गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

विरह...

नभ अंधारून आले, मेघांची झाली गर्दी,
गार वाऱ्यावर स्वार तुझ्या खुशालीची वर्दी...
वारा वाहे सोसाट्याचा त्याचा गाव नाही कोठे,
मन असे मोहजाल त्याचे अंदाजही खोटे...
भेगाळली भूमी गाई कोरडीच गाणी,
विसरुनी मला नाही तुझ्या डोळी पाणी...
वाट धावते खुशाल तिला अंत नाही ठाव,
माझ्या अश्रूंच्या पल्याड आहे उभा तुझा गाव...
विसरले मी ती वाट जी जाई तुझ्यापाशी,
तो गाव होता रामेश्वर होती तीच मला कशी...
एक नजर उदास फिरे पुन्हा भवताली,
निरभ्र नभावर चढे मावळतीची लाली...
पुन्हा उगवेल सूर्य नवा दिवस घेऊन,
उजळेल यशोदीप नवा सत्कार लेऊन...
रोज दिसामाजी सूर्य करी पृथ्वी पादाक्रांत 
त्याच्या मागे अंधारात कुणी शांत झाली वात...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा