रविवार, १७ मे, २०१५

भारताच्या मान्सूनवर एल निनोचे सावट

         पाणीटंचाईने पोळलेल्या आणि कडक उन्हाने होरपळलेल्या साऱ्यांनाच मान्सून वेळेआधीच दाखल होणार या बातमीने दिलासा दिला होता मात्र यंदाच्या मान्सूनवर लटकणारी एल निनोची तलवार कायम असून वेळेआधी येणारा मान्सून समाधानकारक बरसणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. 

         भारताच्या हवामानशास्त्र विभागाने मान्सून १ जूनलाच केरळमध्ये दाखल होत असल्याचे जाहीर केले असले तरी एल निनो प्रवाहांचा धोकाही वर्तवला आहे. एल निनो हे प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह असून महासागराच्या पृष्ठभागाखालील तापमानाच्या वाढीमुळे त्यांची निर्मिती होत असते. या एल निनो प्रवाहांचा प्रभाव भारतातील मान्सूनवर प्रामुख्याने जाणवतो. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार एल निनो सध्या विकासात्मक प्रक्रियेत असून येत्या महिन्यात तो मजबूत होण्याची चिन्हे आहेत. आजवर उद्भवलेल्या एल निनोमुळे भारतातील मान्सूनवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येते. एल निनोमुळे मान्सूनच्या सरसरीत घट होऊन अवर्षणाचा धोका निर्माण होऊ शकतो.

          शास्त्रज्ञांच्या मते एल निनोच्या निर्मितीचा ठराविक काळ सांगता येणे शक्य नाही. मात्र दर २ ते ७ वर्षांनी तो निर्माण होतो. त्याचा परिणाम महासागरांच्या जवळ असणाऱ्या देशांच्या पर्जन्यवृष्टीवर पडतो. २००९ हे एल निनोचे वर्ष होते. त्यावर्षी भारतात तब्बल २२ टक्के कमी पाऊस पडला. ज्यामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. त्यापूर्वीही एल निनोच्या प्रभावामुळे १९७२ साली २४ टक्के, १९८७ साली १३ टक्के, २००२ साली १९.२ टक्के कमी पाऊस पडल्याचे दिसून येते. राज्यातील ८० टक्के शेतीचे भवितव्य हे जून ते ऑक्टोबर दरम्यान पडणार्या पावसावर अवलंबून असते. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे या काळातील पावसाची सरासरी केवळ ९३ टक्केच राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र खात्याने वर्तवला आहे. तसेच जून आणि जुलै महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भाताचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भाताच्या रोपवाटिका २ किंवा ३ टप्प्यात लावाव्यात, किंवा वेळ पडल्यास भाताची रोपे दापोग पद्धतीने तयार करावीत. काही भागात दुबार पेरणीची गरज पडल्यास अधिक बियाणाची तरतूद करावी अशा सूचना देण्यात आल्या अहेत. एल निनोमुळे भूगर्भीय जलाची पातळी खालावण्याची शक्यता अहे. त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई जाणवू शकते. तर वैश्विक उष्मावृद्धीमुळे  हिमनग वितळू लागल्यास समुद्राची पातळी वाढून किनारपट्टयाही धोक्यात येऊ शकतात. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे तर स्कायमेट या खाजगी हवामानशास्त्र कंपनीने मात्र एल निनोच्या घडामोडी या सूक्ष्म स्वरूपाच्या असून त्याचे दूरगामी परिणाम भारताच्या नैऋत्य मान्सूनवर होणार नसल्याचे सांगितले आहे त्याचप्रमाणे यावर्षी १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटचे उपाध्यक्ष जी पी शर्मा यांनी व्यक्त केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा