शुक्रवार, ६ मार्च, २०१५

महिकावतीची बखर - भाग ६

नागरशाचा प्रतिहल्ला ...

बिंबदेव यादव महिकावती, साष्टीआणि मुंबई भागात शके १२१६ ते १२२५ (इ.स. १२९४ ते १३०३) या दरम्यान राहत होता. यादवांचे मुळचे देवगिरी - पैठणचे राज्य कधीच खिलजीच्या हाती गेले होते. बिंबदेव आपल्या २ राण्यांबरोबर महिकावती येथे राज्य करू लागला. मोठ्या राणीचे नाव नगर सिद्धी होते आणि तिला प्रतापशा नावाचा पुत्र होता. धाकट्या राणीचे नाव गिरीजा होते आणि तिला पूरशा नावाचा पुत्र होता. शके १२२५ मध्ये बिंबदेव वारला आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र प्रतापशा गादीवर आला. ह्या ९ वर्षात चेउल येथे नागरशा वृद्ध झालेला होता. त्याला त्रिपुरकुमर शिवाय केशवदेव नावाचा दुसरा पुत्र आणि एक मुलगी देखील होती. ह्या मुलीचे लग्न त्याने प्रतापशा यादव बरोबर लावले होते.

पुढे शके १२३२ मध्ये मात्र प्रतापशा यादव याला देवगिरी वरून मदत मिळायची फार अपेक्षा नसल्याने त्रिपुरकुमर याने नवी कुरापत काढली. मेढालगड नावाचा एक डोंगरी किल्ला त्याने आपला मेव्हणा प्रतापशा यासकडे मागितला. अर्थात त्याला प्रतापशाने नकार दिला. इतके कारण पुरे धरून त्रिपुरकुमरने आपला भाऊ केशवदेव यास सोबत घेऊन लढाईची तयारी केली. प्रतापशाने देवगिरीकडे मदतीचे हात पसरीले. देवगिरीवरून रामदेवरायने काही फौज रवाना केली पण त्रिपुरकुमरने त्यांना शहापूर - माहुली येथेच गाठून धुळीस मिळवले. दुसरीकडे प्रतापशाने स्वतः लढाईची काही तयारी केली होती पण जेंव्हा त्याला ही बातमी पोचली तेंव्हा तो निराश होऊन आपल्या फौजेसह डहाणू - सायवन येथील गगनमहाल येथे आश्रयास निघून गेला.

त्रिपुरकुमरने यादव फौजेचा माहुलीला पराभव केला म्हणजे त्याआधी साष्टी - कल्याण त्याच्या हातात आले होते हे स्पष्ट होते. आपल्या हातचा बराच भाग त्रिपुरकुमरने जिंकला आणि येणाऱ्या फौजेचा सुद्धा पराभव केला हे ऐकून, कच खाऊन प्रतापशा बहुदा थोडा मागे डहाणूला गेला असेल. इथे त्रिपुरकुमर फौज घेऊन महिकावतीच्या दिशेने वेगाने येत होता. दरम्यान रामदेवरायाने देवगिरीहून नवी फौज लढाई करता रवाना केली होती. ह्या दोन फौजा वैतरणा नदीच्या काठी असलेल्या तांदूळवाडी येथे समोरा समोर आल्या. पण आता त्रिपुरकुमर पराभूत होणार नव्हता. तुंबळ युद्धात त्याने पुन्हा एकदा यादव सेनेचा धुव्वा उडवला आणि प्रतापशाच्या महिकावातीवर पुन्हा एकदा कब्जा केला. पुढच्या काही काळात त्याने प्रतापशाच्या प्रमुख ५४ प्रभू सरदारांना आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याना योग्य असे अधिकार देऊन टाकले. अशा तर्हेने नागरशाने आपले गेलेले राज्य पुन्हा मिळवून घेतले. मृत्युपूर्वी त्याला ते एक समाधान नक्कीच मिळाले असेल. नागरशा मागोमाग पुढच्या २० एक वर्षात त्रिपुरकुमर आणि केशवदेव हे त्याचे दोन्ही पुत्र मरण पावले. त्रिपुरकुमर मागून त्याचा पुत्र नागरशा दुसरा गादीवर आला.


तिथे २०-२५ वर्ष प्रतापशा मोजक्या डहाणू भागावर नियंत्रण ठेवून कसाबसा जगत होता. त्याचे सर्व सरदार अधिकारी नागरशाचे झालेले होते. उरलेल्या देसाई पाटलांना नागरशा दुसरा याने शके १२५४ (इ.स. १३३२) मध्ये फितवून प्रतापशा याचा सर्वनाश करून टाकला. अश्या तर्हेने नागरशाने यादव राजघराण्याचे नाव अवघ्या ३८ वर्षात कोकणातून पुसून टाकले. उत्तर भारत आणि महाराष्ट्रात मुसलमानांचे राज्य आलेले होते. फक्त उत्तर कोकणात नागरशा हा एकमेव स्वतंत्र हिंदू राजा उरला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा