शनिवार, ३ जानेवारी, २०१५

I want to be MORE THAN a good girl.

आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हाच दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. खरंच त्या काळाचा विचार करता सावित्रीबाईंनी केलेले कार्य, त्यात येणाऱ्या संकटांवर धैर्याने केलेली मात आणि जोतीरावांना दिलेली साथ सारं काही अतुलनीयच म्हणावं लागेल. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करताना दिसतात, शिक्षण क्षेत्रात मुलींनीच बाजी मारल्याचं दिसतं याचं सारं श्रेय या आद्यक्रांतिकारी स्त्रीलाच जातं.

मात्र तरीही आज खऱ्या अर्थाने स्त्रीला तिच्या अस्तित्वाचं, व्यक्तित्वाचं पुरेपूर भान आलंय असं म्हणावयाचे धाडस होत नाही. आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणवून घेणाऱ्या सुशिक्षित तरुणी आपल्याच लग्नात हुंडा द्यायला तयार होतात. मनाविरुद्ध लादल्या जाणाऱ्या निर्णयांना खालमानेने स्वीकारतात. मी आजूबाजूला अशा अनेक घटना पाहते अशावेळी वाटतं आम्ही कुणाचा वारसा सांगतो याचं तरी भान आपण ठेवलं पाहिजे.

कदाचित Mind is not problem but Mindset is a problem. जे बालपणापासून मनावर बिंबवलं जातं तेच पुढे कृतीतून व्यक्त होत जातं. लहानपणापासून मुलींना हेच समजावलं जातं कि अभ्यासात भले कितीही हुशार असाल पण घरातली कामं आलीच पाहिजेत. आणि ते शिकवलं जातंही. इतकंच नव्हे मुली शिकतातही हळूहळू. जणू तिचं त्यांची ओळख आणि तेच त्याचं भविष्य. फार दूरच नाही तर माझंच उदाहरण देईन. मी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, काव्यलेखन, कथालेखन, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रात लीलया रमते. अपेक्षेप्रमाणे यशही मिळतं. मात्र माझी आई इतरांजवळ माझ्याविषयी बोलताना अभिमानाने सांगते, “आमची सायली शिवणकाम छान करते, तिचे ड्रेस ती स्वतः शिवते, तिला जरदोसीचं कामसुद्धा येतं. ती रांगोळ्या छान काढते. जेवण कधीतरी करते पण जेव्हा करते तेव्हा खूप छान करते, हाताला काय चव आहे पोरीच्या.” मला वादविवादात राष्ट्रीय स्तरावरचं बक्षीस मिळाल्याचं तिने कुणाला सांगितल्याचे मला आठवूनही आठवत नाही.

अशावेळी मला प्रश्नच पडतो एवढं शिकून सुद्धा माझी ओळख घरकामातल्या नैपुण्यानेच का करून दिली आहे. मला घरकाम येतं कारण ते लहानपणापासून शिकवलं गेलं. कारण आई म्हणते ते माझं न टाळता येणारं भविष्य आहे. पण हे सारं मुलांना का लागू पडत नाही? आज अनेक मुलांना नोकरी करणारी पत्नी हवी असते. त्यात काहीच गैर नाही. पण पत्नी नोकरी करते म्हणून कुणी पती पूर्णवेळ घरकाम करायला तयार होईल का? हे प्रश्न कालही अनुत्तरीत होते आणि आजही अनुत्तरीतच आहेत. कदाचित येणारा काळ उत्तर घेऊन येईलही.

प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका सिमोन दि ब्रूव्हा म्हणते कि बाई ही बाई म्हणून जन्माला येत नाही तर ती बाई म्हणून घडवली जाते. तूर्तास आजच्या या बालिका दिनी इतकंच सांगावसं वाटतं कि मुलींना मुलींसारखं जगू द्या. तिला बाई बनण्याचं training देऊ नका. I am a good girl but teach me MORE THAN  a good girl.




ध्वनिचित्रफीत Ban Entertainment कडून साभार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा