य: क्रियावान स पंडित:
जो क्रियाशील असतो तोच खरा पंडित असतो. डॉ. अब्दुल कलामांचे देशाच्या विकासात नेमके कोणते योगदान होते, हा विषय त्यांच्या निधनानंतर प्राधान्याने चर्चिला जातो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रमापासून विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर बोलले जात आहे हे योग्यच आहे. पण, खरेतर त्यापेक्षाही राष्ट्रपती पदावर असतांना आणि प्राधान्याने त्यानंतर त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील अभूतपूर्व कार्याचे महत्त्व समजून घ्यायला हवे. शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ यासारखी शैक्षणिक संस्था सुरू करणे, कोणत्यातरी देशी-विदेशी विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन करणे, आपल्या अभ्यासविषयासंबंधी संशोधनपर ग्रंथ लेखन करणे, प्रयोगशाळेत प्रयोग करून नवनवीन शोध लावणे, किंवा शिक्षण विषयक मार्गदर्शन करणार्या एखाद्या आयोगावर कार्य करणे, यासारखे सद्यस्थितीत शेैैक्षणिक मानले जाणारे कार्य त्यांनी केले नाही. एखाद्या विद्यापीठापुरते एका विशिष्ट वयोगटातील व विशिष्ट बौद्धिक पातळी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट वेळापुरते आणि कमीतकमी शारीरिक त्रास होईल एवढेच अध्यापन करणे एवढीच शैक्षणिक कार्याची मर्यादा मानली नाही. उलट वय वाढत असताना, दूरदूरचा प्रवास करणे हे अत्यंत त्रासदायक होण्याची शक्यता असतानाही त्यांनी आसेतू हिमाचल एवढ्या विशाल प्रदेशातील सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यापीठातील विद्यार्थी हे आपले विद्यार्थी मानून सातत्याने केलेले प्रबोधनाचे कार्य हे केवळ अभूतपूर्व असे होते. या कार्याचे विविध वेधक पैलू होते.
डॉ. कलामांना शिक्षणव्यवस्थेतील विविध प्रकारच्या विषमतांची उत्तम जाण होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासाठी कोणत्याही सोयी न मिळणे आणि शहरी भागातीलही बहुतांश विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण न मिळणे, ही त्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त चिंतेची बाब होती. युवक आणि लहान मुले यांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात बालकांना आणि युवकांना देशातील राज्यव्यवस्थेकडून व शैक्षणिक संस्थांकडून अत्यंत उपेक्षेची वागणूक मिळते. चांगले अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले उत्तम दर्जाचे शिक्षक व महत्त्वाच्या सर्व शैक्षणिक सोयीसुविधा या देशातील सर्व मुला-मुलींना आणि युवक-युवतींना मिळत नाहीत व ती कोणाला गंभीर बाबही वाटत नाही, हेही ते बघत होते. देशातील निवडक शालेय विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालये, आणि निवडक युवक-युवतींना आयआयएम किंवा आयआयटी सारख्या निवडक शिक्षण संस्थांमधे शिक्षण दिले जाते. तिथे ग्रंथालये, प्रयोगशाळा अशा सर्व उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सोयी असतात. अद्ययावत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याएवढी गुणवत्ता असलेले शिक्षक असतात. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा स्पर्धा असतात. नामवंत विद्वानांशी, प्रेरणादायी व्यक्तींशी, कलाकारांशी, संशोधकांशी, संवाद साधण्याची संधी असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी असंख्य उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षक विद्यार्थी यांच्यातील संवादाला भर देणार्या सहयोगी शिक्षण पद्धतीला महत्त्व दिलेले असते. या सोयी सवलतींचा दूरगामी सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर होतो. पण या अशा सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी सवलतींना या देशातील लक्षावधी मुलामुलींना आणि युवक युवतींना वंचित राहावे लागते, याचा अनुभव डॉ. कलामांना आयुष्यभर आलेला होता. या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविणे त्यांना अशक्य असले तरीही त्यांनी आपल्या सर्जनशीलतेनी काही अभिनव उपक्रम हाती घेतले व त्यातून एक वेगळीच वाट निवडली.
आपल्या देशातील विविध वयोगटातील लक्षावधी विद्यार्थ्यांशी ई-मेलव्दारे संवाद साधण्यास त्यांनी सुरुवात केली. या अभिनव पद्धतीमुळे कोणालाही त्यांच्याशी संपर्क करणे शक्य होऊ लागले. येणार्या हजारो ई-मेल वाचून जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तेव्हा विद्याथ्यार्र्ंच्या अक्षरश: हजारो प्रश्नांना ते उत्तरेही देऊ लागले. हे अभूतपूर्व होते. विद्यार्थ्यांना मूर्ख समजून त्यांना येता जाता कायम उपदेशाचे डोस पाजणे, भाषणबाजीतून मार्गदर्शन करणे, प्रश्नच विचारू न देणे, व कोणी प्रश्न विचारल्यास त्याचा पाणउतारा करणे, ज्या गोष्टी आपल्या जीवनात कधीच आचरणात आणल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांनी आचरणात आणाव्या म्हणून अपेक्षा करणे, आणि विद्यार्थ्यांतून होता होईतो विचार न करणारी व मुकाटपणे आपल्या आज्ञा पाळणारी पिढीकिंवा संस्थेचा कार्यकर्ता घडविणे, आपण सांगतो तेच योग्य व आदर्श म्हणून वारंवार सांगणे, म्हणजेच युवकांशी संवाद करणे, असे आपल्या देशातील बहुतांश पालक, शिक्षक,ज्येष्ठ व्यक्ती मानतात. ही ज्येष्ठांची प्रचलित भूमिका पूर्णत: नाकारून डॉ. कलाम हे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास, स्वतंत्र बुद्धीने विचार करण्यास, विचारांती जे योग्य वाटेल तेच स्वीकारण्यास प्रोत्साहन देऊ लागले. मार्गदर्शनाची, चांगल्या गोष्टी सांगण्याची पद्धतही त्यांनी बदलून टाकली. ज्या गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या त्या विद्यार्थ्यांनी कराव्या असे ते सांगू लागले. विविध क्षेत्रातील यशामुळे त्यांच्या सांगण्याचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडू लागला.
ई-मेल व्दारे जसा ते विद्यार्थ्यांशी अभिनव पद्धतीने संवाद साधत होते तसाच संवाद त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमधील भाषणांतून, प्रश्नोत्तरांतून, आणि चर्चेतून सुरू ठेवला. फक्त उच्च दर्जाच्या, शहरातल्या व श्रीमंतांच्या शैक्षणिक संस्थांना मानधनाची अपेक्षा करीत भेट न देता, अक्षरश: सर्व प्रकारच्या व दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या आमंत्रणाचा कोणतीही अपेक्षा न करता स्वीकार केला आणि त्या त्या संस्थांतील हजारो विद्यार्थ्यांशी नाळ जोडली. वर्षानुवर्षे अध्यापन क्षेत्रात राहूनही असंख्य शिक्षक व प्राध्यापक जो संवाद साधू शकले नव्हते, ते कार्य डॉ. कलाम आपल्या प्रत्येक संवादातून साध्य करू लागले. या कार्यक्रमांतून जगातील नामवंत विद्यापीठांमधे व शैक्षणिक संस्थांमधे प्रचलित असलेल्या संवादाधारित व स्वतंत्रपणे विचार करण्यास प्राधान्य देणार्या अध्यापन पद्धतीचा डॉ. कलामांनी हजारो विद्यार्थ्यांना जसा परिचय करून दिला, तसाच अल्प प्रमाणात का होईना लाभही करून दिला. या भेटीत ते भाषण देत, प्रश्न विचारत, प्रश्न विचारण्यास, विचार करण्यास समस्यांची उत्तरे शोधण्यास प्रोत्साहन देत. आपली संपूर्ण शिक्षणपद्धती ही माहितीकेंद्री झालेली आहे. विचार करण्यास त्यात अत्यल्प महत्त्व आहे. विचार करायला बाध्य करणार्या शिक्षकांचाही अभाव आहे. बहुतेक जण हे तयार नोट्स विद्यार्थ्यांना लिहून घेण्यास सांगणारे असतात. ते प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत नाहीत कारण अनेकदा प्रश्नांची उत्तरे त्यांनाच माहीत नसतात. माहिती केंद्री अभ्यासामुळे व विचार करण्यास काहीच महत्त्व नसल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत नाही. ते समस्यांची उत्तरे शोधू शकत नाहीत. समस्यांवर मात करणे मग अगदीच कठीण होते. विद्यार्थ्यांची प्रगती होणेच थांबते. देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे घडलेले आहे. अशा परिस्थितीत डॉ. कलामांनी त्यांना विचार करायला लावल्याने केवढा महत्त्वाचा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला हे लक्षात येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. कलाम यांनी सातत्याने सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागविण्याचे कार्य केले. काही अपवाद वगळता आपल्या शैक्षणिक संस्थांतील शिक्षक प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना काय येत नाही याची जास्त दखल घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यात जन्मत:च एक किंवा अधिक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, हे न ओळखता त्याला जे येते त्याकडेही पूर्ण दुर्लक्ष करतात. अनेकदा तर शिक्षक, प्राध्यापकांना आपल्या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखताच येत नाही. असे शिक्षक प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी, केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजीसारखे विषय येत नाहीत म्हणून अगदी सहजगत्या त्यांचा पाणउतारा करताना दिसतात किंवा त्यांना कमीपणाची वागणूक देतात. वर्गात सर्वात मागे बसणारे विद्यार्थी तर शिक्षकांच्या दृष्टीने सर्वात निरुपयोगी असतात. ‘या आज वर्गात मागे बसणार्या विद्यार्थ्यांमधे भविष्यातील प्रतिभावान वैज्ञानिक, किंवा यशस्वी व्यक्ती असण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा’, हे डॉ. कलाम सांगत असत. त्यांचा हा संदेश केवळ मेरीटमधे आलेल्या व परीक्षांमधे खूप गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांनाच महत्त्व देणार्या हजारो शाळा व महाविद्यालयांच्या संचालकांना व शिक्षकांना खरेतर आत्मपरिक्षण करण्यास बाध्य करणारा होता. डॉ. कलाम आपल्या भाषणांतून कायम सर्व विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्यास व आत्मविश्वास जागविण्यास सांगत असत. त्यांनी आत्मविश्वास जागवण्याचे हे जे कार्य केले तेही असेच अभूतपूर्व होते. सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून कायम ज्यांना हिणवले गेले, अशा विद्यार्थ्यांना ते तुम्ही तुमचे आयुष्य घडवू शकता, तुम्हीही प्रयत्न केलेत तर यशस्वी होऊ शकता, असे सांगत असत. असा आत्मविश्वास जागवणार्या व्यक्तींची आज फारच गरज आहे. केवळ आत्मविश्वास नसल्याने असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी आज अपयशी होतांना दिसतात. म्हणूनच त्यांचे हे सांगणे शैक्षणिक क्षेत्रातील नकारात्मक वातावरणात सकारात्मक दृष्टिकोन देणारे, प्रेरणादायी असे होते. अशा प्रयत्नांची आजही नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे केवळ चांगल्या शिक्षणाच्या सोयी न मिळाल्याने मागे पडतात असे ते वारंवार सांगत असत. मात्र, त्याबरोबरच कोणतीही नकारात्मक परिस्थिती किंवा समस्या असल्या तरीही त्यांच्यावर विद्यार्थी आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर मात करू शकतात हे ते सांगत होते. त्यांचे हे सांगणे त्यांच्या जीवनात त्यांनी सिद्ध करून दाखविले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागविण्याचे कार्य करणारे डॉ. कलाम हे एकमेव वैज्ञानिक ठरले.
डॉ. कलाम आपल्या भाषणांतून जे विषय मांडत होते तेही महत्त्वाचे होते. सहसा शालेय व अगदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोरही देशासमोरचे खरे प्रश्न नीट मांडलेच जात नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधेही देशासमोरील प्रश्नांबद्दल अज्ञानच असते, असे दिसून येते. शैक्षणिक संस्थांतूनही देशासमोरील समस्यांबद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन होत नाही. अभ्यासक्रम शिकविणे आणि विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी करून घेणे, एवढेच काय ते महत्त्वाचे मानले जाते. डॉ. कलामांनी, मात्र याही बाबतीत वेगळा मार्ग चोखाळला. अगदी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि नामवंत शैक्षणिक संस्थांतील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसमोरही ते न चुकता प्रदूषण, सामाजिक- आर्थिक विषमता, पर्यावरण संरक्षण, साक्षरता, गरिबी, दारिद्य्र, आर्थिक-सामाजिक मागासलेपण, बेरोजगारी, पाण्याचे दुर्भिक्ष, ग्रामीण भागातील समस्या, अशा असंख्य मुद्यांसंबंधी बोलत असत. हे प्रश्न सोडविण्यासाठी काय काय करायला हवे हे ही ते आवर्जून सांगत. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केले पाहिजेत व त्यासाठी कटिबद्ध होण्याचे ते आवाहन करीत असत. तशा आशयाची शपथही देत असत. देशासमोरील मूलभूत जीवनमरणाच्या समस्यांबद्दल हजारो शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे व त्यांना हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य एवढया मोठया प्रमाणात करणारे डॉ. कलाम हे एकमेव होते.
आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत डॉ. कलाम हे नियमितपणे व सातत्याने लेखन करीत गेले. त्यांनी आपल्या अनुभवांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून असंख्य जणांना प्रेरणा मिळाली व यापुढेही प्रेरणा मिळत राहील. परिषदा, चर्चासत्रे, भाषणे, लेखन, चर्चा, प्रश्नोत्तरे, ई-मेल या माध्यमातून त्यांनी लक्षावधी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना प्रोत्साहन दिले, त्यांचा आत्मविश्वास जागवला, त्यांना प्रश्न विचारून किंवा प्रश्न विचारायला सांगून विचारप्रवृत्त केले. कोणत्याही वयोगटातील कोणाही विद्यार्थ्याला न घाबरता आपल्याशी सहजगत्या संवाद साधता यावा यासाठी प्रयत्न केले. आपले पद, प्रतिष्ठा, प्रदीर्घ अनुभव, ज्ञान यांचा बडेजाव न करता संवाद साधतांना कोणालाही दडपण येणार नाही याचीही काळजी घेतली. त्यासाठी हसतमुख राहून प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक प्रश्न, प्रत्येक मत महत्त्वाचे मानून ते शांतपणे ऐकून घेण्याचा नेहमी प्रयत्न केला. यामुळेच हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधणे त्यांना शक्य झाले. त्यांच्या साधेपणामुळे, विनम्र वृत्तीमुळे व प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा मानण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थीही त्यांच्याशी न घाबरता मनमोकळा संवाद साधू शकले. डॉ. कलाम हे या असंख्य विद्यार्थ्यांमधे ध्येयवाद, आत्मविश्वास, देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा रुजवू शकले. त्यांनी आयुष्यभर अत्यंत आवडीने सुरू ठेवलेल्या या संवादपर्वाची सांगताही संवाद साधतांनाच झाली ही भाग्याचीच गोष्ट मानायला हवी.
डॉ. कलामांनी आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष हे आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोगात आणले. या देशातील युवा पिढीच्या प्रबोधनासाठी, बौद्धिक प्रगतीसाठी, विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत ते अत्यंत कृतिशील जीवन जगले. संवादाच्या माध्यमातून आपले कार्य सुरू ठेवले. विद्यार्थ्यांशी फक्त भाषणांव्दारेच नव्हे तर प्रश्नोत्तरे, चर्चा, यांच्याव्दारे संवाद साधण्याचे व देशासमोरील खर्या मूलभूत प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचे त्यांचे कार्य या देशातील हजारो शिक्षक-प्राध्यापकांनी यापुढेही त्याच निष्ठेने सुरू ठेवणे हीच डॉ. कलामांना खरी श्रद्धांजली असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा