मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

प्रातिनिधिक मराठी कवितांमधील बदलते पर्यावरणीय संदर्भ


प्रस्तावना
       साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे प्रतिबिंब त्यात दिसते. त्यामुळे सभोवतालच्या पर्यावरणाचे विविध संदर्भ साहित्यात आढळतात. सामान्यतः विविध प्रकारची जीवसृष्टी आणि मानवसमूह ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील सर्व घटकांचा समावेश पर्यावरण या संकल्पनेत केला जातो. मात्र पर्यावरणाचे आधुनिक अभ्यासक यामधे प्राकृतिक परिसरासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भांचाही समावेश करतात. त्याच अनुषंगाने मराठी कवितेतील बदलत्या पर्यावरणीय संदर्भांचा आढावा या प्रकल्पातून घेण्यात आला आहे.
प्रकल्पलेखनाचा उद्देश
१ साहित्य समाज अन्योन्य संबधाच्या दृष्टिकोणातून मराठी कवितेच्या विविध टप्प्यावरील पर्यावरणीय संदर्भांचे स्वरूप अभ्यासणे
२ मराठी कवितेच्या विविध टप्प्यांवर आढळणाऱ्या विविध पर्यावरणीय संदर्भांच्या उपयोजनामागील प्रेरणा अभ्यासणे
३ विविध कालखंडातील कवितांमधील पर्यावरणीय संदर्भांच्या आधारे तत्कालीन पर्यावरणाच्या परिस्थितीचा आढावा घेणे
४  कवितांमधील पर्यावरणीय संदर्भांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बदलांचे स्वरूप अभ्यासणे
४ भविष्यकाळात पर्यावरण संरक्षणासाठी साहित्यातील पर्यावरणीय संदर्भांची गरज अभ्यासणे

संशोधन पद्धती
या प्रकल्पाकरिता तौलनिक संशोधन पद्धती वापरण्यात आली आहे. या पद्धतीप्रमाणे विविध कालखंडातील प्रातिनिधिक कवितांचा आढावा घेऊन त्यातील पर्यावरणीय संदर्भांचे स्वरूप तुलनात्मकरीत्या अभ्यासले आहे. त्याचप्रमाणे प्रश्नावलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन मिळालेल्या माहितीवर आधारित निष्कर्ष काढण्यात आले आहेत.


प्रत्यक्ष संशोधन

१ प्राचीन मराठी काव्य (आद्यकाल ते इ. स. १८१८)
मराठीमधील आद्यलेखनाचा मान महानुभाव संप्रदायाकडे जातो. त्यातील नरेंद्र यांच्या काव्यलेखनात अनेक पर्यावरणीय संदर्भ आढळतात.
प्राचीन मराठी साहित्यात विपुल काव्यरचना केली आहे ती वारकरी संप्रदायाने. संत साहित्यानंतर पंडिती काव्यामधेही निसर्गाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. संस्कृतप्रचुरकाव्यरचना करणाऱ्या पंडितांनी संस्कृत महाकाव्यांच्या धर्तीवर मराठी काव्यात पर्यावरणीय संदर्भ आणले आहेत.
१)    वसंतु माजिरा कैसा
सूर्याते करी पद्मिणी धरी दिसा
दिनकरू भूलला तेया रसा
म्हणौनि वेगां न ढळे ॥                                   
 (नरेन्द्र कृत रुक्मिणीस्वयंवर)

२)    पैल तो गे काऊ कोकताहे | शकुन गे माये सांगताहे ||            (ज्ञानेश्वर कृत विराणी)

३)    तेथील एक कलहंस तटीं निजेला|
जो भागला जलविहार विशेष केला||
पोटीच एक पद, लांबविला दुजा तो|
पक्षी तनु लपवि, भूप तया पाहतो||||                   
 (रघुनाथ पंडित कृत दमयंती स्वयंवर)

प्राचीन मराठी कवितेत येणारे पर्यावरणीय संदर्भ हे विशेष सहजरीत्या आलेले दिसतात. जनसामान्यांपासून वंचित असणारे संस्कृतमधील ज्ञान मराठीतून समजावून देण्याकरिता संतानी सभोवतालची पर्यावरणातील विविध घटकांचा उदाहरणे म्हणून वापर केलेला आढळतो. या काळातील कवितांमधील पर्यावरणीय संदर्भ थेटपणे पर्यावरणीय समस्या मांडत नाहीत. फक्त त्या काळातील पर्यावरणाचे निकोप स्वरूप व्यक्त करतात.


२. मध्यकालीन मराठी काव्य (इ.स.१८१८ ते इ. स. १९६०)
इ. स. १८१८मध्ये पेशवाईच्या अस्तानंतर मराठी साहित्यनिर्मितीला उतरती कळा लागली. मात्र १८७४नंतर केशवसुतांच्या उदयाने ही स्थिती पालटली. अव्वल इंग्रजी काळात पाश्चात्य साहित्याचा परिचय मराठी तरुणांना होऊ लागला. पाश्चात्य साहित्यशास्त्रातील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीतून प्रेरणा घेऊन मराठीत काव्यनिर्मिती होऊ लागली. परिणामतः इंग्रजी साहित्याच्या धर्तीवर मराठीकाव्यात पर्यावरणीय संदर्भ येऊ लागले. उदा:

१)    संध्याकाळ असे, रवी उतरतो आहे समुद्रावरी,
  त्याचे बिम्ब सुरेख चुम्बिल पहा या लाटांस लौकरी,
  मातीला मिळूनी गाळूनि पडलें तें पुष्प जाई जसें,
 लोपला लहरींत मंडलहि हें जाईल आतां तसें|                
(केशवसुत कृत संध्याकाळ)

२)    ऐल तटावर पैल तटावर हिरवळी लेऊन,
  निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटामधून,   
  चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे,
  शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे.                      (बालकवी कृत औदुंबर)

मात्र हे संदर्भ केवळ वर्णनात्मक आहेत. काहीवेळा या पर्यावरणीय संदर्भांचा वापर उपमा देण्यासाठी केलेला दिसतो. त्याचप्रमाणे ग्रामीण निसर्गपरिसर, त्याचे गुणरूप याबाबतच्या रूढ कल्पनांचे पर्यावरणही जाणवते.


३. आधुनिक मराठी काव्य (इ.स.१९६० ते पुढे)

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिकीकरणाची लाट आली. तळागाळातील जनसामान्य शिकू लागले. आणि आधुनिक जीवनशैली आत्मसात करण्याच्या प्रयत्नात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊ लागल. परिणामतः सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा सर्वच क्षेत्रातील प्रदूषणाचे भीषण परिणाम सर्वत्र दिसू लागले. या उद्ध्वस्ततेच वास्तव समाजापुढे मांडण्याचे प्रयत्न आधुनिक कवितेने केले.

१)     किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो
       किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो...........
.................
बरा म्हणून हा इथे  दिवा पारवा पाऱ्याचा
       बरी तोतया नळाची शिरी धार सुखी ऋचा.                 
    (बा. सी. मर्ढेकर)

२)     वारे वाहतायत; 
     पण स्पर्शत नाही जराही सुखद गारवा,
तरंगतायत आसमंतात अपशकुनी सूर,
कोसळतायत अभाळस्पर्शी झाडे एकामागोमाग एक,
निरोपाचं न बोलताच....                 
( वारे वाहतायत- अनिल धाकू कांबळी)

जागतिकीकरणाच्या लाटेचा परिणाम म्हणून औद्योगिकिकरणात वाढ झाली. पर्यावरण प्रदूषित झाले. निसर्गाच्या अध:पतनाची ही दाहकता समाजासमोर मांडण्याचे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न या काळातील कवितेने केला.

निष्कर्ष

१.      प्राचीन काव्यातील पर्यावरणीय संवेदनांचे स्वरूप प्राधान्याने निसर्गाच्या इंद्रियगोचर प्रतीतीशी संबद्ध आणि सुसंवादी आहे. तर मध्यल्या काळातील काव्यातील पर्यावरणीय संदर्भ हे पाश्चात्य साहित्यातील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या प्रेरणेतून आलेले व वर्णनात्मक आहेत. आधुनिक काव्यात मात्र पर्यावरणाचे वर्णन करण्यापेक्षा त्याच्या ऱ्हासाचे वास्तव सांगण्याचा आणि त्यामाध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितांतील या बदलत्या पर्यावरणीय संदर्भांमागे सामाजिक परिस्थितील बदलांची भूमिका महत्त्वाची आहे.
२.      प्राचीन काव्यात संस्कृत साहित्यातील ज्ञान सामान्य जनांना समजून देण्यासाठी उदाहरणे म्हणून हे संदर्भ वापरले गेले. तर मध्यकाळात इंग्रजांचा प्रभाव आणि पाश्चात्य साहित्याची मोहिनी यातून या संदर्भांचे उपयोजन झाले. त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या गावाकडे चला या भूमिकेचा परिणाम म्हणूनही हे संदर्भ आले. बदलत्या जीवनशैलीतून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचे संभाव्य परिणाम समाजासमोर मांडण्यासाठी आधुनिक साहित्यात पर्यावरणीय संदर्भ वापरले गेले आहेत. प्रश्नावलीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अनेकजण कवितांतील या बदलत्या पर्यावरणीय संदर्भांच्या उपयोजानामागे अनुक्रमे सामाजिक, सांस्कृतिक बदलांना महत्त्व देतात. तर काहीजणांना राजकीय भूमिकांतील बदलही महत्त्वाचे वाटतात.
३.      प्राचीन साहित्यात सहजरित्या येणाऱ्या संदर्भातून तत्कालीन निकोप पर्यावरण लक्षात येते. तर मध्यकालीन कवितेतील निसर्ग वर्णानातून हे पर्यावरण टिकून राहिल्याचे दिसते. तर आधुनिक कविता पर्यावरणाचे उद्ध्वस्त रूप समोर आणते.
४.      प्राचीन काळात तंत्रज्ञानाच्या विकासाअभावी मानवी जीवन हे निसर्गाच्या जवळ होते. पर्यावरणातील प्रत्येक घटकाशी त्यांचा निकट सहवास होता. त्यामुळे पर्यावरणाचे निकोप स्वरूप काव्यात सहजरित्या उमटत होते. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर हे चित्र पालटले. भौतिक सुखे आणि श्रमविरहीत जीवनशैली मिळवण्याच्या प्रयत्नात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. या सर्व प्रक्रियेचा आढावा या तौलनिक अभ्यासातून घेता येतो.
५.      साहित्य हा समाजाचा आरसा  असतो. समाजातील स्थिती साहित्यात प्रतिबिंबित होते तर साहित्यात मांडलेले विचार समाजाला दिशा देतात. त्यामुळे साहित्यात मांडलेले पर्यावरण विषयक विचार, पर्यावरणवादी साहित्य संमेलने पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत भरीव काम करू शकतील.
आगामी दिशा

         या प्रकल्पाची आगामी दिशा म्हणून साहित्यातील पर्यावरणीय समस्या, त्यांचे स्वरूप, तीव्रता, तसेच पर्यावरणाचे विविध संदर्भ यांचा विस्तृत अभ्यासही करता येणे शक्य आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा