गुरुवार, २ एप्रिल, २०१५

स्पर्शातून


विसरसीमेहून आठवत आठवत येत आहे
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?
अस्ताभोवती माझं पालवताना मन तुमच्या
मास्तर, उभ्याच आहेत रेघा भागाकाराच्या
वेशीच्या
तुम्ही एक अधिक एक शिकवलं
मास्तर, मला तुमच्यात मिळवलं
येता जाता ठेच लागायची,
मास्तर, होता तुम्ही वेशीबाहेर
आमचं नालंदा तुमचं घर
हाडांनी सांधलेली तुम्ही एक आकृती होता
माणूस होता, नागरिक होता, स्वच्छ स्वच्छ नीती होता
तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी
अजूनही नाही कळत मास्तर, तुम्ही अस्पृश्य कसे होता ?
होताहेत आता मुक्त संवाद आकाश-मातीचे
पण नालंदा कुठं आहे ?
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?
— फ. मुं. शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा