सोमवार, ३० जून, २०१४

घाव

मनावरही असतात काही घाव
काही वरवर काही खोलवर 
काही भरलेले काही भरत आलेले...
हळूहळू हे घाव भरूनही येतात 
त्यातल्या वेदनेची संवेदनाही मरून जाते
पण त्याचे व्रण मात्र तसेच राहतात...
हे व्रणही मग फिके होत जातात,
घावाची कथा व्रणावर आणि
व्रणाची कथा विस्मरणावर थांबते...
घावाची ही कथा विसरता येते
पण घाव देणारी व्यक्ती मात्र 
मनाच्या कोपऱ्यात अमर होते.... 

एका अज्ञात मृत्युच्या छायेत

रोजच रोषणाईत न्हाउन निघणारी मुंबई,
जिथे प्रत्येकजण येतो डोळ्यात एक स्वप्न घेऊन,
अशी ही स्वप्ननगरी...
पण इथला प्रत्येकजण जगत असतो
एका अज्ञात मृत्युच्या छायेत!
कामधंद्यासाठी घराबाहेर पडलेला माणूस
सामील होतो लोकलच्या गर्दीत
स्वतःचं क्षुद्र अस्तित्त्व जपत...
फक्त काही मिनिटांचा प्रवास,
त्या काही मिनिटांतला तो प्रचंड तणाव,
मधेच प्रवासात स्फोट होईल,
मृत्यू अचानक झडप घालेल,
बेसावध सावजाचा सावधपणे फडशा पडेल,
कसलीच शाश्वती नाही...
स्फोटानंतर झालेला तो रक्तामांसाचा चिखल
पोटाची खळगी भरण्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या
सामान्य माणसाच्या शरीराची लोंबणारी लक्तरं
हे सारे पाहताना माणुसकी रडते घाय मोकलून
पण तिचा तो करून आक्रोश कुणालाही ऐकू जात नाही...
तेव्हा बधीर होऊन जातात सार्यांचेच कान
ती भयाण भयानकता पाहून...
पण तरीही येणार्यांचा लोंढा कमी होत नाही,
येणारे येतच राहतात,
पापण्यातली असंख्य स्वप्न उराशी बाळगून,
आणि जगत राहतात,
इथल्या त्या एका अज्ञात मृत्युच्या छायेत.....

शनिवार, २८ जून, २०१४

श्रावणसर

एक श्रावणाची सर
मृदगंधाचे अत्तर
त्या गंधाचा दरवळ
मुग्ध मनाचे अंतर...
अशी श्रावणाची सर
सृजनाचा आविष्कार
पृथ्वी प्रसवते पुन्हा
नव्या सृष्टीचा अंकुर...
अशी श्रावणाची सर
जणू अवनीचा शृंगार
हरीतवसना वधूला
शुभ्र नीर अलंकार...
अशी श्रावणाची सर
नित्य नवा अनुभव
गहिवरल्या मनात
भावनांची देवघेव...
अशी श्रावणाची सर
येई माझ्या दारावर
तुझी आठव देऊन
पसरे माझ्या मनभर...

गुरुवार, २६ जून, २०१४

आर्जव


कवडीमोल आहे मी खंत याची करू नकोस

आयुष्याच्या वळणावरती वाट माझी पाहू नकोस...

मी आहे स्वच्छंदी, मी आहे मोकळ्या मनाची

चिंता कसलीच नाही मला ना आजची ना उद्याची

म्हणून तर या नदीला बांध कधी घालू नकोस,

आयुष्याच्या वळणावरती वाट माझी पाहू नकोस...

खळाळता निर्झर मी, मी आहे शांत सागर

ऋतुचक्र फिरूनही तोच ओसाड वावर

सवय आहे याची मला तू पाऊस बनून येऊ नकोस,

आयुष्याच्या वळणावरती वाट माझी पाहू नकोस...

जीवनसागरी उठल्या न जाणो किती उंच लाटा

साऱ्यांसाठी बंद केल्या मीच माझ्या मनाच्या वाटा

ऐकू येणार नाही मला तू साद पुन्हा घालू नकोस,

आयुष्याच्या वळणावरती वाट माझी पाहू नकोस...

