लोकहो ! तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?
माझ्या अंगांगावर झिरपतात
अपमानाच्या खोल जखमा
आमची इज्जत लुटली लुटली जात आहे
जातीयतेच्या धर्मांध व्यासपीठावर,
आमचं शील जळत आहे
धर्मग्रंथाच्या पानापानांवर
हजारो द्रौपदींचे वस्त्रहरण होत असता
बंधूंनो, भीष्म-पांडवांसारखे फक्त
खाली मान घालून बसू नका.
आतातरी डोळ्यांवरची पट्टी उघडा
हा पराजित इतिहास बदलण्यासाठी
आव्हान देणारे बलदंड हात तुम्ही तरी द्याल
का ?
लोकहो, तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल हा ?
अपमानाची भीक झोळीत टाकणार्या
त्या अभद्र भुतकाळाला
या पेटलेल्या वर्तमानाचा सुरुंग लावा.
जळून जाऊ द्या ही शतकांचे दास्य पत्करणारी
लाचार अगतिक मने.
इथला प्रत्येक प्रकाशकिरणाला
अंधाराचाच शाप आहे,
हे आकाशसुद्धा फितूर आहे
त्या काळ्याकुट्ट ढगांना.
ही धरतीसुद्धा सामील आहे
पूर्वनियोजित कारस्थानांना
ही अत्याचारी परंपरा मिटवणारे
जिद्दीने रणांगणावर लढणारे
पराक्रमी सामर्थ्य तुम्ही तरी द्याल का ?
लोकहो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद
आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल कां ?
हि माही फिर्याद
आमच्या कर्मठ संस्कृतीवर आहे
जिने आम्हांला बंद कोठडीत कैद केले आहे,
जिने आम्हांला बहिष्कृत आयुष्यांचे दान दिले आहे.
हे जहर मिसळलेलं अशुद्ध जीवन आम्ही नाकारत आहोत.
या क्रूर शापातून मुक्त होण्यासाठी
उज्ज्वल अशी मंगल प्रभात तुम्ही तरी द्याल का ?
लोकहो, तुमच्या न्यायालयात मी फिर्याद
आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?
— हिरा बनसोड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा