शनिवार, ७ एप्रिल, २०१८

मिसिंग : स्त्रियांनी मांडलेला स्त्रियांचा संघर्ष






मातृत्व ही जगातील सर्वात श्रेष्ठ भावना आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आई कोणत्याही थराला जाते. कितीही मोठं संकट असलं तरी त्यावर मात करण्याची शक्ती स्त्रीकडे येते ती या मातृत्त्वामुळे. मात्र या आईपणासोबतच तिचं बाईपण एका थरारपटातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे ली ओन ही या दक्षिण कोरियन दिग्दर्शिकेने. एका स्त्रीने स्त्रियांना केंद्रीभूत करून निर्माण केलेला हा चित्रपट एकीकडे अपहरण झालेल्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेणाऱ्या आईचा संघर्ष तर दाखवतोच मात्र त्यासोबतच पूर्व आशियातील स्त्रियांच्या आयुष्याचे विदारक वास्तवही मांडतो. त्यामुळेच या थरारपटाने वेगळी उंची गाठलेली दिसून येते.
चित्रपटाची सुरुवात आपल्या वरिष्ठांची बोलणी खाणाऱ्या जी सूनच्या प्रवेशाने होते. पतीपासून घटस्फोट घेऊन स्वतंत्र राहणारी, एका वृत्तवाहिनीत काम करणारी आणि आपल्या दीड वर्षाच्या मुलीच्या – दा ऊनच्या कस्टडीसाठी कोर्टात खेटा घालणारी जी सून आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नाही. तिची देखभाल करण्यासाठी घरात बाई ठेवते. पदरमोड करून घरखर्च आणि वकिलाची फी भागवते. मात्र या संघर्षातलं तिचं एकाकीपण आपल्याला अस्वस्थ करतं. घटस्फोट झाल्यानंतरही दा ऊनला मिळविण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या सासूकडून आणि पतीकडून मानसिक त्रासाला बळी पडणाऱ्या जी सूनला कामाच्या ठिकाणीही वरिष्ठांकडून वाईट वागणूक मिळते. फोनवरच्या एका संवादात तिचा बॉस म्हणतो, जगात कुणीच आपल्या ऑफिसात मुलं असणाऱ्या बायकांना कामावर ठेवू नये. यांना आम्ही कामाचा पगार द्यायचा आणि कामाचे तास वाचवून यांनी आपली मुलं सांभाळायची. इतकेच नव्हे तर घरी परतत असताना बिल्डींगचा वॉचमनसुद्धा मुलांना वेळ न देऊ शकणाऱ्या स्त्रिया आई होण्याचा निर्णयच का घेतात असा टोमणा मारतो. हे संवाद पुरुषांचा काम करणाऱ्या स्त्रियांच्याबाबत असणारा दृष्टीकोन समोर आणतात. यावेळी जी सूनच्या चेहऱ्यावरची वेदना आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. रात्री उशीरा घरी परतलेल्या आपल्या आईकडे रांगत येणारी दा ऊन, तिच्या डोळ्यातील भाव फारच बोलके आहेत. आपल्या लाडक्या लेकीला उचलून घ्यावं, दिवसभराचं प्रेम द्यावं अशी मनात इच्छा असूनसुद्धा कामाच्या परिहार्यतेमुळे जी सूनला हे शक्य होत नाही. पतीपासून स्वतंत्र राहणाऱ्या स्त्रीचं आयुष्य किती खडतर असतं याचं हे चित्र अवघ्या १० मिनिटात आपल्या नजरेसमोरून सरकतं आणि मग आपण चित्रपटाच्या मुख्य विषयाकडे वळतो.
जी सूनने ठेवलेल्या चिनी बाईच्या बेजबाबदारपणामुळे दा ऊनला दुखापत होते. जी सून तिला कामावरून काढून टाकते. मग नव्या बाईचा शोध सुरु होतो. जी सूनची निकड लक्षात घेऊन एक ओळखीची बाई आपल्या एका तथाकथित भाचीला घेऊन येते. जी सूनला कोरियन भाषा आणि लिपी न येणाऱ्या आणि चेहऱ्यावरूनच चिनी वाटणाऱ्या या नव्या मुलीचा - हान मीचा संशय येतो. ती याबाबत विचारणा करते. तिची ओळखपत्रे मागते. मात्र तिने सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याने आणि तिच्याजवळ गेल्यानंतर दा ऊन रडायची थांबल्याने जी सून तिला कामावर ठेवते. सारं काही व्यवस्थित चाललं असतं. मात्र अचानक जी सूनला कौटुंबिक न्यायालयातून फोन येतो. दा ऊनच्या कस्टडीसंदर्भात कोर्टात तारीख असते. मात्र घरी आलेली नोटीस जी सूनला माहितच नसते. हान मीला कोरियन लिपी माहित नसल्याचा फटका जी सूनला बसतो. न्यायालयात पोहोचायला तिला उशीर होतो. त्यातून काम करणारी स्त्री मुलांना वेळ देऊ शकत नाही, त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकत नाही, शिवाय घटस्फोटीत स्त्री मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम असू शकत नाही असा अभिप्राय नोंदवत न्यायालय दा ऊनची कस्टडी तिच्या वडिलांना आणि आजीला देते. समाजाचा स्त्रीकडे, तिच्या कर्तृत्वाकडे पाहण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन पाहून आपली बाजू मांडण्याचा नायिकेचा केविलवाणा प्रयत्न आपल्याला व्यथित करतो.
जड अंतःकरणाने जी सून घरी परतते. मात्र हान मी आणि दा ऊन दोघीही घरात नसतात. यानंतर दा ऊनचा शोध सुरु होतो. आजूबाजूचा सारा परिसर शोधून झाल्यावर कदाचित आपली सासूच आपल्या मुलीला घेऊन गेली नसेल ना या विचाराने ती आपल्या पतीला फोन करते, मात्र तिचा पती मुलीची कस्टडी द्यायची नाही म्हणून तूच केलेला हा बनाव आहे, मुलीला आमच्या ताब्यात दे अन्यथा तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ अशी धमकी देतो. अखेर आपणच आपल्या मुलीचा शोध घ्यायचा असा निश्चय जी सून करते. जी स्त्री हान मीला घेऊन आली होती तिच्याकडे पहिली विचारणा होते. मात्र काम मिळवून देण्यासाठी हान मीने आपल्याला पैसे दिले होते. याव्यतिरिक्त आपल्याला काही माहित नाही असे सांगून ती बाई हात वर करते. अखेर हान मीला उधार पैसे देणाऱ्या एका माणसाच्या साथीने सुरु झालेला हा शोध जी सूनला चक्क एका कुंटणखान्यात घेऊन जातो. आपल्या घरात कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे राहणारी हान मी कामाचे तास संपल्यानंतर एका वेश्येचं जीवन जगत असल्याचे कळल्यावर जी सूनला धक्का बसतो. तिचं सामान तपासल्यावर तिचं नाव हान मी नसून किम योन आहे, तिने दिलेली सगळी कागदपत्रे खोटी आहेत, आणि ती चीनमधून अवैधरीत्या कोरियात आल्याचा खुलासा होतो. आता या किम योनला कसं आणि कुठे शोधायचं हा प्रश्न उभा राहतो. यावेळी कुंटणखाना चालवणारी बाई जी सूनला म्हणते, तू एकटी बाई आहेस आणि तुला मुलगी आहे, यापेक्षा वाईट काय असू शकतं? या प्रश्नाने काळजाला घरं पडलेली जी सून तिथून बाहेर पडते. एका अनामिक नंबरवरून आलेल्या फोनवरून तिच्याकडे ३३० लाख वोन (सुमारे २० लाख रुपये) खंडणी मागण्यात येते. आपल्या खात्यात असणारे ५४ लाख वोन (सुमारे सव्वातीन लाख रुपये) ती तत्काळ दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर करते.
उरलेले पैसे जमवण्यासाठी तिची खटपट सुरु असतानाचा पोलीस तिला अटक करतात. तिच्या सासूने तिच्याविरोधात दा उनला जाणीवपूर्वक लपवल्याची तक्रार नोंदवलेली असते. पोलीस स्टेशनमध्येही खरी परिस्थिती जाणून न घेता जी सूनवर आरोप होतात, सासूकडून मारहाण होते. ती किती वाईट पत्नी, वाईट आई आणि वाईट सून आहे हे तिची सासू प्रत्येक पोलिसाला सांगत असते. या गोंधळाचा फायदा घेत जी सून तिथून निसटते. थेट चीन गाठते आणि इथून पूर्व आशियातील स्त्रियांचे एक वेगळे विश्व आपल्या समोर येते.
किम योनच्या घराचा शोध लागल्यावर तिच्या शेजाऱ्यांकडून तिचं आणि एकंदरच तिथल्या स्त्रियांचं जीवन उलगडत जातं. मूल नाही म्हणून घरच्या माणसांकडून होणारा शारीरिक, मानसिक छळ, पतीची मारहाण, केस कापून केलं जाणारं स्त्रियांचं विद्रुपीकरण, परभाषिक स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, त्यांना नाकारला जाणारा शिक्षणाचा हक्क आदी अनेक बाबी पहायला मिळतात. मात्र हे विदारक वास्तव मूळ कथानकात इतकं बेमालूम मिसळलं आहे की कुठेही हे प्रसंग प्रचारकी होताना दिसत नाहीत. पुढे किम योनने मुलीला जन्म देणं, तिच्या मुलीला किडनीचा आजार असणं आणि त्यावर उपचार करण्यास कुटुंबाने नकार देणं हा सगळा प्रकार जी सूनला कळतो. मुलीच्या आजारावर उपचार कशाला? मुलगा असता तर गोष्ट वेगळी होती. हे किम योनच्या सासूचं वाक्य परिस्थितीची विदारकता वाढवतं. किम योन अद्याप कोरीयातच असल्याची खात्री पटल्यावर जी सून मायदेशी परतते.
इथे कोरियात जी सून आणि दा ऊनचा शोध सुरु असतो. जी सूनने ज्याला पैसे पाठवले, त्या पार्क ह्यून इकला पोलीस ताब्यात घेतात आणि एक नवाच खुलासा होतो. दक्षिण कोरिया हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करणारा आशियातला सगळ्यात मोठा देश आहे. इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील म्हणून चीन, उत्तर कोरिया, जोएसन (उत्तर कोरिया, चीन आणि रशिया या देशांच्या सीमा जिथे एकमेकांना मिळतात असा स्वयंशासित भूभाग) येथून अनेक नागरिक अवैधरीत्या दाखल होतात. मात्र त्याचं पुढे काय होतं याचं निश्चित उत्तर देता येणार नाही. आपल्या मुलीवर उपचार व्हावेत म्हणून किम योन घरातून पळून अवैधरीत्या दक्षिण कोरियात येते. आपल्या मुलीला – जे इनला हॉस्पिटलमध्ये दाखल करते. कोरियन भाषा आणि लिपी माहित नसल्याने पैसे कमावण्यासाठी अखेर कुंटणखान्याचा आश्रय घेते. मुलीच्या उपचाराचा खर्च त्यातून भागणार नसतो, म्हणून आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे उधार घेते. पार्क ह्यून इक हाही त्यांपैकीच एक असतो. निर्वासितांना फसवून आपला खिसा गरम करणारा ह्यून इन किम योनला झटपट पैसे कमावण्याचा मार्ग दाखवतो. ह्यून इनच्या सांगण्यावरून किम योन स्वतःची किडनी विकायला तयार होते. मात्र ह्यून इन तिची किडनी तर घेतोच मात्र तिला पैसे न देताच परागंदा होतो. हॉस्पिटलचं बिल न भरल्याने अत्यवस्थ जे इनला डिस्चार्ज दिला जातो. त्यातच किम योनच्या मुलीचा- जे इनचा मृत्यू होतो.
आतापर्यंत किम योन समोर आली की मी तिचा जीव घेईन असं म्हणणाऱ्या जी सूनच्या मनात आता तिच्याबद्दल कणव जाणवायला लागते. पार्क ह्यून इक तिला जे इन दाखल असलेल्या हॉस्पिटलचा पत्ता देतो. इथे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. कारण पैशाअभावी जे इनवर उपचार करण्यास नकार देणारा आणि पर्यायाने तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा डॉक्टर अन्य कुणी नाही तर दा ऊनचा पिता आणि जी सूनचा पती असतो. आता दा ऊनच्या अपहरणामागचं कारण स्पष्ट होऊ लागतं. जी सूनच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातं. दा ऊनला पहिली दुखापत चिनी बाईच्या बेजबाबदारपणामुळे झालेली नसते तर किम योनने ती जाणीवपूर्वक घडवून आणल्याचं समोर येतं. अखेर पुढील सुगावा शोधण्यासाठी पोलीस जी सूनच्या घरी पोहोचतात. दरम्यान जी सूनच्या घरातच डायनिंग टेबलमध्ये लपवलेल्या एका कुलिंग बॉक्समध्ये एका दीड वर्षीय मुलीचा मृतदेह सापडतो. हा मृतदेह कुणाचा असतो? जी सूनचं पुढे काय होतं? किम योन सापडते का? हे प्रत्यक्षच पाहायला हवं.
अनेक घटनाप्रसंगांची गर्दी असणारा हा चित्रपट केवळ दीड तासाचा आहे. त्यामुळे चित्रपटाचं कथानक वेगाने पुढे सरकतं. दिग्दर्शिकेचा प्रेक्षकांवर आणि त्यांच्या आस्वादक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ती कोणत्याची घटनांची तपशिलात वर्णनं आणि स्पष्टीकरणं देण्याचा हव्यास धरत नाही. मात्र तिला जे सांगायचं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत निश्चितच पोहोचतं. हा चित्रपट नायिकाप्रधान आहे, आणि लौकिकार्थाने येथे नायिकाच प्रधान आहे. अन्य पुरुष पात्र ही ठराविक प्रसंगी अवतरतात. त्यांना सोपवलेल्या भूमिका मात्र योग्य रीतीने वठवतात. हा चित्रपट समाजातून स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्यासोबत होणारं दुर्वर्तन, शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्यावर ओढवणाऱ्या आपत्ती, पुरुषप्रधान व्यवस्थेने निर्माण केलेल्या समस्या यांवर भाष्य तर करतोच, मात्र हा चित्रपट आशियाई देशातील दारिद्य्र, रोजगाराचे प्रश्न, अवैधरीत्या अन्य देशांमध्ये होणारी घुसखोरी, भांडवलशाही धोरणांमुळे झालेल्या माणुसकीचा ऱ्हास आदी बाबीही अधोरेखित करतो.
घट्ट बांधलेलं कथानक, अचूक दिग्दर्शन, उत्कृष्ठ पार्श्वसंगीत आणि कायम जाणवणारा ताण या चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील. मात्र कथानकाचा प्रचंड वेग पाहता काही प्रसंग समजून घेण्यासाठी ते पुन्हा पुन्हा पाहावे लागतात. 'मास्टर' या क्राईम थ्रिलरमध्ये ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या उह्म जी वोनने निभावलेली ली जी सून, सामाजिक मानसिकतेशी असणारा तिचा संघर्ष, तिचा कणखरपणा, तिचं धाडस, स्वतंत्र निर्णयक्षमता आणि अवघड परिस्थितीत तिने दाखवलेला संयम आपल्या लक्षात राहतो. 'सिंगल रायडर' या चित्रपटातून स्त्रीमनाचे विविध कंगोरे समर्थपणे मांडणाऱ्या गोंग ह्यो जीन हिने निभावलेली हान मी / किम योन आपल्याही मनात एकाच वेळी राग आणि करुणा निर्माण करते. खरं सांगायचं झालं तर भारत काय किंवा पूर्व आशिया काय, चित्रपटसृष्टीवर कायम पुरुषांचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र होंग उन मी या लेखिकेने लिहिलेला, ली ओन हीने दिग्दर्शित केलेला, उह्म जी वोन आणि गोंग ह्यो जीन या अभिनेत्रींनी भूमिका साकारलेला हा चित्रपट खऱ्या अर्थाने वेगळा आहे. या स्त्रियाच या चित्रपटाच्या केंद्रबिंदू आहेत. स्त्रियांनी स्त्रियांना समोर ठेवून तयार केलेला हा चित्रपट दक्षिण कोरियात तर नावाजला गेलाच मात्र यातील वास्तवतावादी चित्रण आणि थरार याची भुरळ अन्य आशियाई देशांनाही पडली आहे. म्हणूनच हा चित्रपट जपान, सिंगापूर, ब्रुनैल, कंबोडिया, लाओस, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, नेपाळ, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि श्रीलंका आदी अन्य १३ देशातही प्रदर्शित झाला. या देशांमध्येही प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरले. हा थरार जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर हा चित्रपट जरूर पहा. चित्रपटाची भाषा कोरियन असली तरी इंग्रजी सबटायटलच्या आधारे तुम्ही याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा