
झिजत झिजत
देवत्त्वाच्या ठायी
पावन होण्यासाठी...
गूढ गंधाळत राहतं
मेंदीच्या पानासारखं
एखादीच्या हातावर
एखाद्याच्या नावाचे
रंग भरण्यासाठी...
अखेर आयुष्याच्या सांध्यपर्वातही
बेचैन मनःशांतीची भेट देत
गूढ गंधाळत राहतं
अखेरपर्यंत
कायमचं...


प्राजक्ताची फुलं...



आजची सकाळ मन धुंद करीत होती,
का? ते मात्र कळत नव्हतं,
सहजच मनात विचार आला,
सकाळ तर रोजच येते,
मग आजची सकाळ वेगळी का भासते?
या विचारातच मी चालत होते,
चालता चालता परिचित-अपरिचित अशा
माझ्या आवडत्या प्रजाक्तापाशी आले,
नेहमी कुणाकडून तरी वेचली जाणारी
प्राजक्ताची फुलं आज तिथेच होती...
त्या फुलांकडे पाहून मनात विचार आला,
नेहमी देवघरात सजणारी फुलं आज इथे का?
वाटलं जणू ती माझ्या प्रतीक्षेत असावीत,
माझ्या पोळलेल्या पायांना संजीवनी देण्यासाठी...
त्यांचा तो मंद गंध मनाला स्पर्शून गेला,
पुढे पाऊल टाकण्याचं धाडसच होईना,
त्या इवल्याशा फुलाच्या चिमुकल्या पाकळ्या,
जणू काही मला खुणावत होत्या...
मी काहीक्षण थांबले अन् पापण्या मिटल्या,
त्यांच्या सुगंधात मी बेधुंद झाले,
मात्र ती फुलं वेचण्याचा मोह मी आवरला,
अन् अस्वस्थतेतच माझी जड पावले उचलली...
मनात आलं, काय करणार मी त्या फुलांचं?
क्षणिक सुगंध घेऊन कुस्करुनच टाकणार ना?
क्वचित केसात माळणार ...
पण त्यातून काय मिळवणार?
फक्त क्षणभंगुर आनंदच ना?
त्यापेक्षा ती फुलं तिथेच असू देत,
माझ्यासारख्या इतरांची मनं धुंद करू देत,
त्यांच्या रोजच्या सकाळची रम्य सकाळ करू देत,
अन् त्यांच्याही हृदयाच्या रसिक कोपऱ्याला
आपल्या सुगंधाचा अनमोल ठेवा देऊ देत...




शृंगार...

पायात नुपुरे त्यांचा रव रुणुझुणू
वनात खळाळे जसा निर्झरच जणू...
पावसाच्या प्रेमात वसुंधरा न्हाई
आज माळली पुन्हा कुंतलात जाई...
डोळ्यात काजळ जसे नभ मेघांनी भरले
तुझी जाणीव होऊन मन स्वतःशी हासले...
हातात कंकण किती किणकिण करे,
वाट किती बघू जीव तुझ्यासाठी झुरे...
माझा हा शृंगार फक्त तुझ्यासाठी आहे
या श्वासांच्या गावी तुझेच नाव आहे...





शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

भूक

जेव्हा जेव्हा
भुकेशी लढा द्यायला
कुणी उभा राहतो,
सुंदर दिसू लागतो...

झडप घालणारा गिधाड,
फणा काढलेला नाग,
दोन पायांवर उभी राहून
काट्यामधून लहान लहान पानं खाणारी शेळी,
दबक्या पावलांनी झाडीत चालणारा चित्ता,
झाडावर उलटं लटकून
फळ खाणारा पोपट
की या प्रत्येक ठिकाणी
असायला हवा माणूस?

जेव्हा जेव्हा
भुकेशी लढा द्यायला
कुणी उभा राहतो,
सुंदर दिसू लागतो...



शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

दोन मिनिटांचं मौन...


बंधुंनो आणि भगिनींनो
हा दिवस मावळत आहे
या मावळत्या दिवसासाठी
दोन मिनिटांचं मौन...

परतणाऱ्या पक्ष्यासाठी
स्थिरावलेल्या पाण्यासाठी
दाटून आलेल्या रात्रीसाठी
दोन मिनिटांचं मौन...

जे आहे त्याच्यासाठी
जे नाही त्याच्यासाठी
जे असू शकलं असतं त्याच्यासाठी
दोन मिनिटांचं मौन...

पडलेल्या टरफलासाठी
झोडपलेल्या गवतासाठी
प्रत्येक योजनेसाठी
प्रत्येक विकासासाठी
दोन मिनिटांचं मौन...

या महान शतकासाठी
महान शतकाच्या
महान उद्दिष्ठांसाठी
महान शब्द
आणि महान वचनांसाठी
दोन मिनिटांचं मौन...

बंधुंनो आणि भगिनींनो
या महान विशेषणासाठी
दोन मिनिटांचं मौन...

मूळ कविता : दो मिनट का मौन
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी




दोन माणसं...

तुम्ही एकट्या माणसाला पर्वत उतरताना पाहिलंय?
मी म्हणेन - कविता
एक अप्रतिम कविता ...

पण तुम्ही त्यांना काय म्हणाल,
ती दोन माणसं जी त्या झाडाखाली बसली आहेत?
फक्त दोन माणसं...

किती तास किती दिवस किती शतकांपासून
तिथे बसली आहेत ती दोन माणसं
काय तुम्ही सांगू शकता?

दोन माणसं जरा वेळाने उठतील .
आणि साऱ्या शहराला आपल्या पाठीवर टाकून
कोणत्यातरी नदी वा पर्वताकडे चालू लागतील ती दोन माणसं...

दोन माणसं काय करतील या दुनियेचं
तुम्ही काही सांगू शकत नाही !
दोन माणसं परत येतील
एखाद्या भर दुपारी रस्त्याच्या कडेला
तुम्हाला अचानक भेटतील दोन माणसं...

पण का दोन माणसं
आणि नेहमीच दोन माणसं...

काय एकाला तोडून बनतात दोन माणसं?

दोन माणसं तुमच्या भाषेत घेऊन येतात
किती शहरांची धूळ आणि उच्चारणे
काय तुम्हाला माहित आहे?

दोन माणसं
रस्त्याच्या कडेने फक्त शांतपणे चालणारे दोन माणसं
तुमच्या शहराला किती अनंत बनवतात,
तुम्ही कधी विचार केला आहे?


मूळ कविता : दोन माणसं
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

आत्मचित्र

एक रेषा
पृथ्वीच्या साऱ्या अक्षांना पार करून
जिथे
सूर्य-मंडळाच्या जवळ
हरवून जाते,
तिथे
मी उभा आहे.

मासे पकडण्याचं
एक जाळ
नदीतून काढून
पेलून धरलंय
माझ्या या चिरंतर आदिम खांद्यांवर-
हे माझं नगर आहे.

हास्याची एक झालर
टांगली आहे ताऱ्यांवर
वाऱ्याच्या धक्क्याने
जिथे झुकते
तिथे माझं घर आहे.
छोटंसं घर आहे
आणि छोट्याशा घरामधे
असंख्य दिशा आहेत.
प्रत्येक दिशा
वेगाने
दुसऱ्या दिशेला
जिथे स्पर्श करते
तिथे—

मी जिवंत आहे.

चंद्र

जशी कारागृहातली चिमणी
चंद्र ही तसाच,
एका झाडाच्या निष्पर्ण फांदीला लटकणारा,
आणि आपण
म्हणजे पृथ्वीवरचे सारे कैदी आनंदात,
कि असो काहीतरी आहे
ज्याच्यामुळे आपण पाहू शकतो

एकमेकांचा चेहरा !

बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४

नकाशा

एक मुलगा नकाशा बनवतो.
तुम्हाला माहित आहे का, तो कुठे जातो?

एक मुलगा नकाशात रंग भरतो.
तुम्हाला माहित आहे का, तो कुठे गेला?

एक मुलगा नकाशा फाडून टाकतो.
तुम्हाला माहित आहे का, तो कुठे पोहोचला?

जर तुम्हाला माहीत असतं,
तर तुम्ही गप्प बसला नसतात,

आत्तासारखे.....

शवविच्छेदनाचा अहवाल

गोळी लागल्यानंतर,


एकाच्या मुखातून निघालं,
‘राम’ ...


दुसऱ्याच्या मुखातून निघालं,
'माओ’ ...


पण
तिसऱ्याच्या मुखातून निघालं,
‘भाकरी’


शवविच्छेदनाचा अहवाल सांगतो,
कि पहिल्या दोघांचे

पोट भरलेले होते...

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०१४

मुंडण.

"आता किती वेळ तो पेपर वाचीत बसणार आहात? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलंय ते संपवायला सांगा!" माझी पत्नी आतून ओरडली.
स्थिती गंभीर वळण घेणार असे दिसले. मी पेपर बाजुला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो. सिंधू, माझी एकुलती एक लाडाची लेक रडवेली झालेली होती. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते. तिच्यापुढे एक दहिभाताने पूर्ण भरलेलं भांडं होतं.
सिंधू तिच्या वयाच्या मानाने शांत, समजुतदार आणि हुशार मुलगी होती. मी भांडं उचललं आणि म्हणालो,
बाळ, तू चार घास खाशील का? तुझ्या बाबासाठी?
सिंधू थोड़ी नरमली, पालथ्या मुठीने डोळे पुसले आणि म्हणाली,
"चार घासच नाही, मी सगळ संपवीन."
थोड़ी घुटमळली आणि म्हणाली,
बाबा, मी हे सगळ संपवलं तर तुम्ही मला मी मागीन ते द्याल?
" नक्की"! तीने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले!
पण आता मी थोड़ा गंभीर झालो
" बाळ, पण तू कंप्यूटर किंवा दुसरं एखादं महागडं खेळणं मागशील तर आत्ता बाबाकडे तेव्हढे पैसे नाहीयेत बेटा!"
" नाही बाबा! मला तसं काही नको आहे!"
तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला.
मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खुप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढं खायला देतात? ते पण तिलाआवडणारं. पण मी गप्प बसलो!
सगळ मोठ्या कष्टाने खाऊन संपवल्यावर हात धुवून सिंधू माझ्यापाशी आली ती डोळे अपेक्षेने मोट्ठे करून.
आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या.
" बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकणार." तिची ही मागणी होती.
"हा काय मुर्खपणा चाललाय? काय वेड-बीड लागलंय काय? मुलीचे मुंडण? अशक्य." सौ. चा आवाज टिपेला गेला होता!
"आपल्या सगळ्या कुटुंबात असलं काही कुणी केलं नाही." आईने खडसावले. "ती सारखी T V पहात असते. त्या T V मुले आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत!"
"बेटा, तू दुसरं काही का मागत नाहीस? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दू:खी होऊ. तुला आम्हाला बघवेल का सांग?"
"सिन्धु, बेटा आमचाही विचार कर" मी विनवणीच्या स्वरात म्हटले.
"बाबा, तुम्ही पाहिलंत ना मला तो दहीभात संपवणं किती जड़ जात होत ते!" आता ती रडायच्या बेतात होती. " आणि तुम्ही मला त्याबदल्यात मी मागीन ते द्यायच कबूल केलं होतत. आता तुम्ही मागे हटता आहात. मला कोणत्याही परिस्थितीत दिलेलं वचन पाळणाऱ्या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना? आपण दिलेली वचने आपण पाळलीच पाहिजेत"
मला आता ठामपणा दाखवणे भाग होते.
"काय डोकं-बिकं फिरलंय का?" आई आणि सौ एकसुरात म्हणाल्या.
"आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही तर सिंधू पण दिलेला शब्द पुढल्या आयुष्यात पाळनार नाही. तीची मागणी पूर्ण करावीच लागेल."
गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल असल्याने आता तीचे डोळे खुप मोठे आणि सुन्दर दिसत होते. सोमवारी सकाळी मी तिला शाळेत सोडायला गेलो. मुंडन केलेली सिंधू शाळेत जाताना पाहणं एक विलक्षण दृष्य होतं. ती मागे वळली आणि टाटा केला. मीही हसून टाटा केला.
तेंव्हाच एक मुलगा कार मधून उतरला आणि त्याने तिला हाक मारली," सिंधू, माझ्यासाठी थांब." गंमत म्हणजे त्याचे ही टक्क्ल केलेले होते. अच्छा, हे अस आहे तर. मी मनात म्हणालो.
त्या कारमधून एक बाई उतरल्या आणि माझ्यापाशी आल्या. " तुमची सिंधू किती गोड मुलगी आहे! तीच्या सोबत जातोय तो माझा मुलगा, हरीश नाव आहे त्याचं. त्याला ल्यूकेमिया झालाय. येणारा हुंदका त्यानी आवंढा गिळून दाबला आणि पुढे म्हणाल्या, गेला पूर्ण महीना तो शाळेतआला नाही. केमोथेरपी चालु होती. त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता. कारण मुद्दाम नाही तरी सहाजिकच मुले चिडवणार. सिंधू मागच्याच आठवडयात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिडवणाऱ्यांना मी पाहून घेईन. पण तू शाळा बुडवू नकोस.मी कल्पनाही केली नव्हती की ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल. तुम्ही तिचे आई-वडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे"
ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यातून अश्रु ओघळले. मी मनाशी म्हणत होतो, माझी छोटीशी परी मलाच शिकवते आहे, खरं निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते!
या पृथ्वी वर ते सुखी नव्हेत जे स्वत:ची मनमानी करतात. सुखी तेच की जे दुसऱ्यावर जीवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वत:ला बदलायलाही तयार होतात.


आपल्यालाही आपलं आयुष्य सिंधुसारखं बदलता यायला हवं नाही का?


प़ी. नारायण मुर्ती यांनी लिहिलेल्या कथेचे हे भाषांतर.


सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

महानगरातील एक कवी...

या एवढ्या मोठ्या शहरात
कुठेतरी राहतो एक कवी,
तो राहतो असा जणू विहिरीत राहते शांतता,
जसे शांततेत राहतात शब्द,
शब्दांमध्ये असतो पंखांचा फडफडाट,
तो राहतो एवढ्या मोठ्या शहरात
आणि कधीच काही बोलत नाही...
फक्त कधी-कधी
विनाकारण
तो होतो अस्वस्थ
पुन्हा उठतो
बाहेर पडतो
कुठून तरी शोधून आणतो एखादा खडू
सामोरच्या स्वच्छ चमकदार भिंतीवर
लिहितो ‘क’...

एक छोटासा
साधासा ‘क’
खूप वेळ गुंजत राहतो संपूर्ण शहरात...

‘क’ म्हणजे काय?
एका म्हातारीने एका शिपायाला विचारलं,
शिपायाने विचारलं
अध्यापकाला,
अध्यापकाने विचारलं
वर्गातल्या सर्वात शांत विद्यार्थ्याला...

‘क’ म्हणजे काय?
साऱ्या शहराने विचारलं...

आणि एवढ्या मोठ्या शहरात
कुणालाही नाही माहित
की तो जो कवी आहे
जो प्रत्येकवेळी उंचावतो हात
जो स्वच्छ चमकत्या भिंतीवर
लिहितो ‘क’
त्याची केली जाते हत्या...

फक्त एवढंच सत्य आहे की
बाकी सर्व ध्वनी आहेत,
अलंकार आहेत,
रस-भेद आहेत,
मला त्याच्याबद्दल यापेक्षा अधिक
काहीच माहित नाही
मला खंत आहे...

मूळ कविता : महानगर में कवी
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

परतलेला पक्षी...

आज पुन्हा त्या पक्ष्याला पाहिलं
ज्याला गेल्या वर्षी पाहिलं होतं
जवळपास याच दिवसांत
याच शहरात...

काय नाव आहे त्याच,
खंजन,
टिटवी,
निळकंठ,
मला काहीही आठवत नाही,
मी किती सहज विसरून जाते
पक्ष्यांची नावं,
मला विचार करूनही भीती वाटते...

पण नेमकं नाव काय होतं त्याचं,
मी उभ्या-उभ्या विचार करते
आणि डोकं खाजवते,
हा या माझ्या शहरात
एका लहानशा पक्ष्याच्या परत येण्याचा विस्फोट होता,
ज्याने भर रस्त्यात
मला हादरवून सोडलं...



मूळ कविता : पक्षी की वापसी
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

मराठीने मला काय दिलं?




माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा,
तिच्या संगे जागतील
मायदेशातील शिळा

कुसुमाग्रजांनी केलेला हा गौरव यथार्थच आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी हि केवळ बोली नसून तिनेच आजचा महाराष्ट्र घडवला आहे. मग ती महाराष्ट्राच्या आधुनिकतेला, समाजसुधारणेला कारणीभूत असणारी साहित्यिक चळवळ असो किंवा मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याकरिता उभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो. मराठी भाषेने खऱ्या अर्थाने मायदेशातील शिळा जागवल्या. महाराष्ट्राला त्याच्या अस्मितेची जाणीव करून दिली. अनेक विद्यार्थ्यांची ती ज्ञानभाषा झाली. साहित्यिकांची स्त्रोतभाषा झाली. अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती आणि साहित्यिक तिने भारतीय वाड्मयविश्वाला दिले. अशा या माझ्या मायमराठीने मलाही घडवले. माझ्या व्यक्तिमत्त्वावर उमटलेल्या तिच्या अमीट ठश्याची जाणीव मला कधी कधी प्रकर्षाने होते. अन् मग मी विचार करू लागते की, मला मराठीने नेमकं काय दिलं?
मराठीने मला काय दिलं या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. मात्र ती जितकी सोपी तितकीच कठीणदेखील आहेत. मुळातच परस्पर संवाद साधण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी समाजाने भाषेची निर्मिती केली. त्यायोगे मराठीने मला माझी भाषा दिली. मराठी भाषिक म्हणून ओळख दिली. एका प्राचीन आणि समृद्ध साहित्य संस्कृतीची वारस होण्याचा सन्मान दिला. मनातील अव्यक्त भावनांच्या प्रकटीकरणासाठी शब्द दिले. आपल्या विपुल शब्दभंडाराने शब्दांना शस्त्राचे सामर्थ्य दिले. मनाच्या निवांत पोकळीला विचारचक्राचे अनुष्ठान दिले. माझ्या मराठीने मला माझं मीपण दिले.
जन्माला येण्यापुर्वीच आईच्या गर्भसंस्कारातून माझ्यापर्यंत पोहोचली. आईने वाचलेली ज्ञानेश्वरी, दासबोध तिने माझ्या नसानसात भिनवले. जन्माला आल्यानंतर आई-बाबांच्या लाडिक बोलण्यातून, पेंगुळलेल्या कानांनी ऐकलेल्या अंगाईतून ती सतत कानात गुंजत राहिली. तिच्या अंगाईतून मी चांदोबा मामाचा चिरेबंदी वाडा पहिला. गोठ्यातली गाय पहिली. परसातली जाई पहिली. ताटातला मौ भात संपवताना तिच्या गोष्टीतले चिऊ काऊ आले. त्यांची शेणा-मेणाची घरं आली. मावळत्या दिनकरासोबत दिव्या दिव्या दिपत्कार म्हणत संस्कार करू लागली. अजाणत्या वयात इसापनीती आणि पंचतंत्रातून तिने मला व्यवहारज्ञान दिले. कधी बिरबल तर कधी तेनालीराम बनून तिने मला हजरजबाबीपणा शिकवला. प्रत्यक्ष जन्मदा देवकी तर मला घडवणारी माझी मराठी यशोदा ठरली. लहानग्या वयात माझ्या मराठीने मला आईची माया दिली. आजीचे संस्कार दिले.
कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील अविस्मरणीय काळ म्हणजे शालेय जीवन. माझं सारं शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं. पर्यायाने मराठीने माझं सारं जीवनच व्यापून टाकलं. लोकमान्य टिळक म्हणतात की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिले गेले तर विद्यार्थ्यांना त्याचे चांगल्याप्रकारे आकलन होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे मराठीने माझ्या अभ्यासाचा पाया मजबूत केला. तिने मला सोप्या भाषेत गणित, विज्ञान शिकवलं. इतिहासाची जाण दिली. भूगोलाची सफर घडवली. बालभारतीच्या पुस्तकाशी तर माझी गट्टीच होती. त्यातील कमल धरण बघ पासून सुरु झालेला प्रवास श्यामच्या आईच्या ओचल्यातून पार विनोबांच्या दारातील फणसापर्यंत फारच रंजक होत गेला. या काळात मी कधी सानुली मंद झुळूक झाले तर कधी आजीजवळचे चमत्कारीक घड्याळ शोधले. या काळात मराठीने माझी अनेक व्यक्तींशी भेट घडवून आणली. अगदी म्हाइंभट, महदंबा, मुकुंदराज, ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, तुकाराम, नामदेव, मुक्ताई. जनाई अशा अनेक संत, पंत मंडळींनी मनात अध्यात्मिकता रुजवली. कथा, कविता, प्रवासवर्णने, नाटके, ललितलेख असे अनेक साहित्यप्रकार मी अभ्यासले. त्यातून मी अनेक गावे पहिली. विविध देशांना भेटी दिल्या.
शालेय जीवनात माझ्या मराठीने मला वाचनाचा वसा दिला. कधीही न पाहिलेल्या, न कल्पिलेल्या अनेक अमूर्त कल्पनांचे शब्दचित्र माझ्यासमोर उभे केले. पुढे महाविद्यालयीन जीवन जगतानाही तीच माझी सखी झाली. आंबेडकर, फुले यांच्या साहित्यातून ती मला सामोरी आली. माझ्या विचारांची एक समृध्द बैठक तिने निर्माण केली. कधी सावरकरांच्या तर कधी खांडेकरांच्या साहित्यातून ती डोकावली. कवितांच्या रूपाने ती माझी प्रेयसी झाली. वैचारिक लेखनातून बाप झाली. अभंगवाणीतून माय झाली. वक्तृत्वासाठी उभी राहताना ती माझा सखा बनली. तिची प्रचंड ग्रंथसंपदा पाहताना मला सतत जाणवत राहिलं, मला अजून खूप शिकायचंय. खूप वाचायचंय. तिच्यातील या ग्रंथसंपदेने माझ्या अहंकारावर अंकुश ठेवला. मराठीचा अभ्यास करताना मी विविध वाङ्मय प्रवाह अभ्यासले. त्यातून समाजातील अनेक समस्या माझ्या समोर आल्या. मराठीतील या साहित्य प्रवाहांनी मला कोणत्याही घटनेकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी दिली.
मराठीने माझ्या मनात संवेदनशीलता रुजवली. मला सृजनाचं दान दिलं. संवेदनशीलतेला काव्याचा अंकुर फुटला. मीही कविता करू लागले. माझ्या कवितांना मी जन्म दिला. जणू मराठीनेच मला हे मातृत्व दिलं. मराठीवरील प्रभुत्वामुळेच मी अनेक स्पर्धेत यश मिळवू शकले. मराठीनेच मला ओळख दिली. मराठीनेच मला माझ्यातली मीदिली. आणि म्हणूनच मनापासून म्हणावंस वाटतं,
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...






मराठी दिनानिमित्त आयोजित निबंधलेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता  निबंध.
दै. प्रहार - २८ फेब्रुवारी २०१३ - मराठी राजभाषा दिन विशेषांकात प्रकाशित.

सलाम...

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्‍याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.

वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्‍केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्‍यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोपडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धद्यांच्या मालकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुक फंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वाचणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन काढतील 
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

 सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकीन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.



मंगेश पाडगावकर.