आज आपण बहीण-भावाचे नाते पवित्र मानतो. मात्र लक्षावधी वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. किंबहूना त्यावेळी कुटूंबव्यवस्था नुकतीच कुठे उत्क्रांत होऊ लागली होती. अश्यावेळी यमाची बहीण यमी त्याच्यावर मोहित झाली व तिने त्याच्याशी संग करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु यमाने तिला कठोरपणे धिक्कारले व तिला बदलत्या काळाची जाणीव करून देत सांगितले की, इथूनपुढे बहीण-भावांमध्ये विवाहसंबंध होणार नाहीत. पाहायला गेलं तर अतिशय साधीशी घटना, मात्र आज आपणाला या गोष्टीचे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व समजतेय. हे महत्त्व वेदकालीन मंत्रद्रष्ट्या ऋषींनी लक्षावधी वर्षांपूर्वीच ओळखले व ऋग्वेदाच्या १० व्या मंडळातील १० व्या सूक्तात 'यम-यमी संवाद'रुपाने सविस्तर बद्ध करून ठेवले. आणि या शुभकर सामाजिक क्रांतिच्या दिवसाची आठवण म्हणून यमद्वितीया साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. तीच ही भाऊबीज!
सध्या यमाला सर्वत्र वाईट (आणि हल्लीच्या सिनेमांमध्ये विनोदी!) म्हणून का रंगवतात, कोण जाणे! कदाचित माणूस मृत्यूच्या वाटणाऱ्या भीतीला अश्या मार्गाने वाट करून देत असावा. परंतु भारतीय संस्कृतीत यम वाईट नाही. ती तर मृत्यूचे नियमन करणारी अतिशय निरपेक्ष देवता आहे! आणि मृत्यूला आपल्याकडे शाश्वत सत्य, शाश्वत धर्म मानलेय. त्याअर्थी यमराजाला आपली संस्कृती अतीव आदराने धर्मराज मानते. पुराणकालात संस्कृतीचा ऱ्हास सुरू झाल्यानंतर यमाला खलनायक ठरवले जाऊ लागले. प्रत्यक्षात वेदांमध्ये सांगितलेला मूळचा यम हा अतिशय सद्विचारी, सरळमार्गी आहे. तो दिशांचा अधिपती म्हणून 'लोकपाल' (आजच्या राजकीय अर्थाने नव्हे!) आहे, तो यमीला बहीण-भावाच्या नात्याची जाणीव करून देणारा आहे, नचिकेताचे आदरातिथ्य करून त्याला शाश्वत सत्य शिकवणारा आहे, तो कुंतीला धर्मराजाचे वरदान देणारा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो कोणताही भेदभाव - वशिलेबाजी न करता प्रत्येकाला योग्यसमयी मृत्यू आणि तदनंतर कर्मांनुसार मृत्योपरांत जीवनदेखील प्रदान करणारा आहे!
हिंदूंच्या इतर सर्वच देवतांप्रमाणे यमराजही सर्व जगभर पसरलाय. पारशी लोकांच्या अवेस्तामध्ये त्याला 'जमशेद' ('यमश्रेष्ठ' या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश) म्हणतात. ग्रीक त्याला 'हेडस' (संस्कृत 'अदृश्य' शब्दाचा अपभ्रंश) म्हणतात. रोमन त्याला 'मोर्स' (मूळ संस्कृत धातू 'मृ' - मरणे) म्हणतात. जावा संस्कृतीत त्याला 'यमाधिपती' म्हणतात. आणि जपानी लोक त्याला 'यामा' म्हणतात, हे काय 'ड्रॅगनबॉल-झी'च्या चाहत्यांना नव्याने सांगायला हवं?
असा हा यमराज! आज भाऊबीज साजरी करताना आपण या सणाच्या उद्गात्याला विसरू नये एवढ्याचसाठी हा लेखनप्रपंच! सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!
️
आपणा सर्वांना भाऊबीजेच्या मन:पुर्वक शुभेच्छा‼️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा