गुरुवार, २१ मे, २०१५

आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर


कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेले व आडिवरे गावचे भूषण असेलेले श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापुरपासून २८ किमी अंतरावर आहे. महाकाली देवस्थान हे राजापुर तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ  म्हणून प्रसिद्ध होत आहे.
आडीवरे या गावात श्री महाकाली यांचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या पुजार्यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला "मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर". त्याप्रमाणे दुसर्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची
स्थापना केली.

मंदीरात महाकालीसमोर उत्तरेस श्री महासरस्वती तर उजव्या बाजुस श्री महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजुला योगेश्वरी, प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे. देवीचे दर्शनघेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच श्री महाकालीचे मंदिरहि कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून श्री महाकालीची मूर्ती हि अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडतात. दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी देवीला विभुषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा या जागृत देवस्थानाला व नितांत सुंदर परिसराला एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटन व तीर्थटन या दोन्हीचा लाभ घ्या.

कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर -
रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे ( २८ किमी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा