शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

"द्वीपशिखा"

पोर्टब्लेअरपासून अवघ्या ८-१० मिनिटांच्या अंतरावर 'रॉस' नावाचे बेट आहे. ब्रिटिश खलाशी डॅनिअल रॉसच्या नावावरुन या बेटाचे नाव ठेवलेय. ह्या बेटावर राहाते एक देवी! अनुराधा राव नाव तिचं. पण का तिची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला? काय एवढं विशेष आहेत तिच्यात? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, अंदमानातली सगळ्यात महत्त्वाची अगदी तिथल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्याइतकी आणि सेल्युलरजेलइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती! तुम्हाला खोटं वाटेल, पण माझ्या दौऱ्यात पहिल्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही तर तिसऱ्या दिवशी काही स्थळं पाहाणे रद्द केले मी, पण तिची भेट घेतलीच! यावरुनच तिच्या महत्तेची कल्पना यावी!!

अनुराधाचे वडील रॉस बेटावरचे रहिवासी. ते वारल्यावर निव्वळ कुतुहलापोटी अनुराधा ह्या बेटावर आली. अवघं ३ वर्षाचं वय होतं तिचं. बेटावर ससे होते, हरणं होती, मोर होते, बुलबुल होते. पण सर्वत्र अनागोंदी माजलेली. सरकारी खलाशी वाट्टेल तेव्हा शिकार करत असत. झाडं तोडत असत. कुणी सांसद-विधायक येणार असला की त्याच्यासाठी हरणं मारुन नेत असत. असं होता होता आख्ख्या बेटावर केवळ ८-१०च प्राणी उरलेले. तेही जखमी. आजारी. भुकेलेले. लहानगी अनुराधा हे सगळं पाहात होती. तिने एकदा थांबवायचा प्रयत्न केला. वाईट मारले खलाश्यांनी तिला. बास! त्यादिवसापासूनच अनुराधा कुणाशीही बोलेनाशी झाली. एक कोळी तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून होता. लहानगं वय! उंची कमी!! त्या कोळ्याच्या खांद्यावर चढायची. झाडपाला तोडायची. आणि दिवसभर भटकून सगळ्या प्राण्यांना खाऊ घालायची. अगदी रोज! नित्यनेमाने!! खलाशी वेडी समजू लागले होते तिला. हीसुद्धा कुणी काही बोलले की दगड उगारुन मागे लागायची त्याच्या. तिच्या वेडेपणावर अजूनच शिक्कामोर्तब व्हायचे त्याने!!

हा क्रम १-२ नव्हे, तर तब्बल २० वर्षे चालला. २० खडतर वर्षे! ह्याकाळात ती शेकडो वेळा पडली. हजारो वेळा धडपडली. बेदम मार तर कितीदा खाल्ला ह्याची गणतीच नाही! काय मिळवलं तिने त्या २० वर्षांत? ज्या बेटावर अवघे ८-१० प्राणी उरले होते, तिथल्या प्राण्यांची संख्या हजारावर गेली. एकट्या अनुराधाच्या तपश्चर्येमुळे!! १९८७ साली रॉस बेट सैन्याच्या ताब्यात गेले आणि अनुराधाच्या आयुष्यातला दुस्वासाचा भीषण काळ संपला. सैन्याने नुसत्या तिच्या कल्पना ऐकल्याच नाहीत तर त्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी सगळी मदतसुद्धा केली. तिच्यामुळे हे बेट टिकून राहिलंय. आज अनुराधाचे वय ५१ वर्षे आहे व ती तिथली अधिकृत स्थलदर्शी (गाईड) आहे. पण एवढ्यावरच तिची कहाणी संपत नाही.

आम्ही अनुराधाला भेटलो आणि ती बेटाची माहिती देऊ लागली. तेवढ्यात तिथे एक हरिण दिसले. त्याला पाहाताच अनुराधाने हाक मारली,
"ए राजूऽऽ इधर आ"!
आणि काय आश्चर्य, ते हरिण चक्क आम्हां माणसांच्या घोळक्यात येऊन उभे राहिले. अनुराधा त्याच्याशी गप्पा मारु लागली. जसजसे आम्ही पुढे जात गेलो, तसतसा आमचा समूह वाढत होता. हरणं आली, मोर आले, लांडोरी आल्या, ससे आले, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी आले. अनुराधा सगळ्यांशी गप्पा मारत होती. त्या प्राण्यांपैकी एकेकाच्या सवयी आणि स्वभाव सांगत होती. अगदी जवळच्या मित्र-नातेवाईकांबद्दल बोलावं तस्सं! मग ती मध्येच एखाद्या लांडोरीला म्हणायची,
"रेश्मा, तेरा बच्चा तो बीमार था ना? किधर है, दिखा"?
आणि ती लांडोर ताबडतोब तिच्या पिल्लाला शोधून घेऊन आली.
"अरे, यह तो ज़ख़्मी है! जा उसे वह वाले पेड ते पत्ते चूसके लगा"!
आणि खरोखरच ती लांडोर पिल्लाला घेऊन त्या झाडापाशी गेली व उपचार करायला लागली! मग ती कधी सश्याशी बोलायची तर कधी हरणांशी. अचानक वरुन एक बुलबूल पक्ष्यांचा थवा उडत गेला. अनुराधाने पटकन हाक मारुन बोलावलं. त्याबरोब्बर ते शेकडो पक्षी खाली उतरले. तिने मोठ्ठ्याने ओरडून सांगितले,
"जाओ जाके बाकीके दोस्तोंकोभी बुलाके लाओ. बोलो, अम्मा बुला रही है!"
पटकन चार-दोन पक्षी उडाले आणि अजून शे-सव्वाशे दोस्तांना घेऊन आले. सगळे जमल्यावर अनुराधाने त्यांना सांगितलं की,
"अभी यह नये लोग है ना, इन्होंने कभी तुमको नज़दिकसे देखा नहीं. तो यह तुम्हारे फोटो-वोटो लेंगे. डरना नहीं हां!"
आणि काय आश्चर्य! सगळे प्राणी, पक्षी आम्हांला हात लावू देऊ लागले. फोटो काढू देऊ लागले!!

अशी अनुराधा. यांच्यापैकी कोणत्याही जीवाला तिने प्रशिक्षण दिलेले नाही. ती त्यांच्याचसोबत वाढलीये. हे सारं गणगोत आहे तिचं. त्यांना तिची भाषा समजते आणि तिला त्यांची! त्सुनामीने सगळंच्या सगळं कुटूंब हिरावून घेतल्यानंतर तर ह्या मंडळींशिवाय अनुराधाचं आपलं असं कुणीच राहिलं नाही. जे कुणी आहेत ते हेच आहेत. कित्येकदा त्यांना वाचवताना जीव धोक्यात घातलाय अनुराधाने. एक-दोन नव्हे, तर चक्क २५ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झाल्यायत तिच्यावर. तरीही तिच्या दिनचर्येत एक दिवसही खाडा झालेला नाही. मी तिला विचारलं,
"ऐसी खस्ता तबियतके बावजूद कैसे कर लेती है आप यह सब"?
तर म्हणाली, "वह जो उपर बैठा है ना, बहोत बडा झगडा चल रहा है मेरा उसके साथ! मैंने उसको बोल दिया है की, अगर यह जानवर ज़िंदा रखने है तो मुझे अपने पैरोंपे खडा रख. वरना बेशक़ मार दे मुझे. मेरा क्या है! कोई नहीं आगेपीछे रोनेवाला. मगर इन लोगोंका मेरे सिवा कोई नहीं. बस, तबसे भगवान मुझे मारता नहीं और इन जानवरोंका सहारा छिनता नहीं!"
मी पाया पडू लागलो तर पाय चटकन मागे घेतला आणि प्रेमाने माझ्या पाठित धपाटा घालून हसत-हसत म्हणाली,
"हट सुव्वर"!!

निघताना आमच्यातल्या एकाने पटकन पाचशेची नोट काढून दिली तिला. तिने ती घेतली आणि "थँक्यू" म्हणाली. कुणी काही कुणी काही रक्कम देऊ केली तिला तर घेईचना. म्हणाली,
"इतने ज़्यादा पैसे मैं नहीं ले सकती. पाँचसौ बस हो गए मेरे लिए".
ऐकेचना. शेवटी बळजबरी कोंबले पैसे तिच्या हातात. ती सांगत होती,
"टूरिस्ट लोगोंसे तो मैं कई-कई बार पैसे लेतीभी नहीं. हाँ, पर अगर कोई एम्पी-एमेले आए, तो छोडती नहीं सालेको. उससे मनमर्ज़ी पैसे वसूलती हूँ. क्यूँ छोडे? हरामी रोज़ लूटते है हमें. कहीं तो जेबें ढीली करना सीखो!"
तिच्या ह्या मार्मिक तत्त्वज्ञानाची गंमत वाटत होती. पण ते मनापासून पटतही होते! ती म्हणाली,
"पीछले महिने वह तुम्हारे ठाकरेका बच्चा आया था ना? वह आनेवाला था मुझसे मिलने! उसके पहलेही उसका पीए आ धमका मेरे पास. कहने लगा, सुना है तुम किसीभी मिनिस्टर और पॉलिटिशियनको जो मनमें आए बोल देती हो? हमारे साहबके सामने ऐसा मत करना हाँ! मैं बोली, क्यूँ ना करु? अगर वह कुछ ग़लत बोलेगा तो मैं उसे नहीं छोडूँगी! बादमें जब उसका साहब आया तो मैंने उससे पूछा, तेरा पीए ऐसा बोल रहा था. तो वह बत्तीस दाँत दिखाके हँसने लगा! बोला, नहीं अम्मा जो तुमको ठीक लगे नहीं बोलो. छोडा नहीं मैंने उसकोभी! अच्छा आदमी लगता है पर वह!"

भूतकाळातल्या कटू आठवणींमुळे अनुराधा सगळ्याच राजकारण्यांवर उखडून आहे. पण असं नाही की, ती नुसती फटकळच आहे. तिच्या मनात एका व्यक्तीविषयी अपरंपार भक्ती भरुन राहिलीये. महाराष्ट्राच्या जातीची ना गोताची अनुराधा आम्हांला सांगत होती -
"जब दुनियाका अंत होता है ना, तब नई संस्कृती पनपती है. वह लोग ज़मीं खोदते है तो पीछली सभ्यताके कुछ बर्तन मिलते है, मूर्तीयाँ मिलती है. उन्हींको वह भगवान समझके पूजने लगते है. जब हमारी संस्कृती खत्म हो जाएगी ना, तबभी आनेवाली नस्ल ऐसीही खुदाई करेगी. उस मिट्टीसे पता हा कौनसा भगवान निकलेगा? उस माटीसे निकलनेवाले भगवान होंगे, वीर विनायक दामोदर सावरकर..!"
माझ्याच्याने पुढचे ऐकवलेच गेले नाही. कानांवर तिचे शब्द पडत होते केवळ. मेंदू त्यांचा अर्थच लावायचा बंद झाला होता. डोळ्यांतून अश्रूंचा श्रावण बरसत होता. ती म्हणाली,
"..जब वह नस्ल सावरकरजीको भगवान मानना शुरु कर देगी, समझो बस तभीसे धरतीका स्वर्ग बनना शुुरु हो जाएगा!"
सावरकरांच्या स्वतःच्या राज्यात त्यांची जात पाहून द्वेष करणारे डुकरं राहात असताना अडिच-तीन हजार किलोमीटर लांबवर सावरकरांना देव मानणारी ही बाई आम्हाला त्यांचा महीमा सांगत होती. डोळ्यांतून झरणारे पाणी आणि त्यात सूर्याचा प्रखर प्रकाश, यांमुळे अस्पष्ट दिसणारी अनुराधा त्याक्षणी मानवी वाटतच नव्हती, मानव राहिलीच नव्हती. ती झाली होती "द्वीपशिखा"! चमचमणारी तेजोमयी द्वीपशिखा!! इथून पुढचे माझे अंदमानातले सारे व्याख्यानदौरे केवळ आणि केवळ ह्या द्वीपशिखेच्या दर्शनानेच पूर्ण होणार आहेत!!

— © विक्रम श्रीराम एडके
[सर्वाधिकार लेखकाधीन. लेखकाच्या नावाशिवाय कॉपी-पे
स्ट करु नये. लेखकाचे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या: www.vikramedke.com]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा