कोकण, माझं कोकण, तुमचं कोकण, समृध्द कोकण
खरं सांगायचं तर आपली ओळख विसरलेले कोकण ...१
कौलारू घर, घरापुढे अंगण, संपत चालली ही परंपरा
बंगल्यांतल्या एसीमध्ये कोंडू लागलाय स्वच्छंद
वारा ...२
घरापुढंच वृंदावन गेलं, आता आम्ही बोन्साय
ठेवतो
शुभंकरोती ऐवजी आता टीव्हीचाच आवाज गुंजतो ...३
गेली ती पान सुपारी, पडवी गेली, झोपाळे गेले
तिरक्या रिपीच्या खिडकीतून डोकावणेही गेले ...४
गवताने शाकारलेले गोठे संपत चाललेत हळूहळू
गोठ्यामधली गुरंही रस्त्यावर लागलीयेत फिरू ...५
गायरान झालं सरकारजमा, वनराईसुद्धा संपली
ओसाड रानावरली जुनी देवस्थानं तेवढी वाचली ...६
पारंपारिक ढोल ताशे गेले, डीजे नी डॉल्बी आले
बारा वाड्यांचे देव आता देवळापुरतेच राहिले ...७
क्षेत्रपाळाची घुंगुरकाठी आता अंधश्रद्धा ठरली
वाडवडिलांचे देवाचार आणि पुण्याईही सरली ...८
डांबरी रस्ते जिथे तिथे, कोबा आला घरापुढती
लाल मातीची वर्णनं राहिली फक्त कवितेपुरती ...९
शास्त्री जगबुडी वशिष्ठी नकाशावर राहिल्या
हिरव्यागार तवंगाखाली पूर्णपणे गुदमरल्या ...१०
उधाण समुद्र अजूनही टिकून आहे पश्चिमेकडे
साऱ्या शहराची घाण रीचवतोय निमुटपणे ...११
काळ बदलला तसं कोकणही बदलत गेलं
काळजाच्या शहाळ्यातलं पाणीही आटलं ...१२
आंबा फणसाने लदलेला, सह्याद्रीने वेढलेला
असा हा कोकण प्रांत परशुरामाने निर्मिलेला ...१३
आजही आमचे कोकण आमचा अभिमान आहे
मनामनात जपलेला आमचा स्वाभिमान आहे ...१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा