सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

बेगड



सकाळचे साडेआठ वाजत आले होते, पण अजूनही पहाटेचं धुकं डोंगरावरून सरलं नव्हतं. त्या धुक्यातून आपला काळा धूर सोडत नागमोडी वळणांनी कोकणची राणी रेल्वे स्थानकात दाखल झाली. तो काही पर्यटनाचा काळ नव्हता किंवा ते काही कोरेचे महत्त्वाचे स्थानकही नव्हते मात्र तरीही गावातल्या असंख्य लोकांची प्रचंड गर्दी तिथे दिसत होती. कोंकण रेल्वे साठी सर्व प्रकारचे सहाय्य करणाऱ्या, आपली जमीन स्वेच्छेने देणाऱ्या लोकांची कृतज्ञता म्हणून अवघ्या तीन गाड्या त्या स्थानकावर थांबत. त्यातील बहुतेक ती एक गाडी असावी. गर्दीतून वाट काढत मी बाहेर आले. रिक्षा पकडली आणि थेट बसस्थानक गाठलं. बस ही मिळाली. कधी नव्हे ती अगदी वेळेवर.

बस मधून उतरले आणि परत रिक्षा पकडली. मनात आलं, जिल्ह्याच्या कुठल्या कोपऱ्यात ठेवलंय हे साहित्य संमेलन. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, आयोजकांचा हा निर्णय अत्यंत योग्य आहे. त्यानिमित्ताने तरी ग्रामीण भागातील लोकांना चार चांगले साहित्यिक ऐकायला मिळतील. स्थानिक कवी आणि लेखकांना व्यासपीठ मिळेल. मनात आयोजकांबद्दल अपार आदर घेऊन मी संमेलनाच्या ठिकाणी उतरले. फुलांनी सजवलेले प्रवेशद्वार, सभोवताली रांगोळ्या आणि तितक्याच उत्साहाने धावपळ करणारी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची फौज पाहून मन उल्हासित झालं होत. मी काव्यसंमेलनासाठी निमंत्रित होते. विद्यार्थी माझ्याही सह्या घेत होते सुरुवात तर छान झाली होती. पाहता पाहता रंगमंच सजला, सभागृह पाहुणे आणि प्रेक्षकांनी भरले आणि दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. मान्यवर अध्यक्षांचे भाषणही छान झाले. ‘साहित्यिकांचे साहित्य हे बहुराष्ट्रीय कंपन्यांत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या उच्चशिक्षित महिलांसाठी नव्हे तर खेड्यापाड्यातील श्रमिक, कष्टकरी, अल्पशिक्षित स्त्रियांसाठी असले पाहिजे.’ अध्यक्ष बाई खरंच खूप छान बोलल्या आणि उपस्थित मान्यवरांनीही त्यांचीच री ओढली. भरगच्च कार्यक्रमांनी रेलचेल असणारा पहिला दिवस छान चालला होता. निमंत्रितांची चांगली सरबराई होत होती. दुपारी सुर्यनारायण आग ओकत असताना निमंत्रितांना थंड पाणी मिळत होते, कुलरचा वारा मिळत होता, आयोजकांच्या पै-पाहुण्यांनी सभागृह गच्च भरलं होतं. आणि मोठमोठ्या साहित्यिकांची आणि तथाकथित सेलिब्रेटींची एक झलक मिळवण्यासाठी कपाळावरचा घाम पालथ्या मनगटाने पुसत तासनतास उभ्या असणाऱ्या बिनचेहऱ्याच्या साहित्यप्रेमींना पाहतच मनाला विलक्षण अस्वस्थता देत पहिला दिवस संपला

तीन दिवसीय संमेलनाच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या सत्राच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच  मी पोहोचले माझ्याही आधी पोहोचली होती तिथल्या स्थानिक शाळांतील स्वयंसेवक विद्यार्थी मंडळी अन् धावतपळत आलेल्या महिलांची नाश्ता बनवण्याची लगबग सुरु होती. तोच आदल्या दिवशी श्रमिक महिलांचा कैवार घेणाऱ्या मंचावरील मान्यवर बाई हजर झाल्या.

“हे काय अजून नाश्ता नाही झालेला? वेळ काय झाली? हे कसलं नियोजन? या बायकांना लौकर यायला का झालं होतं? आता आम्ही निमंत्रित असूनही साधा नाश्ता आम्हाला मिळू नये वेळेवर? काय चाललंय हे? “

बाई संतापल्या होत्या.

“बाई, तुमचं बरोबर आहे. मात्र या बायका लांबवरच्या गावांतून येतात. त्यांना त्यांच्याही घरचं आवरून यायचं असतं. त्यांना जरा सांभाळून घ्या. नाश्ता आत्ता होईल तयार. सारी तयारी झाली आहे.”

नियोजन समितीच्या सदस्यांनी सारवासारव केली.

“सांभाळून घ्या म्हणजे काय? त्यांच्या समस्यांशी आम्हाला काय घेणं देणं? आम्ही पैसे मोजणार आहोत त्यासाठी. त्यांना झेपत नसेल तर करू नये त्यांनी काम. यांचे पैसेच कापून घ्या त्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही.”

बाई चांगल्याच संतापल्या होत्या.

नाश्त्यावरचं मन उडून गेल्यावर मी थेट सभागृहात येऊन बसले. काही केल्या डोक्यातून आदल्या दिवशीचं अध्यक्षीय भाषणच जाईच ना. अन् डोळ्यादेखत घडलेला प्रसंग डोक्यातील विचारचक्र अधिकच गतिमान करीत होता. फुल स्पीड गाडीला करकचून ब्रेक दाबावा तसं हे विचारचक्र एकाएकी थांबलं. बाई आता कृतीप्रवण झाल्या होत्या. माझे कान आपोआप टवकारले गेले.

“नागपूर मधल्या एका मुलीवर अत्याचार झालाय. तिच्यासह तिच्या शाळेतील विद्यार्थीही उपोषणाला बसले आहेत. साहित्यिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण या अशा कृत्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. आपलं ते आद्य कर्तव्य आहे. एका महिलेवर अन्याय होत असताना आपण असं शांत राहणं मुळीच योग्य नाही. या साहित्य संमेलनांचे मंच हे समाजातल्या अशा कुप्रवृत्तींचा निषेध करण्यासाठीच असले पाहिजेत. चला सुज्ञ साहित्यिकांनो, चला. आपण या साऱ्या कृत्याचा जाहीर निषेध करूया.”

आता बाई पोटतिडकीने सर्वांना आवाहन करीत होत्या. त्यांच्या आवाहनाने अनेक निमंत्रित साहित्यिक पेटून उठले. त्यांच्या समर्थनात त्यांच्या मागून चालू लागले. बाई आता नागपूरला निघाल्यात की काय या शंकेने मीही त्या कळपात सामील झाले. पाहते तर काय टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी आले होते. अन् आपल्या वाहिनीला ब्रेकिंग न्युजची स्ट्रीप चिकटवायला ते बाईंची बाईट घेत होते. बाईट संपली कळपातली गर्दी पांगली आणि बाई आपल्या  मूळ मुद्द्यावर आल्या. नियोजन समितीच्या सदस्यांना बोलावणे झाले आणि जेवण बनवणाऱ्या बायकांचे किती पैसे कापले जाणार याची विचारणा सुरु झाली.

माझा कार्यक्रम दुपारच्या सत्रात होता. मात्र मी लागलीच सभागृहातून काढता पाय घेतला. एव्हाना रांगोळ्या फिक्या पडल्या होत्या. फुलांच्या सजावटीतला जिवंतपणा निघून गेला होता. आणि मन विषण्ण झालं होतं. माझ्या लेखी या काही मिनिटांच्या घटनाक्रमातच त्या साहित्य संमेलनाचे, साहित्यिक चळवळीचे आणि तथाकथित साहित्यिकांच्या जीवनवादाचे सूप वाजले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा