मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

आठवण : डॉ. कलाम


बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 

मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येत आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची.

एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो.

परंतू बाबांनी आपले जेवन शांतपणे संपवले आणि मला जवळ घेवून माझ्या शाळेतील आजच्या दिवसाची विचारपूस करू लागले. मला आता आठवत नाही मी त्यांना तेव्हा काय सांगीतले होते. पण एक गोष्ट मला आजही आठवतेय, ती म्हणजे करपलेल्या भाकरीबद्दंल आईने मागीतलेली माफी....!

यावर बाबांनी दिलेलं उत्तर मी कधीच विसरलो नाही. माझे बाबाखुप समजूतदारपणे माझ्या आईला म्हणाले, "असे काही नाही ग, मला करपलेली भाकरी खुप आवडते..."

झोपी जाण्यापूर्वी मी बाबांजवळ गेलो आणि त्याना विचारले, "खरंच तुम्हाला करपलेली, जळालेली भाकरी आवडते का..?" त्यानी मला खुप प्रेमाने आपल्या कवेत घेतले आणि समजावले, "तुझी आई दिवसभराच्या कामाने खुप थकून गेलेली असते. करपलेल्या भाकरीने मला कोणताच त्रास होणार नाही, पण मी जर त्याबद्दल तीच्यावर ओरडलो तर तीच्या हृदयाला खुप वेदना होतील. बेटा, तुला माहीत आहे का, आयुष्य खुपशा अपरिपूर्ण गोष्टीने भरलेलं आहे. आणि मी परिपूर्ण नाही."

मी माझ्या आयुष्यात इतर सोहळे विसरलो तरी एक गोष्ट कायम हृदयावर कोरून ठेवलीय. प्रत्येक नाते जपण्यासाठी एकमेकांचे दोष स्विकारायचे आणि नात्यांचा आनंद घेत रहायचे.

आयुष्य खुप छोटे असते. जे लोक तुम्हाला योग्य वागणूक देतात त्यांच्यावर प्रेम करा. जे देत नाहीत त्यांच्याबद्दल मनात आत्मीयता ठेवा....!!

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

स्पर्शातून


विसरसीमेहून आठवत आठवत येत आहे
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?
अस्ताभोवती माझं पालवताना मन तुमच्या
मास्तर, उभ्याच आहेत रेघा भागाकाराच्या
वेशीच्या
तुम्ही एक अधिक एक शिकवलं
मास्तर, मला तुमच्यात मिळवलं
येता जाता ठेच लागायची,
मास्तर, होता तुम्ही वेशीबाहेर
आमचं नालंदा तुमचं घर
हाडांनी सांधलेली तुम्ही एक आकृती होता
माणूस होता, नागरिक होता, स्वच्छ स्वच्छ नीती होता
तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी
अजूनही नाही कळत मास्तर, तुम्ही अस्पृश्य कसे होता ?
होताहेत आता मुक्त संवाद आकाश-मातीचे
पण नालंदा कुठं आहे ?
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?
— फ. मुं. शिंदे

शब्द


आज माझा प्रत्येक शब्द
आभाळ झालाय
मी सडून होतो— पडून होतो— कुढून होतो
इतक्यांदि अर्थच नव्हता माझ्या शब्दाला

माझा शब्द: एक गोणपाट
कोनाड्यात पडलेले
पडलेच उपयोगी
तर कधीमधी घर पुसायला
किंवा पोचारा

मला ठाऊकच नव्हते शब्दांचे आभाळपण
कारण तुम्ही शब्दांनाच बांधलं दावणीला
कसे सांगू तुम्हांला
शब्दावाचून दिन सुने जाताना
काळजाचे कसे कोळसे झाले ते
कळणार नाही माझ्या बाबांनो
हा तळहातावर जपलेला
पाळण्यात जोजावलेला
साता समिंद्राच्य पल्ल्याडला माझा शब्द—
शब्द नाहीयच तो
लहलहणारा जळजळीत लाव्हा
जर उच्चारलाच नाही तो
तर त्वचेलाही फुटतीत शब्दांचे धूमारे !

आज चौखूर उधळलेला माझा शब्द—
कसे सांगू तुम्हांला,
आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय !

— अरुण कृष्णाजी कांबळे

फिर्याद


लोकहो ! तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?

माझ्या अंगांगावर झिरपतात
अपमानाच्या खोल जखमा
आमची इज्जत लुटली लुटली जात आहे
जातीयतेच्या धर्मांध व्यासपीठावर,
आमचं शील जळत आहे
धर्मग्रंथाच्या पानापानांवर
हजारो द्रौपदींचे वस्त्रहरण होत असता
बंधूंनो, भीष्म-पांडवांसारखे फक्त
खाली मान घालून बसू नका.
आतातरी डोळ्यांवरची पट्टी उघडा
हा पराजित इतिहास बदलण्यासाठी
आव्हान देणारे बलदंड हात तुम्ही तरी द्याल
का ?

लोकहो, तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल हा ?

अपमानाची भीक झोळीत टाकणार्या
त्या अभद्र भुतकाळाला
या पेटलेल्या वर्तमानाचा सुरुंग लावा.
जळून जाऊ द्या ही शतकांचे दास्य पत्करणारी
लाचार अगतिक मने.
इथला प्रत्येक प्रकाशकिरणाला
अंधाराचाच शाप आहे,
हे आकाशसुद्धा फितूर आहे
त्या काळ्याकुट्ट ढगांना.
ही धरतीसुद्धा सामील आहे
पूर्वनियोजित कारस्थानांना
ही अत्याचारी परंपरा मिटवणारे
जिद्दीने रणांगणावर लढणारे
पराक्रमी सामर्थ्य तुम्ही तरी द्याल का ?

लोकहो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद
आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल कां ?

हि माही फिर्याद
आमच्या कर्मठ संस्कृतीवर आहे
जिने आम्हांला बंद कोठडीत कैद केले आहे,
जिने आम्हांला बहिष्कृत आयुष्यांचे दान दिले आहे.
हे जहर मिसळलेलं अशुद्ध जीवन आम्ही नाकारत आहोत.

या क्रूर शापातून मुक्त होण्यासाठी
उज्ज्वल अशी मंगल प्रभात तुम्ही तरी द्याल का ?
लोकहो, तुमच्या न्यायालयात मी फिर्याद
आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?

— हिरा बनसोड

माझी मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साच लेकरू,
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू...

देख ग्यानियाच्या राजा,
आदिमाया पान्हावली
सर्व्याआधी रे मुक्ताई
पान्हा पियीसनी गेली...

"अरे संन्याश्याची पोरं"
कोन बोलती हिनई
टाकीदेयेल पोरांच
कधी तोंड पाहू नही...

"अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?"
ताटी लावी ग्यानदेव
घरामदी रे दडले !

उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग,
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग...

घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग,
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग...

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं,
असा भाग्यवंत भाऊ,
त्याची मुक्ताई बहीन...

- बहिणाबाई चौधरी

नेहमीच नसतं अचूक कुणी..

नेहमीच नसतं अचूक कुणी, 
घड्याळ देखील चुकतं राव.
जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता 
निसटून जातो हातून डाव.

पडत जातात उलटे फासे 
घरासोबत फिरतात वासे,
अश्या वेळी मोडू नये 
धीर कधी सोडू नये.

नशिबाच्या नावानेही 
उगीच बोटं मोडू नये.
भरवश्याचे  करतात दावे, 
आठवू नये त्यांची नावे.

सगळी दारं मिटतात तेव्हा 
आपणच आपला मित्र व्हावे...

मग अचूक दिसते वाट, 
बुडण्या आधीच मिळतो काठ,
खडक होऊन हसत हसत 
झेलता येते प्रत्येक लाट,

ज्याला हे जमलं त्याला 
सामील होतात ग्रह तारे,
केवळ तुमच्या शिडासाठी 
वाट सोडून वाहतील वारे,

म्हणून म्हणतो इतकं तरी 
फक्त एकदा जमवून बघा,
आप्त, सखा, जिवलग यार, 
स्वतःत शोधून पहा.…!

– गुरु ठाकूर

वामांगी

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट

मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण

अरूण कोलटकर

प्रेम

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं

सुधीर मोघे

तक्ता

अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही

आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरजाय?

अरुण कोलटकर