माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साच लेकरू,
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू...
देख ग्यानियाच्या राजा,
आदिमाया पान्हावली
सर्व्याआधी रे मुक्ताई
पान्हा पियीसनी गेली...
"अरे संन्याश्याची पोरं"
कोन बोलती हिनई
टाकीदेयेल पोरांच
कधी तोंड पाहू नही...
"अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?"
ताटी लावी ग्यानदेव
घरामदी रे दडले !
उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग,
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग...
घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग,
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग...
गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं,
असा भाग्यवंत भाऊ,
त्याची मुक्ताई बहीन...
- बहिणाबाई चौधरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा