आज माझा प्रत्येक शब्द
आभाळ झालाय
मी सडून होतो— पडून होतो— कुढून होतो
इतक्यांदि अर्थच नव्हता माझ्या शब्दाला
माझा शब्द: एक गोणपाट
कोनाड्यात पडलेले
पडलेच उपयोगी
तर कधीमधी घर पुसायला
किंवा पोचारा
मला ठाऊकच नव्हते शब्दांचे आभाळपण
कारण तुम्ही शब्दांनाच बांधलं दावणीला
कसे सांगू तुम्हांला
शब्दावाचून दिन सुने जाताना
काळजाचे कसे कोळसे झाले ते
कळणार नाही माझ्या बाबांनो
हा तळहातावर जपलेला
पाळण्यात जोजावलेला
साता समिंद्राच्य पल्ल्याडला माझा शब्द—
शब्द नाहीयच तो
लहलहणारा जळजळीत लाव्हा
जर उच्चारलाच नाही तो
तर त्वचेलाही फुटतीत शब्दांचे धूमारे !
आज चौखूर उधळलेला माझा शब्द—
कसे सांगू तुम्हांला,
आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय !
— अरुण कृष्णाजी कांबळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा