गुरुवार, ३ जुलै, २०१४

ओठी तुझ्या न आले...

अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही ...

 येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही ...

 हे दु:ख राजवर्खी, ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही ...

 त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही...

 जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही...

 झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही ...

 गर्दित गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही ...

 जावे कुण्या ठिकाणी उध्वस्त पापियांनी
संतांतही घराच्या राखेस भाव नाही ...

उच्चारणार नाही कोणीच शापवाणी
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही ...

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
 हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही ...

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही...

सुरेश भट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा