बोलू ऐसे बोल | जेणे बोले
विठ्ठल डोले ||
प्रेम सर्वांगाचे ठायी | वाचे विठ्ठल
रखुमाई ||
नाचू किर्तनांचे रंगी | ज्ञानदिप लावू
जगी ||
परेहूनि परते घर | तेथे राहू
निरंतर ||
सर्वसत्ता आली हाता | नामयाचा खेचर
दाता ||
देह जावो अथवा राहो | पांडुरंगाची दृढ
भावो ||
चरण न सोडी सर्वथा | आण तुझी
पंढरीनाथा ||
वदनी तुझे मंगलनाम | हऋदयी अखंडित
प्रेम ||
नामा म्हणे केशवराजा | केला नेम चालवी
माझा ||
आम्हा वैष्णवांचा कुळधर्म कुळीचा | विश्वास
नामाचा सर्वभावे ||
तरी त्याचे दास म्हणता श्लाघिचे | निर्वासना
कीजे चित्त आधी ||
गाऊ नाचो आम्ही आनंदे किर्तनी | भक्तिमुक्ती
दोन्ही भोगू देवा ||
वृत्तसहित मन बुडे प्रेमडोही | नाठवती
देही देहभाव ||
सगुणी निर्गुणी एकचि आवडी | मते
दिली बुडी चिदाकाशी ||
नामा म्हणे देवा ऐसी मज सेवा | द्यावीजी
केशवा जन्मोजन्मी ||
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान | आणिक
दर्शन विठोबाचे ||
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी | मागणे
श्रीहरी नाही दुजे ||
मुखी नाम सदा संताचे दर्शन | जनी
जनार्दन ऐसा भाव ||
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी | किर्तन
गजरी सप्रेमाचे ||
अमृताहुनि गोड नाम तुझे देवा | मन
माझे केशवा का बा नेघे ||
सांग पंढरीराया काय करू यासी | का
रूप ध्यानासी नये तुझे ||
कीर्तन बैसता निद्रे जागविले | मन
माझे गुंतले विषयसुख ||
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति | नये
माझ्या चित्ती नामा म्हणे ||