गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

लोकशाही...



डोळ्यांना बांधून झापडं
मतदार गातो विकासाची गाणी,
स्वातंत्र्य आलंय संपत
संपत आलीये आणीबाणी...
देश झालाय प्राथमिक शाळा
शिक्षक तोच मुख्याध्यापक,
नव्या स्वप्नांत तरंगताना
विचार नाही राहिले व्यापक...
रिमोटची बटणं दाबली जातील
राज्यांच्या वाहिन्या बदलतील,
चमचमणाऱ्या जाहिरनाम्यांचे
शब्दही तेव्हा खदखदतील...
हीच बनेल व्यवस्था
घालू श्राद्ध लोकशाहीचं,
आठवेल मग इटलीचा बेनीटो
राज्य त्याचं हुकुमशाहीचं...
दाबला जाईल प्रत्येक आवाज
विरोधासाठी उठलेला,
लोकशाही असेल वटवृक्ष
वीज पडून वठलेला...
येईलही आर्थिक संपन्नता
पण गमावून बसू अधिकार,
मनातल्या मनात वाटेल मग
महागात पडला मताधिकार...
काहीच नाही उरणार हाती
वाचून पहा इतिहास जरा,
सत्ता राहीली जर एकहाती
अभिव्यक्तीचाही आटेल झरा...
केलं आता साऱ्यांनी मतदान
लावून घेतली बोटावर शाई,
पण विसरू नका विकासापेक्षा
जगात मोठी असते लोकशाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा