गुरुवार, ३१ जुलै, २०१४

वेणा १...

एका अज्ञात जगातून ती येते
माझा शोध घेते
मलाच न गवसलेली मी
माझ्याही नकळत
तिच्या स्वाधीन होते...
तिच्याकडे असते
एक गूढ शक्ती
माझा मनाचा ताबा घेत असताना
ती सुन्न करत जाते
माझी विचारबुद्धी...
ती मग ठाण मांडते
माझ्याच अंतर्मनात,
आणि घोंगावत राहते वावटळीसारखी..
खूप खूप अस्वस्थ वाटतं..
वाटतं,
वाटतं स्वतःचंच काळीज चिरून
तिला बाहेर काढावं,
म्हणावं
बाई गं,
थकले मी,
आता तरी मला मुक्त कर.....
पण ती आलेली असते,
स्वतःचा स्वतंत्र स्वभाव घेऊन,
ती मला नाचवते तिच्या इशाऱ्यावर,
खेळवत राहते ती मला
तिच्या मर्जीप्रमाणे...
स्वतःच सारं काही तिला बहाल केल्यावर
मी उरतच नाही माझ्यासाठी माझ्यापाशी
ती अशी छळायला लागली
म्हणजे जाणीव होते
अरे आपण कवी झालो....
अरे आपण कवी झालो....

सामर्थ्य आहे चळवळीचे.....

लहानपणी म्हणे
मी खूप चळवळी होते,
म्हणजे असं मला
माझी आई सांगत असते..
पण आज मात्र मी
काहीच वेगळं करत नाही,
कोणत्याही चळवळीत
माझं पाऊल कधी शिरत नाही..
खरी चळवळ तर आता
आमचे पुढारी करतात,
पैशाच्या कुरणात
अखंड चरत राहतात..
त्यांची एखादी चळवळ
कधीतरी दिसण्यात येते,
मग त्याचा तळ गाठण्यासाठी
नवी चळवळ उभी राहते..
एकंदरीत या चळवळीतून
काहीच निष्पन्न होत नसतं,
चळवळ करणाऱ्यांच्या खिशावर
योग्य तेवढं वजन असतं..
चळवळी कितीही झाल्यातरी
आपल्याकडे हे असंच चालतं,
काळ्या पैशाचं घबाड
अखेर स्वीस बँकेत सापडतं..
चौकशीच्या समित्या निघतात
समित्यांचे अहवाल येतात,
अटकांची नाटकं झाल्यावर
आरोपी जामिनावर सुटतात..
आपलंही रक्त खवळतं
आपल्यालाही संताप येतो,
पण भ्रष्ट व्यवस्थेपुढे
आपणही हतबल असतो..
मग आपण गात राहतो
गाणे उपाय थकल्याचे,
अन् तरीही लेख लिहितो
सामर्थ्य आहे चळवळीचे.....
सामर्थ्य आहे चळवळीचे.....


बुधवार, ३० जुलै, २०१४

महानगरीय लेखकांसाठी सुगीचा काळ

ह्या पुढचा काळ हा शहरांचा असणार आहे, हे निविर्वाद सत्य. तेव्हा साहित्यातही खरं तर शहरी वातावरण वाढलेलं दिसायला हवं. पण मराठी साहित्यात मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नेमकं उलटं चित्र दिसतं आहे. जिल्हा-तालुका-गावांमधील लेखकांकडून साहित्याचं पीक जोमाने येत आहे आणि महानगरी लेखकांकडून अतिशय तुरळक! साहित्यात बदलत्या समाजजीवनाची दखल घेतली जाणं हे त्या भाषेतील साहित्य आणि समाजाची सुरळीत वाढ होण्यासाठी पोषक असतं हे जर गृहीत धरलं तर ही स्थिती फारशी आशादायक नाही. मराठी साहित्यात नजीकच्या भविष्यात ह्या विषयावर जबरदस्त घुसळण होण्याची गरज आहे. 

गेल्या २०-२५ वर्षांमध्ये ही जी नवीन वाटचाल सुरू आहे त्यामध्ये शहरं-महानगरं आणि गावं ह्या दोन्ही भूप्रदेशातील जनजीवनात मोठाच फरक पडला आहे. नागर भागांमध्ये आथिर्क उन्नतीच्या - पर्यायाने सुखवस्तू, उंची राहणीच्या- शक्यता अधिक असल्याने करिअर करून पैसे कमावण्याकडे जोरदार कल आहे आणि त्यासाठी सकारात्मक मानसिकता हा मूलमंत्र बनत चालला आहे. अर्थात जीवनाची व्यामिश्रता ध्यानात घेता हा तसा एककल्ली विचार आहे. त्यात समग्रता नाही, ज्यामुळे शहरी महानगरी मानसिकतेत प्रचंड अस्वस्थता जाणवते आहे. ती वाढत्या धामिर्कतेत, तथाकथित आध्यात्मिक गुरूंचे पेव फुटण्यामध्ये वगैरे दिसून येते आहे. हिंदी भाषेमध्ये अधिकाधिक संवाद चाललेल्या मुंबईसारख्या महानगरी वातावरणात आज पानाच्या गादीवर जा, चहाच्या टपरीवर जा, टॅक्सी, रिक्षा, बस, ट्रेनमध्ये फिरा 'सुकून चला गया!' ही खंत सरसकट ऐकू येताना दिसते. एकीकडे उंची राहणीमानाची आस अमर्याद वाढते आहे तर दुसरीकडे त्यातील व्यर्थतादेखील मनात ठुसठुसते आहे. एकूण काय तर महानगरी जीवनातील घालमेल दिसामासाने वाढतेच आहे. 

मराठी साहित्याच्या दृष्टीने ग्रामीण आणि शहरी ह्या दोन भूप्रदेशांचा विचार करताना मात्र असं दिसतं की, ग्रामीण-निमशहरी भाग हा शहराच्या तुलनेत जास्त सजग आणि सक्रीय आहे. ढोबळमानाने म्हणायचं तर, साठोत्तरी काळामध्ये शहरांमधील साहित्यनिमिर्तीचा ओघ झपाट्याने ओसरत चालला आहे. ह्याचं कारण ह्या काळात 'देशीवाद' ह्या संकल्पनेचा वरचष्मा प्रस्थापित झाल्यापासून मुंबईसारख्या शहरातील लेखक न्यूनगंडाने पछाडले गेले आहेत. आपलं जगणं यांत्रिक आहे, खोटं आहे, ह्या मातीतील परंपरेपासून तुटलेलं आहे, तेव्हा आपण काहीही लिहिलं तरी ह्या पुढील काळात ते बाटगंच ठरणार असा काहीसा हताशपणा मुंबईकर लेखकांच्या मनात ह्या काळात तयार झाला. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांच्या काळात शहरी साहित्याला ओहोटी लागल्यासारखी झाली. 

ग्रामीण भागात नेमकी उलट स्थिती होती. आजवर आपल्या जगण्याला मराठी साहित्यात पुरेसं स्थान मिळत नव्हतं, ते ह्या नवीन 'देशीवादी' वातावरणात मिळण्यासाठी पुरेसा वाव आहे, हे ध्यानात आल्याने महाराष्ट्रभरच्या सर्वच ग्रामीण-निमशहरी वातावरणातील तरुण पिढी ह्या काळात जोराने लिहू लागली. विशेषत: कवितेसारखा आटोपशीर आकाराचा साहित्यप्रकार आणि कादंबरीसारखा ऐसपैस अवकाशाचा अघळपघळ साहित्यप्रकार ह्यामध्ये ह्या मंडळींनी एवढ्या जोमाने निमिर्ती केली की, त्यांनी ह्या दोन्ही प्रकारांचा रूढ ढाचाच बदलून टाकला. समाजमन कवेत घ्यायचा प्रयत्न करणे हा ह्या काळात साहित्यनिमिर्तीचा जणू मूलमंत्र ठरला आणि परंपरेला उजळा देऊन आपल्या संस्कृतीची पाळंमुळं तपासणे ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. 

ह्या काळात ग्रामीण-निमशहरी भागांमध्ये राहून लिहिणारी जी मंडळी आहेत ती आता साधारण ४५+ वयोगटातील आहेत आणि ह्या नवीन स्थित्यंतराच्या झपाट्यामुळे ती कमालीची अस्वस्थ होणं साहजिकच आहे. मात्र त्यांना आता आपल्या लिखाणाची दिशा बदलणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे ते नवीन वातावरण टिपण्याचा जो प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये 'गेले ते दिन गेले' हा सुप्त सूर ऐकू येतो आहे, जो काळाच्या ओघात न केवळ शहरी तर त्यांच्याच भूप्रदेशातील तरुण पिढीलाही मानवणारा नाही. साहजिकच ह्या पिढीला लिहिण्यासाठी त्यांच्या राहत्या भूमीतील संचित फारसं कामाचं ठरणार नाही. उलट शहरी जाणीवेतून निपजलं जाणारं, नाविन्याची दखल घेणारं साहित्य हे त्यांच्यासाठी अधिक प्रेरणादायक ठरू शकेल आणि इथेच मराठी साहित्याच्या पुढील वाटचालीची मेख आहे! 

आजच्या नवीन पिढीला आपलंसं वाटेल अशा शहरी जाणीवेचं साहित्य मराठीमध्ये तूर्तास पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. गद्य साहित्याचा विचार करता भाऊ पाध्येंच्या नंतर त्यांच्या तोलामोलाचं लिहिणारा लेखक आज मुंबईमध्ये दिसत नाही. भाऊंना जाऊन आता सुमारे १५ वषेर् लोटली आणि त्याआधी सुमारे १० वर्षं विकलांगतेमुळे त्यांची लेखणी थंडावल्यासारखीच होती. म्हणजे सुमारे २५ वर्षांच्या काळात ह्या महानगरातून येथील रटरट सातत्याने टिपण्याचे प्रयत्न काही तुरळक कथाकार वगळता फारसे कुणी केलेच नाहीत. 

ह्याची कारणं थेट इंग्रजी माध्यमामुळे मराठीविषयीची वाढती अनास्था इथपासून शोधता येतील. पण त्याहीपेक्षा आपली निमिर्ती ही प्रचलित देशीवादी वातावरणात टिकणार नाही, ह्या जाणीवेतून आलेला न्यूनगंड हेच सर्वात मूलगामी कारण आहे. सुमारे ५० वर्षांपूवीर् देशीवादी धारणांमुळे गावांकडे झरझर धावलेला लंबक गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वातावरणामुळे हळूहळू पुन्हा शहरांकडे सरकू लागला आहे. बाकी शहर जेवढं मोठं तेवढ्या तेथील उलाढालीदेखील प्रचंड, हे वास्तव लक्षात घेता महानगरांमध्ये आशय-विषयाची नेहमीच रेलचेल असते. तेव्हा प्रश्न आहे तो फक्त काळाच्या पावलांची चाहूल घेऊन मरगळ झटकून लेखण्या पुन्हा सरसावण्याचा. ज्याच्या पाऊलखुणा आता फेसबुक, ब्लॉग्जसारख्या आधुनिक माध्यमांमधून जाणवत आहेत. परंपरेची फारशी तमा न बाळगता नवीन जीवनाला कवेत घेऊ पहाणारं साहित्य निर्माण होणे ही मराठी साहित्याची ताजी गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी ग्रामीण, निमशहरी, शहरी, महानगरी नवीन पिढी जाणीवदृष्ट्या जवळ सरकताना दिसते आहे ही मोठीच जमेची बाजू आहे. 

पाऊस...


पाऊस म्हणजे नेमका काय असतो रे?
का म्हणतात त्याला पृथ्वीचा भ्रतार?
आठ महिन्यांचा विरह देऊन,
चार महिने तिला यथेच्छ झोडपणारा
हा अमानुष पाऊस,
का रे कवींना मनभावन वाटत असेल?
सांग ना सख्या...
तुला का आवडतो पाऊस?
तुला पाहायला आवडते
झाडांची तांबूस पालवी,
मात्र त्या पालवीआड
लपवली असेलही कदाचित
त्या झाडाने आपली भूतकाळातील वेदना...
कि तुझ्यालेखी वेदनेला
कधी पालवीच फुटत नाही?
खरं सांगू,
मलाही आवडतो पाऊस,
का माहित आहे?
तुझ्यासोबत भिजताना
डोळ्यातून ओघळणारे अश्रू
तो अलगदपणे लपवतो,
आणि म्हणूनच
माझ्या ओठावर तुझ्यासाठी हसू येतं.



मंगळवार, २९ जुलै, २०१४

ओळख जपून ठेव...

आयुष्याच्या अवघड वाटेवर
जीवनाच्या अथक संघर्षात,
न जाणो केव्हा भेट होईल?
होईल की नाही?
आणि कधी झालीच तर
असेल का स्मृती मनात
एकमेकांना भेटल्याची?
कि पुन्हा नव्याने करून द्यावा लागेल परिचय?
कि अस्तित्वाच्या स्पर्धेत
स्वत्व हरवून बसल्यावर
नाहीच राहणार ओळखदेख?
नाहीच का उभं राहणार चलचित्र
असंख्य आठवणींचं
मनाच्या कालपटलावर?
कि उभी असेल एक खोल दरी
मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि यशापयशाची?
आणि हरवून गेलेली असतील
जवळची वाटणारी सारीच माणसे,
पण मग कधीतरी एखाद्या वळणावर
जाणवेल खूप एकाकीपण,
यशोशिखरावर एकट पडल्याची जाणीव दर्शवेल
आजुबाजूच भ्रामक निर्मनुष्य जग...
म्हणून या विचित्र जाणीवेच्या
भीतीपोटी तरी
ओळख जपून ठेव...

सोमवार, २८ जुलै, २०१४

ब्रह्मांडाच्या नाक्यावर....


ब्रह्मांडाचा नाका आजकाल सुनसुना,
कुणाचीच काही धावपळ नाही,
search engineच्या जगात 
सगळं काही सोप्प झालंय नाही का?
आता जुने शब्द घेऊन 
नव्या अर्थांच्या शोधात 
भटकावं नाही लागत.
इथे प्रत्येक clickसरशी 
जुन्या अर्थांचे अनेक नवे शब्द तयारच असतात.
दळणवळणही आता किती सुसह्य झालंय,
सुसह्यच कशाला आता तर प्रवासच उरला नाहीये
अनुभवापासून अनुभूतीपर्यंतचा...
आजकाल सारं काही operate होतं  automatically ,
आणि सहज ठेवला जातो विश्वास desktopच्या displayवर...
मनाची window close करून आपण open करतो internet,
आणि Copy pastच्या तंत्राने होत राहते नवनिर्मिती...
Like आणि shareने लाडावलेले निर्मिक जेव्हा देत असतात
जुन्या अर्थांना नवा जन्म,
नेमका त्याचवेळी,
कुणी अनामिक वेडा,
नव्या अर्थांचा आर्ततेने शोध घेत
उभा असतो
ब्रह्मांडाच्या नाक्यावर....

सोमवार, २१ जुलै, २०१४

कधी कधी...

कधी कधी अंतर्मनात
भावनांचं उधाण येतं,
विचारांच्या वावरात
मन माझं मचाण होतं...


नको...

आता नव्या यशाची
मला ही वाटचाल नको,
नाही करणार सवाल काही
मजलाही सवाल नको...
एकदा विकून सारे
आयुष्य बैसले मी,
आता या बाजाराचे
पुन्हा नवे दलाल नको...
अंधाराची वाट सारी
रक्ताळले पाय माझे,
ठेच लागली पुन्हा तरी
मदतीला मशाल नको...
निबर झाले मन माझे
पाषाण झाल्या भावना,
नाही पाणावणार डोळे
नको मला रुमाल नको...
तक्रार नाही कुणाजवळही
फिर्याद मी करीतच नाही,
आता मजला कुणाचाही
कसलाही निकाल नको...
केव्हाच मंद झाली
या हृदयाची स्पंदने,
आता या देहाचीही
पुन्हा नवी हालचाल नको...

शनिवार, १९ जुलै, २०१४

सूर्य

सूर्य उगवतच नसतो कधी,
कधी होतच नसतो सूर्यास्त,
कधी कलतही नाही तो
आणि होतच नाहीत कधी
दिवस लहान आणि मोठे...
परिवलणारी पृथ्वी 
कलते, फिरते, बदलते
आणि सूर्याभोवती 
फिरता फिरता 
देते संज्ञा 
सूर्योदय,
सूर्यास्त,
उत्तरायण,
दक्षिणायन,
आणि अशा इतर अनेक...
पृथ्वीवरच्या अनंत मुखांनी,
आपल्या मेंदूची कवाडं
बंद करून,
बेंबीच्या देठापासून
ओरडून ओरडून सांगितलं,
तरी कधीच बदलणार नसतं सत्य,
सूर्य उगवतच नसतो कधी,
कधी होतच नसतो सूर्यास्त...


शुक्रवार, १८ जुलै, २०१४

तुला पाहिले मी


तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

कवी : ग्रेस

पूर्तता माझ्या व्यथेची

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूंत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ति मिळावी
वेदनेला अंत नाही अन कुनाला खंत नाही 
गांजणार्‍या वासनांची बंधनें सारी तुटावी
संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे...लोचने आता मिठावी
सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखालीं चिंता माझी जळावी
दुर रानांतील माझी पाहुनी साधी समाधी 
आंसवें सार्‍या फुलांचीं रोज खालीं ओघळावीं
कोण मी आहे ?मला ठाऊक नाही नाव माझे
शेवटी सारी धुळीने चौकशी माझी करावी
हे रिते अस्तित्व माझे,शोध शून्यांतील वेडा
माझियामागेंच माझी सर्व ही ओझी रहावी
काय सांगावे तुला मी ? काय मी बोलूं तुझ्याशी?
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी
                                                 सुरेश भट 

गणपत वाणी बिडी पिताना


गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भूवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

कवी - बा.सी.मर्ढेकर

संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा

दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी

भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा

किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी

मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही

हळुच चांदने ओले

ठिबके पाणावरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणामधुनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
म नाचा गाभारा

कवी - मंगेश पाडगावकर

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दुमडला गालिचा, तक्‍के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली.

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते ? - गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी.

साधता विड्याचा घाट, उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान ?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने ?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भाव स्वरांचा योग
घमघमे, जोगिया दंवात भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.

"मी देह विकुनिया मागुन घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनिया 'अनमोल'
रक्‍तात रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा विश्राम 
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सांवळा तरुण तो खराच ग वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !"

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार
हासून म्हणाल्ये, "दाम वाढवा थोडा ...
या पुन्हा, पान घ्या ..." निघून गेला वेडा !

राहिले चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?

तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्ये बसले परि रतिक्लांत
वळुनी न पाहता कापित अंधाराला
तो तारा तुटतो- तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे.


 : ग. दि. माडगूळकर