सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

असेच काही अवांतर १


इयत्ता सहावीत असताना पहिल्यांदाच इतिहासाच्या पुस्तकात कैलास मंदिराचं चित्र पाहिलं होतं. तेव्हापासून मनात वेरुळच्या लेण्या पाहण्याची इच्छा होती.आणि जेव्हा ही इच्छा पूर्ण झाली तेव्हा मात्र आनंदापेक्षा अस्वस्थताच जास्त जाणवली. हजाराहून अधिक प्राचीन असलेल्या त्या लेण्यांतील तथागताच्या चेहऱ्यावर प्रेम, करुणा, शांती दिसलीच नाही मला. काहीशा चिंतेतच तथागत ओढीत होते हातातली जपमाळ. अन् स्तुपातला काळोख अधिकच गडद होत चालला होता. खोदलेले मोठे चौकोनी खांब अन् त्यावर अपुरी राहिलेली शिल्पे पाहताना नकळत त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न मनात सुरु झाला. लेण्यांतला काळोख पडदा झाला. अन् त्यावर सुरु झाला भूतकाळाचा कल्पित चित्रपट. छिन्नी-हातोड्याचे नाजूक घाव घालत पाषाणातून आकार घेत गेलेली शिल्पे, विविध रूपे घेत जगाला शांतीचा संदेश देणारे बोधिसत्त्व, जातक कथा त्या एकसंध पाषाणातून चित्रित होत होत्या. बुद्धं शरणं गच्छामि म्हणत साधना करणारे भिक्षू, पिढ्यानपिढ्या खर्चून ते अप्रतिम शिल्प साकारणारे ते अज्ञात शिल्पकार कुठे अदृश्य झाले? काय झालं त्याचं? कठोर पाषाणाचे स्तंभ बनवून झाले होते. मग त्यावर शिल्प कोरण्याआधीच कुठे निघून गेले ते? काय कारण असावं? एखादा भूकंप झाला असेल का? की एखादा प्रलयंकारी पूर आला असेल? की धारेच हृदय आटवणारा एखादा दुष्काळ पडला असेल? पण एवढे शिल्पकार, एवढे भिक्षू सारेच कसे एखाद्या नैसर्गिक आपत्तीत परागंदा होऊ शकतील? असं काही घडलंच असतं तरी आपत्ती सरल्यानंतर त्या शिल्पकरांनी परत येऊन आपलं अधुरं काम पूर्ण केलंच असतं ना? आपल्या पूर्वजांनी एवढ्या कष्टाने, आस्थेने आणि समर्पित वृत्तीने निर्मिलेल्या या कलाकृतींना का बरं असं अपूर्ण ठेवलं गेलं? की काळानेच अशी काही कोलांटी घेतली होती की हे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे कुणाचेही धाडस झाले नाही? असंख्य अनुत्तरीत प्रश्न मन विलक्षण सुन्न करून गेले. चिंतामग्न भासणारा तथागतांचा चेहरा आणखीनच करून वाटायला लागला. सभोवतालचा अंधार अधिकच गडद होऊ लागला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार साऱ्या भारतवर्षातच नव्हे तर श्रीलंका, कंबोडिया, जावा-सुमात्रा द्वीपसमूह, ब्रह्मदेश या नजीकच्या देशातही केला. कर्मकांडाचे, वर्णव्यवस्थेचे प्रस्थ मोडीत काढले. माणसाला माणसासारखे जगण्याचे बळ दिले. प्रेम, शांती, करुणेचा संदेश आणि बोधीसत्त्वाचे तत्त्वज्ञान भारताची ओळख बनले होते. अन् त्याचवेळी मौर्य राजवंशातील अखेरचा सम्राट राजा बृहद्रथ याची त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने याने वसंतोत्सवाच्या उत्सवात केलेली निर्घृण हत्या केली. त्यानंतर मगधच्या साम्राज्याचा ताबा घेत केलेला अश्वमेध, आणि त्याबरोबरच तथागतांच्या प्रेमाच्या, सहिष्णुतेच्या आणि करुणेच्या शिकवणुकीपुढे निष्प्रभ झालेल्या वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन यांसाठी केलेले बौद्ध भिक्षूंचे शिरकाण. सारंच मन हेलावून टाकणारं. कडे-कपाऱ्यांतून साधना करणाऱ्या बौद्ध भिक्षुंना शोधून त्यांची केलेली हत्या प्राचीन भारताच्या इतिहासातलं एक काळे-कुट्ट पर्व आहे. असंच काहीतरी घडलं नसेल ना? या वेरुळच्या अपूर्ण लेण्या, ते अज्ञात शिल्पकार आणि त्या अपूर्णतेमधलं अनाकलनीय गूढ. या साऱ्यांची उत्तरं इतिहासाच्या पुनर्रचनेतूनच शोधावी लागतील. आपल्या धर्माचे वर्चस्व वाढवण्यासाठी नेहमीच एका धर्माने दुसऱ्या धर्मावर हल्ला चढवत रक्तपात केल्याचे दाखले इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात पाहायला मिळतात. आणि याला कोणताच धर्म अपवाद नाही. खेदाची बाब म्हणजे मध्य आशियात माजलेले अराजक, चाललेली युद्धे, होणारा रक्तपात आणि प्रबळ होत जाणाऱ्या धर्मांध शक्ती हा सारा उलटा प्रवास आपण सुरु केला आहे. महत्त्वाचे म्हणजे याची पुरेशी जाणीवही आपल्याला नाही. बदलत्या काळाची साद ऐकत विज्ञाननिष्ठेची कास धरून पुढे जाण्याऐवजी आपण जात, धर्म, वंश. प्रदेश यांच्या नावाखाली विभागले जातोय. स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी इतरांचा उपमर्द करतोय. धर्मसुधारणेची गरज असताना धर्मांधतेला खतपाणी घालतोय. आणि हे सारं आपल्या पाषाण नेत्रांनी पाहणारे तथागत म्हणूनच कदाचित इतके उदास आहेत, चिंतामग्न आहेत. साऱ्या जगभरातून लोप पावलेली आपली प्रेम, दया, शांतीची शिकवण शोधू पाहताहेत तथागत. शेकडो वर्षांच्या इतिहासात धर्माच्या नावावर झालेल्या हत्याकांडात बळी पडलेल्या लाखो निरपराधांचे रक्त वाहतंय तथागतांच्या डोळ्यातून अश्रू बनून, आणि आजही त्यांचा स्थितप्रज्ञ चेहरा देऊ पाहतोय सहिष्णुतेचा संदेश. आता गरज आहे फक्त तो संदेश समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा