गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

सापडलेच नाहीत साईबाबा...

शिर्डीच्या समाधीमंदिरात
सापडलेच नाहीत साईबाबा,
गाड्या आणि गर्दीने भरलेल्या रस्त्यातून
कशीबशी वाट काढत पोहोचले
क्लोकरुमपाशी आणि
चपलांपासून पिशव्यांपर्यंत
सारे पैसे भरूनही
त्यांनी काढून दिला
माझा मोबाईल माझ्या पिशवीतून
आणि जमा करवला एका वेगळ्या काउंटरवर
वेगळे पैसे घेऊन...
दर्शनाच्या रांगेत उभी राहिले,
चढले,
उतरले,
चालले,
धावले,
एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमधे...
असे अनेक हॉल पार करत
अखेर पोहोचले
समाधीस्थानाच्या प्रवेशद्वाराशी
तिथल्या उर्मट सुरक्षारक्षकाने
जवळजवळ ढकललंच मला
दर्शनाच्या रांगेत...
माझे डोळे तर दिपुनच गेले
सोन्याचा गाभारा पाहून
मनात आलं
कोण असावेत हे अज्ञात भक्त
ज्यांना शक्य झाला एवढा देवधर्म...
असो,
काळ्याचं पांढरं करावं लागतंच कुठेतरी...
बाबांच्या समाधीपाशी उंचच उंच काचा
आणि त्यावर उभे पुजारी भक्तांनी आणलेलं
पूजासाहित्य समाधीवर झुलवून फेकताना
पुन्हा एकदा
तिथल्या उर्मट सुरक्षारक्षकाने
जवळजवळ ढकललंच मला
मागे येऊन मी पाहिलं पुन्हा पुन्हा
पण दिसलेच नाहीत मला तिथे साईबाबा...
म्हटलं, बाबा बसले असतील द्वारकामाईत
किंवा मग लेंडीबागेत
तर तिथेही नाहीत,
आता बाबांचा शोध घेतलाच पाहिजे,
वाट चुकले असतील बिचारे इथल्या गर्दीत,
म्हणून समाधीमंदिरातून बाहेर पडले,
लहानपणापासून पाहत आले मी
समाधीमंदिराच्या आवारात
पेरू विकणाऱ्या बायका,
म्हटलं त्यांना विचारावं,
मारुतीच्या मंदिरापाशी आले
तर तिथे एकही पेरूवाली नाही.
आश्चर्यच वाटलं मला.
तितक्यात तिथल्या आलिशान शॉपिंग सेंटरबाहेर
मला दिसली एक पेरुवाली
जीव मुठीत घेऊन पळताना,
मी धरला तिचा हात
तर म्हणाली
“सोडा बाई, ट्रस्टवालं आलं तर पाटी
फेकून देत्याल माझी.
आता गरिबासाठी जागा न्हाय इथं.”
मी काही बोलण्याआधीच पळून गेली बिचारी.
मंदिराच्या आवारात नाहीच कुणी कफल्लक
सारेच गडगंज श्रीमंत सुटाबुटात,
आणि त्यातल्या कुणालाच येत नव्हतं मराठी
आता कुणाला विचारावं?
मला वाटलं, बिच्चारे बाबा
त्यांच्या दारातल्या हरवलेल्या
सामान्य भक्तांना शोधायला बाहेर पडले असावेत.
आणि आता पुन्हा समाधीमंदिरात जायचं म्हणजे
अपरिहार्य असणारी त्रासदायक पायपीट,
पण बाबांचे एवढे सधन भक्त आहेत,
दानधर्म करतात म्हणजे बाबांच्या झोळीत
असतीलच किमान ५०० रुपये व्हीआयपी पाससाठी,
म्हणून धक्काबुक्की करत गेले पास काउंटरवर,
रांगेत उभ्या लोकांनी घातल्या असतील मला शिव्या
पण त्या कळल्याच नाही मला,
न जाणो कुठल्या भाषा होत्या त्या...
काउंटरवरच्या माणसाला विचारलं मी
“ इथे बाबा आले होते का?”
“ कौन बाबा?”
“ साईबाबा”
“ अहो बाई, साईबाबा तर गेले १९१८ला, ही तर समाधी आहे”
गडगडाटी हसत त्याने पाहिलं माझ्याकडे.
“ अहो बाई, कुठे शोधून राहिला बाबा, घरी जावा.
 कोन हाय रं तिकडं? बाईला बाहेर काढा.”
एकाने मला दंडाला धरून बाहेर काढलं..
विमनस्क मनाने मी चालू लागले क्लोकरूमकडे
अखेर शिर्डीच्या समाधीमंदिरात
सापडलेच नाहीत साईबाबा...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा