सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

आम्ही कोकणस्थ....

अल्लड उधाण वारा
बेफिकीर वाहणारा
सह्याद्रीच्या कुशीत
खुशाल फेर धरणारा
लाटांवर लाटा धावत येणाऱ्या
किनाऱ्याला जादूची झप्पी देणाऱ्या
कौलारू घरांपुढे तुळशी वृंदावन
त्यावरले राधागोविंद
अन् त्यांपुढे लावलेले निरंजन
नारळी पोफळीच्या बागा
अन् आंबा काजूची गर्द वनराई
मंदिराच्या पवित्र्यात मुग्ध देवराई
खळाळणारे पऱ्हे
आणि संथ वाहत्या नद्या
डोलणारी भातशेती
आणि फुलांनी वाकलेली कण्हेरी
रात्री घुंगुरकाठी घेऊन घेऊन
गावप्रदक्षिणा करणारा क्षेत्रपाळ
वेशीवरले महापुरुष आणि ग्रामदेवता
असंख्य मान्यमान्यता आणि परंपरा
आणि त्यातूनच आजवर जपलेली ओळख
आम्ही कोकणस्थ
अन् आता मात्र पोखरले जाताहेत सह्याद्रीचे कडे
नदीकिनाऱ्याचे काळीज खरवडून
केलं जातंय रेती उत्खनन
साऱ्या पऱ्ह्यांवर हिरवे थर साचलेले
आणि तरीही प्रस्तावित होतो इथे
नव्याने केमिकल झोन
परप्रांतीयांच्या पर्सिनेटमध्ये गोवली जाते
आमची सागरसृष्टी
आणि स्थानिक मासेमार मात्र परततो
रिकाम्या जाळ्याने आपल्या बायकामुलांच्या
आशेने उजळलेल्या चेहऱ्यांसमोर
निराश मनाने
सागरकिनारी सळसळणारी सुरुबने कापून
तिथे उभे राहत आहेत कॉटेज
पर्यटकांच्या विसाव्यासाठी
आणि त्यावरली वटवाघुळे झाली आहेत बेघर
इथे बड्या बड्या कंपन्यांना करात सूट मिळते
पण होत नाही आंबा उत्पादकांची कर्जमाफी
दरवर्षी विदर्भ-मराठवाडा मिळवत राहतो नवनवे पकेज
आणि अतिवृष्टी, पाणीटंचाई, बेरोजगारी, महागाई,
या आणि अशा अनंत अडचणींवर मात करत
आत्महत्या न करता झुंझत, झगडत आणि जिंकत राहतो
आम्ही कोकणस्थ....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा