बुधवार, २ जुलै, २०१४

लिटमस पेपर

मला आजही आठवतो
शाळेतला तो विज्ञानाचा तास,
सरांचं हळद आणि साबणाच्या पाण्याचं उदाहरण,
आम्ल आम्लारीची कसोटी,
आणि त्यासाठी वापरलेले लिटमस पेपर...
आम्ही तेव्हा अलगद टाकायचो
साबणाच्या पाण्यात चिमुटभर हळद,
अन बदलत्या रंगांसरशी
उत्साहाने हात वर करायचो,
सरांना प्रयोगाचे निष्कर्ष सांगण्यासाठी...
आजच्या वास्तव जीवनातही
बदलत आहेत रंग
प्रत्येक प्रयोगाबरोबर,
कधी भगवे,
कधी हिरवे,
कधी निळे,
तर कधी आणखी काही...
मात्र आता सारेच रंग झालेत हळदीसारखे,
आणि समाज घुसळून घुसळून फेसाळलेल्या
साबणाच्या पाण्यासारखा,
त्यात कोणताही रंग टाका,
फेसाळलेल्या पृष्ठावर तरंगू लागतात लाल तवंग,
जात धर्म पंथ यांच्या पलीकडला रंग
जो धावतो अव्याहतपणे प्रत्येक माणसाच्या नसानसातून,
तोच आता वाहू लागलाय,
राजरोस बेबंदपणे चौकाचौकात रस्त्यांवरून
या रंगीत प्रयोगांच्या शर्यतीत...
या प्रयोगांचे निष्कर्ष
ठरताहेत अनाकलनीय,
किंबहुना निष्कर्ष काढणंच कठीण झालयं,
कारण कुठेतरी हरवलाय,
माणसातल्या माणूसपणाचा लिटमस पेपर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा