बुधवार, १० डिसेंबर, २०१४

आज मला उत्तरं हवी आहेत...




त्या दिवशी तू मला भेटायला आलास,
पण येण्यापुर्वीच कळवलंस,
‘आज लाल रंगाचीच साडी नेस मला आवडते.’
मी तुझ्यासाठी... फक्त तुझ्यासाठी,
त्या दिवशी लाल रंगाची साडी नेसले.

नंतर एके दिवशी म्हणालास,
‘कपाळावर एक थेंब गंध टेकवण्यापेक्षा
चंद्रकोर लावत जा.’
मी तुझ्यासाठी कपाळावर चंद्रकोर रेखली.

माझ्या मोकळ्या केसातून हात फिरवत एकदा परखडपणेच म्हणालास,
‘अशा मोकळ्या केसांपेक्षा वेणी जास्त चांगली दिसेल.’
तुझ्या शब्दाखातर मी माझे केस वेणीत वळले.

तुझ्यासाठी मी एवढी बदलले,
स्वतःची जीवनशैली बदलली,
पण एक सांग,
तुझ्या स्वभावातली एकतरी गोष्ट तू माझ्यासाठी बदलू शकशील का?

मी तुला सांगितलं तर,
नको लावूस कपाळावर अष्टगंधाचा टिळा,
सोडून देशील का माझ्यासाठी तुझा खादीचा लळा?
काय होईल मी मांडल्या तर माझ्या मनातील भावना?
पेटून उठशील,
माझ्यावर भडकशील,
कदाचित आठवडाभर अगर महिनाभर तोडून टाकशील माझ्याशी असणारा संपर्क,
नाहीतर अगदी टोकाला जाऊन सांगशील विसर मला.

मला खात्री आहे,
माझे विचार तू जुळवून घेऊच शकत नाहीस.
कारण तुझ्यालेखी स्त्रीला विसरता येतं तिचं स्वतंत्र व्यक्तित्व.
तिच्या अस्तित्वाची जाणीव तिला आणि समाजाला नसली तरी फारसा फरक पडत नाही.
पण जपायला हवी ती आपल्या देशाची खरी ओळख,
इथली पुरुषप्रधान विचारसरणी,
पितृसत्ताक संस्कृती...

इतरांचं राहूच दे,
पण तूदेखील मला आणि माझ्या विचारांना त्याच कसोटीवर तपासून पाहतोस.
तुला मी हवी आहे पण तुला हवी तशीच.
तुझ्या प्रत्येक निर्णयाला खालमानेने संमती देणारी.

अरे पण कसं शक्य आहे ते?

तूच जागृत करतोस माझ्यातल्या जाणिवांचा ज्वालामुखी
आणि तूच नाकारतोस त्यांचा प्रभाव आणि क्षमता
की घाबरतोस त्यांच्या संभाव्य दाहकतेला?

म्हणूनच नव्या नात्याच्या उंबरठ्यावर जरा स्पष्टच विचारते

जी आता आहे ती वादळापूर्वीची शांतता,
पण मीही आहे एक धगधगता विस्तव,
वादळ पदरात बांधायची माझी तयारी आहे,
पण तुझ्या शेल्यात आहे का सामर्थ्य

विस्तव बांधून घेण्याचं? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा