सोमवार, १४ जुलै, २०१४

अधिकार


तू मला खरंचं खूप खूप आवडतेस...”
असं सांगतानाही,
तुझा चेहरा होतो आंबट,
अन् मग किरकिऱ्या आवाजात म्हणतोस,
फक्त ही Hair Style Change कर.
फार outdated वाटतेस.
मी आहे तशीच तू मला का स्वीकारू शकत नाहीस?
मी बाह्यरूपाला भुलत नाही.”
असं सांगतानाही,
तुझा भर असतो तो माझ्या दिसण्यावरच
माझी gf माझ्यासारखी smart नको का दिसायला?
असं ही हसून म्हणतोस.
मग ठरलेलं आहे माझं हलकसं हसणं
काळाशी सुसंगत वागायला शीक.”
असा सल्ला देतानाही,
तू मला विचारतोस,
जन्मपत्रिकेतील नाडी
आणि मग कारणही देतोस समर्पक,
जन्मपत्रिकेत नाडी समान असेल तर लग्नासाठी पत्रिका जुळत नाही
अन् ओघाने विचारतोस
गण, गोत्र, रास, नक्षत्र...
अन् मग अगदी दबक्या स्वरातला प्रश्न
तुला मंगळ वगैरे तर नाही ना?
त्याचबरोबर सुरु होतं आडून आडून विचारणं,
तुला जेवण येतं का?
शिवण येतं का?
कधीतरी मधेच call करतोस खोटा बहाणा करून,
आज दाढ दुखतेय,
घसा खवखवतोय,
पोट बिघडलंय,
तुला फक्त जाणून घ्यायचं असतं ते इतकंच की,
मला घरगुती उपचार किती माहित आहेत?
कधीतरी भेटायला येतोस आणि सांगत राहतोस माझी आई,
माझे वडील,
माझं त्याच्यावर असणारं प्रेम,
तुला सुचवायचं असतं ते इतकंच की,
मी आई वडिलांच्या आज्ञेबाहेर नाही...

एवढं सारं असूनही तू प्रयत्न करत राहतोस मला हे समजावून देण्याचा की
माझं तुझ्यावर कित्ती प्रेम आहे..
नेमका कोणता शोध घेतोयस तू?
तुला एक smart good looking gf हवीये का?
तुला suitable अशी?
कि सुयोग्य पत्रिका हवीये?
कि तुझ्या घराच्या चार भिंतीआड नेटका संसार करणारी
एक टिपिकल गृहिणी?
तुझ्या असंख्य अपेक्षा मला मान्य आहेत.
हो, खरंच मान्य आहेत.
माझ्या मात्र तुझ्याकडून अशा कोणत्याच अपेक्षा नाहीत.
फक्त एक मागणी आहे.
वेळप्रसंगी मला फक्त एका निर्णयाचा अधिकार दे.
तुला नाकारण्याचा.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा