माझा विश्वासघात करणाऱ्या एका व्यक्तीस,
आज गुरुपौर्णिमा, तुला गुरु
वगैरे मानावं इतका तू महान नाहीस. पण तरीही तू माझा गुरु आहेस. जे अगाध ज्ञान मला
पुस्तकातून मिळू शकले नसते ते तू मला दिलेस. प्रश्न पडला असेल ना कि तू असं काय
केलं आहेस? सांगते ना मी तुला. सांगितल्याशिवाय कशी राहीन?
तू मला जाणीव करून दिलीस कि
माझ्यात काहीतरी असं आहे कि जे क्षणकाळासाठी का होईना कुणाला तरी आवडू शकेल.
कुणाचा काही काळ तरी माझ्या सानिध्यात चांगला(?) जाऊ शकेल. तूच मला जाणीव करून
दिलीस कि मलाही कुणा अनोळखी व्यक्तीशी मैत्री करता येऊ शकते. खरंचं तू मला
समजावलंस मी कसं राहिलं पाहिजे? मी कसं दिसलं पाहिजे? मी कसं वागलं पाहिजे? तू मला
समजावलंस... तू मला शिकवलंस माझ्या उडत्या केसांना आवळ घालायला.. तू मला शिकवलंस
माझ्या निरलस शब्दांच्या निर्झराला बांध घालायला.. तू मला शिकवलंस मुलीप्रमाणे
राहायला... तू मला शिकवलंस...
आणि त्यानंतर तूच तुझ्या
वागण्याने सिद्ध करून दाखवलस वरच्या शिक्षणाचं फोलपण.. त्या सततच्या बदलांचं निरर्थकपण..
हो. तू पुसून टाकलीस जुनी पाटी आणि नव्याने गिरवून घेतलास नवा अध्याय अगदी
स्वतःच्याही नकळत.. आणि मी शिकले कुणासाठी कधीच बदलू नये.. कुणाला आनंद मिळावा
म्हणून स्वतःला विसरू नये.. कुणाच्या गोड बोलण्याला भुलू नये.. कुणावर कधीच
विश्वास ठेऊ नये.. हो तू मला हे सारं शिकवलंस....
आता मी केसांना पट्टयात
आवळत नाही.. आता मी पूर्वीसारखं गोड गोड बोलत नाही.. आता मी मुलींसारख मुळूमुळू
वागत नाही.. आणि सर्वात महत्त्वाचं आता मी कुणावरही विश्वास ठेवत नाही.. खूप खूप
शिकवलंस तू मला.. तुझ्या सारखा गुरु(?) मला लाभला हे तर माझे अहोभाग्यच(?).
म्हणूनच मी अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने तुला अभिवादन करते. आणि हो गुरुपौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा