बुधवार, १० डिसेंबर, २०१४

आज मला उत्तरं हवी आहेत...




त्या दिवशी तू मला भेटायला आलास,
पण येण्यापुर्वीच कळवलंस,
‘आज लाल रंगाचीच साडी नेस मला आवडते.’
मी तुझ्यासाठी... फक्त तुझ्यासाठी,
त्या दिवशी लाल रंगाची साडी नेसले.

नंतर एके दिवशी म्हणालास,
‘कपाळावर एक थेंब गंध टेकवण्यापेक्षा
चंद्रकोर लावत जा.’
मी तुझ्यासाठी कपाळावर चंद्रकोर रेखली.

माझ्या मोकळ्या केसातून हात फिरवत एकदा परखडपणेच म्हणालास,
‘अशा मोकळ्या केसांपेक्षा वेणी जास्त चांगली दिसेल.’
तुझ्या शब्दाखातर मी माझे केस वेणीत वळले.

तुझ्यासाठी मी एवढी बदलले,
स्वतःची जीवनशैली बदलली,
पण एक सांग,
तुझ्या स्वभावातली एकतरी गोष्ट तू माझ्यासाठी बदलू शकशील का?

मी तुला सांगितलं तर,
नको लावूस कपाळावर अष्टगंधाचा टिळा,
सोडून देशील का माझ्यासाठी तुझा खादीचा लळा?
काय होईल मी मांडल्या तर माझ्या मनातील भावना?
पेटून उठशील,
माझ्यावर भडकशील,
कदाचित आठवडाभर अगर महिनाभर तोडून टाकशील माझ्याशी असणारा संपर्क,
नाहीतर अगदी टोकाला जाऊन सांगशील विसर मला.

मला खात्री आहे,
माझे विचार तू जुळवून घेऊच शकत नाहीस.
कारण तुझ्यालेखी स्त्रीला विसरता येतं तिचं स्वतंत्र व्यक्तित्व.
तिच्या अस्तित्वाची जाणीव तिला आणि समाजाला नसली तरी फारसा फरक पडत नाही.
पण जपायला हवी ती आपल्या देशाची खरी ओळख,
इथली पुरुषप्रधान विचारसरणी,
पितृसत्ताक संस्कृती...

इतरांचं राहूच दे,
पण तूदेखील मला आणि माझ्या विचारांना त्याच कसोटीवर तपासून पाहतोस.
तुला मी हवी आहे पण तुला हवी तशीच.
तुझ्या प्रत्येक निर्णयाला खालमानेने संमती देणारी.

अरे पण कसं शक्य आहे ते?

तूच जागृत करतोस माझ्यातल्या जाणिवांचा ज्वालामुखी
आणि तूच नाकारतोस त्यांचा प्रभाव आणि क्षमता
की घाबरतोस त्यांच्या संभाव्य दाहकतेला?

म्हणूनच नव्या नात्याच्या उंबरठ्यावर जरा स्पष्टच विचारते

जी आता आहे ती वादळापूर्वीची शांतता,
पण मीही आहे एक धगधगता विस्तव,
वादळ पदरात बांधायची माझी तयारी आहे,
पण तुझ्या शेल्यात आहे का सामर्थ्य

विस्तव बांधून घेण्याचं? 

थोर प्राच्यविद्यापंडित : श्रीपाद कृष्ण बेलवलकर



श्रीपाद  कृष्ण बेलवलकर
(१० डिसेंबर १८८० - ८ जानेवारी १९६७).

थोर प्राच्यविद्यापंडित असणाऱ्या बेलवलकरांचा जन्म नरसोबाची वाडी ह्या प्रसिद्ध क्षेत्री झाला. प्राथमिक शिक्षण कोल्हापूरजवळील हेर्ले ह्या गावी; माध्यमिक शिक्षण कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरच्या राजाराम महाविद्यालयात व  पुण्याच्या  डेक्कन कॉलेजात १९०२ मध्ये इंग्रजी व संस्कृत हे विषय घेऊन बी. ए. झाले. त्यानंतर डेक्कन कॉलेजात फेलो (१९०२-०४). त्याच काळात शेली व वर्ड्‌स्वर्थ ह्यांच्या काव्यावर लिहीलेल्या निबेधाला मुंबई विद्यापीठाचे `होमजी करसेटची दादी पारितोषिक' मिळाले. (१९०३). नंतर `इंग्रजी-संस्कृत'; `इतिहास-राज्यशास्त्र';`ग्रीक आणि युरोपीय तत्वज्ञान' असे विषय घेऊन त्यांनी एम्‌. ए. ची पदवी तीनवेळा मिभ्वीली. `झाला वेदान्त पारितोषिक' आणि तत्वज्ञानाचे `तेलंग सुवर्णपदक' ही त्यांनी मिळवीले. काही काळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर डंक्कन कॅलेजात क्यूरेटर ह्या पदावर त्यांची नेमणूक झाली. तेथे असतांना त्या कॉलेजच्या संग्रहातील व्याकरणविषयक हस्तलिखितांची पहिली वर्णनात्मक सुची त्यांनी तयार केली; त्यातूनच त्यांचा `सिस्टिम्स ऑफ संस्कृत ग्रामर' हा शोध निबंध सिद्ध झाला व तो मुंबई विद्यापीठाच्या `मुडलिक सुवर्णपदका' स पात्र ठरला. (१९१०, ग्रंथरूपाने प्रकाशित १९१५, दु. आवृ. १९७६). पुढे ते अमेरिकेस गेले आणि तेथील हार्व्हर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर  प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवीली (१९१४). ह्या नाटकाचे इंग्रजी आणि मार्मिक टिपासह मराठी भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले (इंग्रजी १९१५; मराठी १९१५). अमेरिकेहून परतल्शवर (१९१५) एकुण १८ वर्ष ते डेक्कन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. प्रध्यापक म्हणून त्यांनी अत्यंत तळमहीने आपल्या व्यसंगाचा लाभ विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या विद्यार्थ्याम डॉ. रा. ना. दांडेकर ह्याच्यासारख्या प्राच्यविद्यापंडितांचा समावेश होतो. ह्या कालखंडात ते दोन वेळा (१९१७-१८;१९२७-३३) भांडारकर प्राच्यविद्यासंशेधनमंदिराचे मानद सचिव झाले. महाभारताची  चिकीत्सक आवृत्ते तयार करण्याच्या ह्या संस्थेच्या प्रकल्पात त्यांचा प्रथम पासूनच सहभाग होता. १९४३ ते १९६१ ह्या कालखंडात ते ह्या प्रकल्पाचे प्रमुख संपादक होते व त्यांच्याच हातून हाप्रकल्प पुर्ण झाला. भांडारकर प्राच्यविद्यासंशेधनमंदिराची स्थापना, उभारणी व संस्थेला मिळालेले अखिल भारतीय व आंतरराष्ट्रिय कीर्तिचे स्थान ह्यांत बेलवलकरांचा कतृत्वाचा वाटा मोठा आहे.

संशोधनाच्या व लेखनाच्या क्षेत्रात बेलवलकरांनी बजावलेली कामगिरी मोठी आहे. गीता  व अभिज्ञानशाकुंतल  ह्या ग्रंथाची प्रमाणित आवृत्ती त्यांनी काढली (अनुक्रमे १९४१; १९६५); महाभारतातील  भीष्मपर्व व शांतीपर्व ह्यांचे संपादन केले (भीष्मपर्व, १९५७; शांतिपर्व, १९५० ते ५३); दांडीच्या काव्यादर्शाची आवृत्ती काढून (१९२०) त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले (१९२४). भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक इतिहासाची गुरुदेव डॉ.रा. द. रानडे ह्यांच्या सहकार्याने त्यांनी एक योजना आखली व तिच्यातील क्रिएटिव्ह पिरिअड हा वेद, ब्राह्मणे, उपनिषदे ह्यांच्याशी संबंधित असलेला दुसरा खंड लिहिला, संपादिला (१९२७).

त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आणि संशोधनलेखांत माठरवृत्ति (१९२४), कॅनन्स ऑफ टेक्स्च्यूअल अँड हायर क्रिटिसिझम अप्लाइड  टू शाकुंतल (१९२५), वेदान्त फिलॉसफी (१९२९), बसु मलिक लेक्चर्स ऑन वेदान्त  (१९२९) हे ग्रंथ व डेट ऑफ ईश्वरकृष्ण’, ‘लिटररी स्ट्राटा इन ऋग्वेद’, ‘भास अँड शूद्रक’, ‘अंडर-करंट्‌स ऑफ जैनिझम’, ‘पर्यंकविद्याइन कौशितकी उपनिषदह्यांसारखे लेख ह्यांचा समावेश होतो. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि सखोल व्यासंगाचा प्रत्यय त्यांतून येतो.

अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या विविध वर्षी भरलेल्या अधिवेशनात वैदिकविभागाचे (१९२२), ‘वेद आणि अवेस्ताविभागाचे (१९२६) आणि तत्त्वज्ञानविभागाचे (१९३०) ते अध्यक्ष होते. १९४३ मध्ये ह्या परिषदेचे ते प्रमुख अध्यक्ष झाले. रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना लंडन आणि मुंबर्स शाखांचे सन्मान्य सदस्यत्व दिले होते (१९४३). भारताच्या राष्ट्रपतींकडून, १९६० मध्ये त्यांना संस्कृत पंडितम्हणून मानपत्र व आजीव मानधन प्राप्त झाले. पुणे येथे ते निधन पावले.             


सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

रामचंद्रपंत अमात्य

रामचंद्रपंत अमात्य
(सु. १६५० १७१६).


शिवकाळातील एक मुत्सद्दी व राजनीतीवरील आज्ञापत्र   या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता. त्याचा जन्म तत्कालीन सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या जन्ममृत्यूंचे सन व तारखा यांबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.

रामचंद्रपंत हा निळो सोनदेव या अमात्याचा कनिष्ठ पुत्र होय. निळो सोनदेव यांचे उपनाम भादाणेकर. त्यांच्याकडे पूर्वापार देशमुखी वतन होते. १६५७ सालापासून निळोपंत शिवाजी महाराजांच्या सेवेत होते आणि १६६५ च्या सुमारास त्यांना अमात्यपद मिळाले असावे. त्यांच्या मृत्युनंतर १६७२ च्या सुमारास त्यांना अमात्यपद मिळाले असावे. त्यांच्या मृत्युनंतर १६७२ साली महाराजांनी अमात्यपद निळो सोनदेवाचा ज्येष्ठ पुत्र नारोपंत याजकडे सोपविले; परंतु तो अकार्यक्षम असल्याने १६६८ सालापासून सिंधुदुर्गचा सबनीस असलेला त्याचा धाकटा भाऊ रामचंद्रपंतच पहात असे. राज्याभिषेकाच्या वेळी नेमलेल्या अष्टप्रधानांच्या यादीत मात्र नारो निळकंठ आणि रामचंद्र निळकंठ या दोघांचाही अमात्यम्हणून उल्लेख आहे; परंतु प्रत्यक्षात सर्व कारभार राचंद्रपंताकडे होता. १६७७ च्या सुमारास अमात्यपदावरून दूर करून महाराजांनी ते पद रघुनाथ हणमंते यास दिले. पण नंतर ते राजाराम महाराजांच्या काळात परत रामचंद्रपंताकडे आले.

शिवाजींनंतरच्या काळात रामचंद्रपंत आणि छत्रपती संभाजी यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. छ. राजारामाने १६९३ साली परत एकदा रामचंद्रपंताला अमात्यपद दिले. ते त्याने दीर्घकाळ उपभोगिले. राजाराम जेव्हा दक्षिणेतील मराठ्यांचा किल्ला जिंजी येथे आश्रयार्थ गेले, तेव्हा मोगलव्याप्त अशा स्वराज्याच्या मुलूखाचे संरक्षण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या साहाय्याने रामचंद्रपंताने केले. राजारामाने त्यास हुकुमतपन्हाहा किताब दिला होता. मराठी राज्यावर कोसळलेले मोगलाचे अरिष्ट टाळण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्याने बजावली.

शाहूंची सुटका झाल्यानंतर १७०७ मध्ये रामचंद्रपंताने महाराणी ताराबाईंचाच पक्ष उचलून धरला व राजारामांचा पुत्र दुसरा शिवाजी यांस छत्रपती बनविले व पन्हाळगडावर मराठ्यांची दुसरी राजसत्ता निर्माण केली. पुढे ताराबाईंशीदेखील न पटल्याने आणि कदाचित काळाची गरज म्हणून त्याने राजारामांची दुसरी पत्नी राजसबाई हिचा पुत्र दुसरा संभाजी यांस ताराबाई आणि दुसरा शिवाजी यांना पदच्युत करून छत्रपतिपद मिळविण्याच्या कामी सहाय्य केले. त्यावेळच्या राजवाड्यांतील या रक्तहीन सत्तांतरात रामचंद्रपंताचा मोठा वाटा होता, हे पोर्तुगीजांशी झालेल्या त्याच्या पत्रव्यवहारावरून सिद्ध होते. त्याच्या दूरदृष्टीचा आणि मुत्सद्देगिरीचा येथे प्रत्यय येतो.

राजनीतीवरील आज्ञापत्र हा ग्रंथ त्याने छत्रपती संभाजीस उद्देशून १७१५ च्या सुमारास रचला. त्याचा मृत्यु पन्हाळ्यास १७ फेब्रुवारी ते १३ मार्च १७१६ च्या दरम्यात केव्हातरी झाला असावा, असे इतिहासतज्ञ मानतात. तेथे त्याची छत्री आहे.

सभासद बखारीत रामचंद्रपंताविषयी म्हटले आहे -राजियाचा (शिवाजी) लोभ फार की हा मोठा शहाणा, दैवाचा, भाग्यवंत, बापापेक्षा लक्षगुणी थोर होईल.मराठ्यांच्या पाच राजवटी पाहिलेल्या या पुरुषाबद्दल रियासतकार गो. स. सरदेसाई म्हणतात, ‘शिवाजींच्या वेळेपासून राज्याची एकनिष्ठ सेवा केलेला असा हा एकच पुरूष मराठ्यांचे इतिहासात मोठा सन्मान्य दिसतो. त्याच्या राज्यकारभाराचा अनुभव त्याने लिहिलेल्या राजनीतीत ओतलेला आहे.

संदर्भ : १. गर्गे, स. मा. करवीर रियासत, पुणे, १९८०.

    २. बनहट्टी, श्री. ना. शिवाजी राजांची राजनीति, पुणे, १९६१.

प्रतीक्षेत

अश्रूंनी माझा
कुठवर नहावा चेहरा
माझ्या डोळ्यांतली
चमकही पहा कधी
पहा प्रतीक्षेत ते

किती बोलू पाहताहेत....

अबोला

मौनाची भाषा
हवा गुंफीत आहे
न बोलताच ती जणू
सारं काही ऐकत आहे...

शब्दांच्या भाषेला
देईलही कुणी नकार
पण शांत अबोला

जणू आशेचा अनंत संसार...

त्या शहरात जे बकुळीचं झाड आहे...



त्या शहरात जे बकुळीचं झाड आहे
कुठेतरी त्याच्याच आजूबाजूला
राहत असे एक स्त्री
जिच्यावर मी प्रेम करतो
त्या शहरात राहायचे इतरही अनेक लोक
जे वैशाखाच्या या वणव्यात
मला तितकेच आठवतात
जितकं आठवतं ते बकुळीचं झाड ...

पण आता ते शहर कुठे आहे
तुम्ही विचारलंत तर मी सांगू  शकणार नाही
तिथवर घेऊन जातो कोणता रस्ता
मला काहीच आठवत नाही
मी खात्रीने हेही सांगू शकणार नाही
कि ती स्त्री
जिच्यावर मी अजूनही - अजूनही प्रेम करतो
कधी कुठल्या शहरात राहत होती की नाही.
पण हे नक्की आहे
कि मी तिच्यावर प्रेम प्रेम करतो.

मी या दुनियेवर
एका पुरुषाच्या सर्व वासनांसह
यांमुळे प्रेम करतो
कारण मी प्रेम करतो
एका स्त्रीवर...



रविवार, ७ डिसेंबर, २०१४

देव आहे...


सुपरस्टार रजनीकांतने एका भाषणात सांगितलेला किस्सा आहे. रजनी सांगतोएकदा एक प्राध्यापक रेल्वेतून प्रवास करीत होते. सहज समोर पाहिले तर दिसले कीत्यांचा सहप्रवासी काहीतरी पुस्तक वाचतोय. प्राध्यापकांनी विचारले कीकाय वाचताहातत्यावर त्या माणसाने पुस्तक दाखवले! ते होतेबायबल!! प्राध्यापक महाशयांनी त्या वाचकाची खिल्ली उडवलीम्हणाले - "काय तुम्ही आजच्या काळातही धार्मिक पुस्तकं वाचता!! आजच्या विज्ञानयुगात धर्मअध्यात्मईश्वर इ. साऱ्या साऱ्या संकल्पना निरर्थक आहेत! तुम्हाला माहितीये का कीमी किती मोठा प्राध्यापक आहे तेहे माझं कार्ड. कधीतरी माझी अपॉईण्टमेंट घेऊन भेटा मला. बोलूयात! तुमच्या डोक्यातून हे धर्माचं भूत उतरवतो की नाही बघाच! असो. नाव काय म्हणालात तुमचं"?
इतका वेळ शांत असलेल्या त्या माणसाने तितक्याच शांतपणे उत्तर दिले, "माझं नाव थॉमस अल्वा एडिसन"!!
आता चकित होण्याची पाळी आपल्या प्राध्यापक महोदयांची होती! इतका वेळ 'अपॉईण्टमेंट घ्याम्हणणारे ते आता स्वत:च एडिसनकडे अपॉईण्टमेंट मागू लागले. एडिसनने त्यांना भेटीची वेळही दिली.
ठरलेल्या वेळी आपले प्राध्यापक महाशय एडिसनच्या प्रयोगशाळेत पोहोचले. आत एक खूप सुंदर सूर्यमाला ठेवलेली होती. कुठे अणूची रचना दाखवणारा नमूना होता. कुठे काही उपकरणे. कुठे काय तर कुठे काय! प्राध्यापकबुवा तर हरखूनच गेले! भारावून जाऊन त्यांनी एडिसनला विचारले, "किती सुंदर प्रयोगशाळा आहे हो तुमची! खूप कष्ट पडले असतील ना तुम्हाला एक-एक उपकरण जमवतानाकुठून आणि कश्या आणल्या तुम्ही या वस्तू"?
एडिसन म्हणाला, "कुठूनच नाही. एके दिवशी मी इथं आलोदार उघडलंतेव्हा हे सगळं असंच मांडून ठेवलेलं होतं. आहे तश्याच अवस्थेत थेट काम करायला सुरुवात केली"!
प्राध्यापकांना विचित्र वाटले, "काय थट्टा करताय काय साहेब गरिबाचीअसं कधीतरी शक्य आहे का"?
त्यावर एडिसन उत्तरला, "कमाल करताय साहेब तुम्ही! अहो माझी ही एवढीश्शी प्रयोगशाळादेखील कुणीतरी निर्माण केल्याशिवाय निर्माण झालीअसे मानायला तुम्ही तयार नाहीतपरंतु एवढे प्रचंड विश्वकोट्यवधी ग्रह-तारे-दीर्घिका इ. सारे सारे मात्र कुणीतरी निर्माण केल्याशिवायच निर्माण झाले असे म्हणता! अहोसृजन आहे म्हटल्यावर सृजनहारा असणारच की! Whenever there is a creation, there must be a creator"!!

एडिसनचा टोला योग्य जागी बसला. प्राध्यापक महोदयांना आपल्या तर्कपद्धतीतली चूक बरोब्बर कळून आली. आणि त्यांनी ती मान्यही केली. हा किस्सा सांगून झाल्यावर रजनी त्याच्या शैलीदार आवाजात म्हणतो, "कडवूळ इरक्काऽन" - अर्थात, "देव आहे"!!








शनिवार, ६ डिसेंबर, २०१४

सुखी माणूस



आज तो रडला

हा विचार करत कि रडणं

किती हास्यास्पद

तो रडला...

वातावरण चांगलं होतं

ऊन पसरलं होतं

सारं काही ठीकठाक

सारं काही व्यवस्थित

फक्त खिडकी उघडताच

गजांतून दिसलं

जरासं आकाश

आणि तो रडला.

जशी हिंस्र श्वापद रडतात

त्यांच्या गुहेत

तो रडला...


गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

ये


ये
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा
जेव्हा वेळ न मिळेल
तेव्हाही ये

ये
जसं हातांत
नृत्याचं चैतन्य येतं
जसं धमन्यांमध्ये
वहातं रक्त
जशी चुलीमध्ये
हळूहळू वाढत जाते धग
तशी ये...

ये
जसे पावसात
बाभळीला फुटतात
नवे नवे काटे
दिवसांची चीरफाड
आणि वचनांची लक्तरं करत ये...

ये जसा मंगळवार नंतर
येत असतो बुधवार
तशी ये...

लयभंग


जेव्हा सकाळी सकाळी सूर्य पेटवतो
आपल्या भट्टी
आणि माणूस आपली विडी
हे किती विचित्र आहे कि दोघांनाही माहित नाही
कि हा खरंतर बेचैन प्रयत्न आहे
त्या संवादाला पुन्हा सुरु करण्याचा
जो एका संध्याकाळी चालता चालता
युगांपूर्वी कधीतरी भर रस्त्यात
तुटला होता...

हे माझ्या उदास पृथ्वी


घोड्याला हवे असतात हरभरे
भ्रमराला हवे असते फुल
टिटवीला चमकतं पाणी
विंचवाला विष
आणि मला ?
गाईला हवं वासरू
वासराला दूध
दूधाला वाटी
वाटीला चंद्र
आणि मला ?
मुखवट्याला चेहरा
चेहऱ्याला लपण्याची जागा
डोळ्यांना डोळे
हातांना हात
आणि मला ?
हे माझ्या परिवलणाऱ्या
उदास पृथ्वी
मला फक्त तू
तू आणि तूच...

बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

धूळपेरणी


असो, बरकत धूळपेरणीला,
लागला मातीचा जीव झुरणीला.
हिरव्या पिसांचा ध्यास
घरणीला,
टिपूर मोत्यांची आस मोरणीला.
येऊ नये कधी दिवस जाचक,
कासावीस डोळे बनले चातक.
कोरडे नक्षत्र पूर पापणीला,
आलेलं आभूट दूर दाटणीला
मिळता डोळ्यांना मेघुट इशारे,
मातीच्या कणांना फुटते धुमारे.
- अशोक कौतिक कोळी

हिंमत द्या थोडी !


नका नका मला
देऊ नका खाऊ,
वैरी पावसानं
नेला माझा भाऊ.
महापुरामध्ये
घरदार गेलं,
जुल्मी पावसानं
दप्तरही नेलं.
भांडी कुंडी माझी
खेळणी वाहिली,
लाडकी बाहुली
जाताना पाहिली.
हिंमत द्या थोडी
उसळू द्या रक्त,
पैसाबिसा नको
दप्तर द्या फक्त.
- अशोक कौतिक कोळी

या माझ्या अजाण कवितेचा अपमान


या माझ्या अजाण
कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो कां ?
प्रेम हवंय का या कवितेचं ?
मग तें मागून मिळणार आहे
का तुम्हांला ?
खूप कांही द्यावं लागेल
त्यासाठी.
काय काय द्याल ?
आत्म्याची बाग फुलवतां येईल
तुम्हांला ?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा
आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या
थेंबासारखा घ्यावा लागेल ,
पण त्यासाठी तुमचे हात
तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे
लागतील.
कराल?
माझ्या कवितेपासून मीही,
तिच्याजवळ असून ,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श
करतों तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले
रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम
केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद
संधिप्रकाश.
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच
रिकाम्या स्वर्गांत.
स्पर्श
करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध
नाही
एखाद्या बुद्धाच्या
जिवणीवरील उदासीन
हास्यासारखा
या माझ्या अजाण
कवितेच्या वाटेला जाउं नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत
तिच्या स्वत:च्या नागमोडी
स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!
तिच्या नावाचा जप
करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या
कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा
करावा लागेल कमंडलू ;
पसरावें लागेल संज्ञेचें
व्याघ्रचर्म.
आहे तयारी ?
ज्या आपल्या वाटा हुडकीत
आल्या वाटेने ;
तिला पाहायचे डोळे प्रथम
मिळवा,
मगच पाहा तिच्याकडे डोकें वर
उचलून.
ती भोगतेय जें जें
कांही त्यांतल्या तिळमात्रही
वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत.
मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच
कवितेला
एखाद्या पेटलेल्या
दिव्याप्रमाणे दूर ठेवून.

....आरती प्रभू

मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

प्रेम


एक शुभ्र चिमणी
येते आणि निघून जाते
न सोडता संगीताचं एकही चिह्न...

क्षणभरासाठी
या गहिऱ्या अंधारात
पडून जाते फट
जी पाहता पाहता भरून जाते,
पण माझ्या आत्म्यात
पुन्हा पुन्हा तीच प्रतीक्षा घर करून जाते...

एक शुभ्र चिमणी
येते आणि निघून जाते...


तुझे मौन


तुझ्या
तरल ओठांच्या खाली
एक तीळ आहे
जणू ईश्वराने एखादा
खिळा ठोकला असावा,
जो तुझ्या
प्रत्येक मौनाला

अलौकिक बनवतो.

समर्पण


गवताच्या पात्यासमोर
मी नतमस्तक झालो
आणि मला जाणवलं

मी आकाशाला स्पर्श करतोय....

नदीसाठी २


या एकांतात
कपडे उतरवून
उडी घेईन मी
तुझ्या लहरणाऱ्या पाण्यात.
निर्मळ देह
आणखी निर्मळ होऊन जाईल.
मग आपण दोघे

एकमेकांना सोडून निघून जाऊ.

नदीसाठी १


जेवढे जळ
ओंजळीत उचलु शकतो तुझ्यापासून
माझ्यासाठी तू तितकीच आहेस.
त्यातूनच भागवतो मी माझी तहान
त्यातूनच आपल्या आत उगवणाऱ्या सूर्याला
अर्घ्य अर्पण करतो.
आणि प्रत्येक वेळी रिती ओंजळ
डोळ्यांना आणि मस्तकाला लावून
अनुभव करतो
मी तुला
माझ्या आत

वाहताना पाहतो..

सोमवार, १ डिसेंबर, २०१४

योगायोगाने

मी एके दिवशी रस्त्यावर
एका माणसाला पाहिलं
आणि मला वाटलं, मी याला ओळखतो.

‘चूक’ – माझं मन म्हणालं.
‘तू याला माही ओळखत.’

ओळखतो – मी म्हणालो
हा तोच माणूस आहे
जो मला ट्रेनमध्ये भेटला होता.

‘एकदम चूक’ – माझं मन पुन्हा म्हणालं
‘हा तो नाहीये.’

आहे
नाही आहे –
मी खुप वेळ विचार करत राहिलो
तेवढ्यात मी पाहिलं
त्याच्या उन्हाने भरलेल्या चेहऱ्यावर तो चिकट द्रव
जो माणसाला वृक्षांपासून विलग करतो.

तोच – तोच –
हा तोच माणूस आहे –
मी स्वतःला सांगितलं
आणि अनेक दिवसांनतर
मला एवढा आनंद झाला
ज्याबाबत पुस्तकात
मी कुठेच काही वाचलेले नाही....




नव्या दिवसासोबत

नव्या दिवसासोबत
एक कोरं पान उघडलं
आपल्या प्रेमाचं

सकाळी,
यावर कुठेतरी आपलं नाव तरी लिहून जा...

अनेक अपशकुनी पानांमध्ये
यालाही कुठेतरी ठेवून देईन
आणि जेव्हा जेव्हा वारा येऊन
उडवेल अचानक बंद पानांना
कुठेतरी आत
मोरपिसाप्रमाणे ठेवलेलं ते नाव

वाचेन प्रत्येकवेळी.

खोलीतला दानव



घाबरत नाही
पण जेव्हा त्याला पाहतो
पाहवत नाही...

आजही उभा आहे तो
माझ्या दाराशी माझी वाट पाहत
मोठ्या मोठ्या पंखांचा खोलीतला दानव

फुलं कधी उमलतात
सण कधी येतात
अचानक वातावरण केव्हा बदलतं
त्याला सर्व माहित आहे.

म्हणून कधी काही विचारत नाही
जेव्हा मी बाहेरून येतो
गुपचूप आपले क्षत-विक्षत पंख उचलून
मला जागा देतो.

जणू तो सांगतो :
‘आता खूप थकलायस तू,
वीर योद्ध्या विश्राम कर.’

संध्याकाळच्या धुंदीत
उठणारे माझे हात
बांधले जातात.
कधी कधी त्याच्या खोल निळ्या डोळ्यांतून
करुणा बरसते
आणि मला वाटतं
याच्याशी काय लढायचं?

आणि कधी असंही होतं
परतताना वाटेत
निश्चय करतो
आज जाऊन त्याला आव्हान देईन
लढेन
पराभूत करेन
त्याचे काळे काळे पंख छाटून टाकेन

पण जेव्हा परततो
त्याला पाहतो त्याचप्रकारे
माझी वाट पाहत दारात उभा तो
खोलीतला दानव
अनिमिष, उदास.
माझ्या हातातून निसटतो संकल्प
घाबरत नाही
पण जेव्हा त्याला पाहतो
गुपचूप, अनिमिष, उदास

पाहवत नाही...