तुझी साद ऐसी



तुझी साद ऐसी पडे आज कानी,
तुझे तेच येणे मनाच्या महाली,
तुझी तिच याद उरे चित्तात ऐसी
तुझी प्रितवेडी तुझी राधिका मी...

उरे एक उणे माझ्या जीवनात,
तुझा हात नाही माझ्या हातात,
तुझ्या ओठी नाही नाव माझे अजुनी
तुझ्या नाही सख्या मी अजुनी मनात...

तुझी साथ ऐसी भावनांची गुंफण,
तुझ्या सोबती क्षण जणू साठवण,
तुझा तू स्वतंत्र मी शापित मात्र
परि तूच तू माझ्या मनी आठवण...

पाऊस आठवणीतला


निरभ्र आकाश
आले मेघांनी भरून,
त्यात माझे मन
गेले नकळत गुंतून
बरसती ते मेघ
झाले काळजाचे पाणी,
पुन्हा ओठात रुतली
तीच अंतरीची गाणी

आतल्या आत न जाणो
काहीबाही धुमसते,
रुक्ष नजर फिरता
जग भकास भासते

आसपास नाही कुणी
कुणा शोधती लोचने,
कुणी ऐकणारे नाही
परि साद घातली मनाने...

मनी साचून राहिल्या
त्याच पावसाच्या सरी,
अडले पाऊल माझे
फिरले पुन्हा माघारी...

बुधवार, १८ जून, २०१४

खिडकी

खिडकीपाशी उभी राहून
मी पाहत होते
त्या चौकटीतलं
एक जिवंत चित्र ....
नात्यांच्या शृंखला
पायात अडकवून,
तू बंद केलसं मला 
तुझ्या घराच्या चार भिंतीत...
अन मग उपकार केल्याप्रमाणे
तू आभास निर्माण केलास,
मला स्वातंत्र्य देण्याचा
आणि उघडून दिलीस ही खिडकी ....
पण मला दार हवं आहे रे

तेच तर शोधतेय मी.......

सोमवार, १६ जून, २०१४

माझे मन एक वाट

माझे मन एक वाट
कधी सरळ कधी घाट,
कधी ओसाड वावर
कधी रान घनदाट....
माझ्या मनाच्या वाटेवर
किती खळगे नि खाचा,
मरूस्थळी कोसळावा
जसा मेघ वळीवाचा....
माझ्या मनाच्या वाटेची
काय सांगू कथा?
तिच्या अंतरी कोंडली
माझ्या भविष्याची व्यथा....
माझ्या मनाच्या वाटेत
किती वळण वळण,
चितेवर जळाव
जसं सरण सरण...
या मनाच्या वाटेचा
अंत कुठे असे?
पापण्यात माझ्या

मनीचा गाव वसे....

शनिवार, १४ जून, २०१४

कृष्णसखा

तू कृष्णसखा माझा 
मन माझे वृंदावन,
मी मुग्ध राधिका  बनले 
जग भासे नंदनवन …. 
मन झाले माझे धुंद 
तुझी वाजे मंद वेणू,
ही रासलीला चाले 
माझ्या हृदयांगणी जणू …. 
तुझ्या गळी वनमाला 
रानफुलांची शोभे,
बावरलेली राधा 
तिचा कृष्णसखा शोधे …. 
सैरभैर लोचने 
तुझी वाट न्याहाळती,
राधा झाली रे बावरी 
 अश्रु नयनी दाटती …. 
तुझी चाहूलही नाही 
झालास गोकुळा पारखा,
अश्रू ढाळते यमुना 
तू निर्मिली द्वारका …. 

आणखी एक प्याला

जळजळीत वास्तवाचं जहर रिचवीत, 
रिता झाला होता 
माझ्या दुःखांचा प्याला,
भरत आलेलं माझं मन 
समस्त व्यथांचं ओलेपण चुकवत…
या भरलेल्या मनातला गाळ 
तू उपसतोयस,
स्वतःसाठी जागा करण्याच्या उद्देशाने…. 
आणि पुन्हा एकदा 
भरत चाललाय 
माझ्या दुःखांचा 
आणखी एक प्याला …

आरसे

दाखवले जातात इथे सतत आरसे,
अनेकदा अंतर्गोल,
क्वचितच बहिर्गोल
मग ऐकवली जातात
त्यातील प्रतिमांची परीक्षणं,
बेंबीच्या देठापासून
ओरडून ओरडून…
अशावेळी प्रकर्षानं वाटतं,
नकोत कान,
नकोत डोळे,
नकोच आहे
कोणतेही ज्ञानेंद्रिय
कारण,
इथली ज्ञानाची कवाडं
केव्हाच झालीत बंद,
आज ज्याला म्हणतात ज्ञान 
ते आहे बंदिस्त,
आरश्यांच्या असंख्य चौकटीत...
आरसे आरसे फक्त आरसे
आरसे,
एकतर अंतर्गोल,
नाहीतर बहिर्गोल...

गुरुवार, १२ जून, २०१४

निसटून गेली ओळ...

जमुन आल्या गझलेमधली निसटून गेली ओळ अचानक,

अंतरातल्या हृद्य स्मृतींचा घालून गेली मेळ अचानक.......


शिरशिरणाऱ्या देहामधला फुलून आला काटा जहरी,

पेटून उठल्या स्फुल्लिंगाचा आज अनोखा खेळ अचानक.....

बुधवार, ११ जून, २०१४

तिच्या मनासारखा न घडलेला आणखी एक दिवस...


८.३० वाजतात. ती घराबाहेर पडते. नेहमीपेक्षा जरा लौकरच.... आज तिला बरीच कामं करायची असतात. तिचं डोकं विनाकारण दुखत असतं. ती आपली स्कुटी बाहेर काढते. कमी अवेरेज देणारी स्कुटी तिचे जास्त पैसे खाणार असते. तरीही गरज म्हणून ती हलक्या झालेल्या पाकीटाकडे दुर्लक्ष करते. रस्त्यावरसुद्धा एक ४ व्हीलर सतत तिच्या समोर येत राहते. ती होर्न वाजवते. पण वाजतच नाही. ती गाडी बाजूला थांबवते. आता स्टार्टरही लागत नाही आणि हेडलाईटही पेटत नाही. तिला त्याचं आश्चर्य वाटतं...
९ वाजतात. आता ती सेतूच्या कार्यालयात पोहोचते. कार्यालय बंद. १० वाजता उघडणार. ती रांगेत उभी राहते. १०.३० वाजून जातात. दाखल्यांची खिडकी उघडत नाही. आजूबाजूला सर्वच लोक सरकारी कामांवर आगपाखड करत उभे. कुणी कंटाळलेले. कुणी पेंगुळलेले. आणि कुणी कुणी तर रागाने पेटलेले. ती फक्त सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहते. एरवी तिने कुणा न कुणाची ओळख काढून बोलायला सुरवात केली असती. पण आता ती तसं काहीच करत नाही. कारण आता तिचा माणसातल्या माणूसपणावरचा विश्वास उडालेला असतो. ती मोबाईल बाहेर काढते. battery low झालेल्या मोबाईलवर net connect होत नसतो. आपण सगळ्यांच्याच connection बाहेर फेकले गेलो आहोत याची तिला तीव्र जाणीव होते. रांगेत तिच्या मागे उभा असणारा माणूस तिला सारखे धक्के मारत राहतो. ती त्याच्याकडे रागाने बघते. तो वरमतो. आपल्या नजरेतली पहिली जरब अजूनही शाबूत आहे याचं तिला फार नवल वाटतं...
 १०.४० वाजतात. खिडकी उघडते. एकच कल्ला होतो. तिच्या मागचे काही लोक तिला ढकलून पुढे जातात. तिचा तोल जातो. ती स्वतःला सावरते. आता तोल जाण्याची तिला सवय झालेली असते. त्याच गर्दीचा एक भाग होत ती खिडकीपर्यंत पोहोचते. अगदी कशीबशी. हातातल्या पावतीचा चोळामोळा झालेला असतो. खिडकीतली मुलगी उर्मटपणे तिच्याकडे पावती मागते. मनातला राग मनात ठेऊन ती पावती पुढे करते. १० मिनिटे ती खिडकीच्या गजांना धरून उभी. अपराध नसतानाही कोठडीत डांबल्याप्रमाणे. ती उर्मट मुलगी आधीच चोळामोळा झालेल्या पावतीचा आणखी चोळामोळा करून तिच्या हातात देते. आणि दोन दिवसांनी यायला फर्मावते. ती निमुटपणे खिडकीपासून दूर होते. पुन्हा पुन्हा वळून मागे पाहते. आजकाल तिला प्रत्येकवेळी वाटत प्रत्येक ठिकाणी तिच्या जिवंतपणाचा एक एक लचका तोडला जातोय. आणि त्या रक्ताचे ओहोळ त्या ठिकाणापासून तिच्यापर्यंत...
११ वाजतात. तिला एका परिचित व्यक्तीकडे दिलेला डबा परत घ्यायचा असतो. रस्त्यावर ट्राफिक. होर्न नसलेल्या स्कुटीवरून ती इतरांना ओरडून ओरडून बाजूला व्हायला सांगते. घशाला कोरड पडलेली. ती तिच्या परिचितांच्या अपार्टमेंटजवळ. ३ मजले चढून ती वर जाते. दाराला कुलूप. ती खाली येते. स्कुटीला किक मारते. ती खूप वेळ स्टार्टच होत नाही. समोरचा दुकानदार तिच्याकडे पाहत असतो. तिला ते जाणवत राहत. पण ती लक्ष देत नाही. अखेर स्कुटी स्टार्ट होते. ती ० टर्न मारते. तितक्यात दुकानदार तिला हाक मारतो. कुणाकडे काम होतं ते विचारतो. ती योग्य ती उत्तरं देते. तिच्या त्या परिचित व्यक्तीने डबा समोरच्या घरी देऊन ठेवलेला असतो. ती पुन्हा गाडी बंद करते. पुन्हा ३ मजले चढते. समोरच्या ब्लॉकचा दरवाजा वाजवते. तिच्या मनात विचार पाणी मागण्याचा. पण दार उघडतच नाही. खिडकीतून एक चेहरा डोकावतो. डबादेखील खिडकीतूनच मिळतो. मग पाणी मागण्याचा विचार ती डोक्यातून काढून टाकते. पुन्हा महत्प्रयासाने स्कुटी स्टार्ट करते. सूर्य डोक्यावर आणि काटा १२ वर...
तिला नोकरीची आत्यंतिक गरज. SBI मध्ये कारकून भरती. तिला वाटतं आपणही फॉर्म भरावा. ती सायबर केफेत जाते. नावाची नोंद करते. साईटची लिंक लगेच ओपन होते. तिला हायस वाटतं. ती फॉर्म भरते. फोटो आणि सही तिने स्कॅन करून मेमरी कार्ड मधून आणलेली. ती तिथल्या assistant कडे कार्ड रीडर मागते. तो connect होत नाही. ती पुन्हा फोटो आणि सही स्कॅन करायला देते. Assistant पुन्हा स्कॅन कॉपी तिच्याच मेमरी कार्डवर देतो. ती आता वैतागते. Assistant तिला कार्ड रीडर connect करून देतो. ती फॉर्म सबमिट करणार तोच लाईट जाते. ती बाहेर पडणार तोच assistant अडवतो. जनरेटर चालू करतो. ती पुन्हा फॉर्म भरायला घेते. आता तोच assistant तिला अधेमधे अनावश्यक सूचना देत राहतो. आता तिची सहनशक्ती संपलेली. चलनाची प्रिंटआउट घेऊन ती बाहेर पडते. या सगळ्या गोंधळाचे ४७ रुपये होतात. तिची नजर चलनावर. भरावयाची रक्कम ४५०...
१ वाजतात. बँक २ वाजता बंद होणार. त्यापूर्वी चलन भराव म्हणून ती ATM मध्ये जाते. ATM मशीन बंद पडलेले. ती दुसऱ्या ATM मधे जाते. तिथे १०० आणि ५०० च्या नोटा संपलेल्या. तिसऱ्या ATM मधून पैसे काढते. बँकेत जाते. तिथे भलीमोठी रांग. ती परत फिरते. बँकेबाहेर लिहिलेले कामकाजाची वेळ १०.३० ते २.३०. ती पुन्हा बँकेत जाते. रांगेत उभी राहते. २.२० होत आलेले. ती counter समोर. चलन counter मागील बाई हिसकावून घेते. वाचू लागते. ती पैसे हातात गच्च धरून. counter मागील बाई केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहते. तिला काहीच कळत नाही. ती बाई घड्याळाकडे पाहते. चलन परत देत म्हणते उद्या या...
ती तिच्या instituteमधे येते. पोटात भुकेचा आगडोंब. तिला उशीर झाल्याने तिचे विद्यार्थी खोळंबलेले. ती आधी त्यांना शिकवते. सराव करायला सांगून ती केबिनमध्ये येते. डबा उघडते. सकाळी केलेले कांदेपोहे एव्हाना आंबलेले. तिला त्याचेही काही वाटेनासे झालेले. उरलेला दिवस खूपच व्यस्त. मुलांना शिकवून शिकवून आता तिची बोलण्याची शक्ती संपलेली. नजर सतत घड्याळावर...
८ वाजतात. Institute चे owner अर्थात तिचे सर येतच नाहीत. ती computer shutdown करते. तर ते software update mode वर. तिचा नाईलाज. अखेर ८.२५ ला ते बंद होतात. ती Institute बंद करून बाहेर पडते. काटा ९ कडे वेगाने सरकत. हेडलाईट बंद असलेली स्कुटी रस्त्याच्या कडेने सावकाश चालवत ती घराकडे निघालेली. तर समोर पोलिसांचं चेकिंग. त्यांना चुकवण्यासाठी लांबच्या रस्त्याची निवड. तिला थोड बर वाटतं. रस्त्याला ट्राफिक नसतं. पण पुढे गेल्यावर कळत त्या रस्त्याला काही अंतरानंतर लाईटही नसतात. चौफेर काळोख आणि त्यात सामावलेली ती. अचानक समोरच्या वळणावर एक ट्रक येतो. ती दचकते पण सावरतेही. आता या क्षणी त्या ट्रकने आपल्याला ठोकलं असतं, त्यात आपण मेलो असतो तर? तिच्या मनात येत. पण दुसऱ्याच क्षणी ती स्वतःला बजावते कि ती तेवढी भाग्यवान नाही...
घरी जेवण तयार असतं. मात्र नेहमी एवढच. कारण आंबलेल्या पोह्यांची आईला कल्पना नसते. आणि मग तीही सांगत नाही. अर्धपोटी जेवलेली ती अंथरुणावर पडते. आणखी एक दिवस पूर्ण वाया गेलेला असतो. आता ती उदास असते. निराश असते. एकटी असते. ती मोबाईल जवळ घेते. त्यातल्या मेमरी कार्डवर तिला जवळच्या वाटणाऱ्या, एका खास व्यक्तीने दिलेली पु.लं.ची भाषणं, आणि व्यक्तिचित्रणे असतात. ती त्या फाइल्स शोधत राहते. पण सापडत नाहीत. तिला आठवतो सायबर केफेतला कार्डरीडर. त्यातूनच मेमरी कार्ड मध्ये शिरलेला व्हायरस. आणि त्याने खाल्लेली पु.लं.ची भाषणं, आणि व्यक्तिचित्रणे...
आता तिच्या मनात घोंघावणारे वादळ आणि आणि डोळ्यात आसवांचा पाऊस. त्या खास व्यक्तीने पहिल्या भेटीत दिलेली पहिली भेट. आणि तीच शेवटची एकमेव आठवण. तीही आता कायमची दुरावलेली. त्या खास व्यक्तीसारखीच. आता मात्र ती डोक्यावर पांघरूण ओढते आणि ओल्या उशीत तोंड खुपसते. तिच्या मनासारखा न घडलेला आणखी एक दिवस संपलेला असतो...


सोमवार, ९ जून, २०१४

मनोगत


नव्हती मला कसली अपेक्षा
नको मला सत्कार होते,
दाखल घ्यावी माझी अशी
मी कुठे दर्जेदार होते?
लेखणीतुनी जे उतरले
शब्द ते होते विखारी
माझे तरी बोलणे
कधी कुठे सुविचार होते?
सत्याचा आवाज माझा
गुंजे सभेत बधिरांच्या,
माझ्या मनातील भावनांना 
काव्याचे कारागार होते...
ना वादी ना प्रतिवादी
ना होते मी फिर्यादी 
जे मला दिलेत ते 
माझिया लेखी साभार होते...
हे कलंदर जीवन माझे
अन दुनियेची बेईमान नीती,
माझ्याहूनही प्यार मला
ते काळजावरले वार होते...