शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

माझं घर - माझ्या आनंदाचा ठेवा...


माझं घर माझं घर
होतं समुद्रकिनारी,
खारा वारा वाहे तिथे
उधाण मनाच्या लहरी...
माडांची बाग होती
माझ्या घराभोवताली,
त्यांच्या झावळ्यांची सळसळ
गुंजे आज माझ्या कानी...
लाल मातीच्या भिंती
मना आधार द्यायच्या,
रात्रू साथ द्याया होत्या
लाटा सागराच्या...
एके दिनी फिरले
चक्र माझ्या नियतीचे,
दारी येऊन ठेपले
संकट चक्रीवादळाचे...
लाटावरी लाटा आल्या
माझ्या घराच्या भिंतींवर,
त्यांचाही खचला धीर
ते वादळ पाहून...
एकेक लाट येई
भरे धडकी उरात,
ते तांडव पाहून
येई पाणी डोळ्यात...
साऱ्या घराच्या भिंती
त्यांनी गिळंकृत केल्या,
उघड्यावर टाकून आम्हा
त्या आसुरी हासल्या...
झाले उद्ध्वस्त जीवन
जमीनदोस्त झाले घर,
हरपले आमचे छत्र
झालो आम्ही निराधार...
सोडून ते घर आम्ही
नव्या वाटा शोधल्या,
अश्रू ढाळत स्वतःशी
भिंती तिथेच राहल्या...
त्या मोडक्या घराचा
आजही वाटतो हेवा,
त्यात आहे अद्याप
माझ्या आनंदाचा ठेवा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा