नेहमीच नसतं अचूक कुणी,
घड्याळ देखील चुकतं राव.
जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता
निसटून जातो हातून डाव.
पडत जातात उलटे फासे
घरासोबत फिरतात वासे,
अश्या वेळी मोडू नये
धीर कधी सोडू नये.
नशिबाच्या नावानेही
उगीच बोटं मोडू नये.
भरवश्याचे करतात दावे,
आठवू नये त्यांची नावे.
सगळी दारं मिटतात तेव्हा
आपणच आपला मित्र व्हावे...
मग अचूक दिसते वाट,
बुडण्या आधीच मिळतो काठ,
खडक होऊन हसत हसत
झेलता येते प्रत्येक लाट,
ज्याला हे जमलं त्याला
सामील होतात ग्रह तारे,
केवळ तुमच्या शिडासाठी
वाट सोडून वाहतील वारे,
म्हणून म्हणतो इतकं तरी
फक्त एकदा जमवून बघा,
आप्त, सखा, जिवलग यार,
स्वतःत शोधून पहा.…!
– गुरु ठाकूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा