मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

लोकशाहीची ऐशीतैशी



मुक्या झाल्या आहेत लेखण्या
कोरे पडले आहेत ताव,
बोलणारे तर बोलत राहतात
खाऊन जातात भाव...
खून झालाय लोकशाहीचा
त्राता नाही उरला कुणी,
स्वातंत्र्याचं तर नावच नको
सारीच इथे आणीबाणी...
झुळझुळणारे झरेच नाहीत
पण आलाय महापूर मद्याचा
दसरा गेला उलटून तरी
सुकाळ येथे रावणांचा...
कुणाच्या घरी फ्रायपॅन
तर कुणाकडे रोकड रक्कम
बालंट आलं अंगावर तर
पाठीशी पक्ष भक्कम...
काय बोलावं काही कळेना
मनात दाटून येते भीती
युती-आघाड्यांचं सोडून द्या
सत्तेसाठी तुटतील नाती...
पाहिली लोकशाहीची ऐशीतैशी
तरी थोडा धीर धरा
मनात ठेऊन कर्तव्यभाव

डोळसपणे मतदान करा...

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

विसरू नये कुणीच...

विसरता येणं सहजशक्य असलं तरी
विसरू नये कुणीच
पहिल्या महायुद्धानंतर
इटलीच्या पदपथावर
अंगाचं मुटकुळं करून
कुडकुडणाऱ्या बेनिटोला,
विसरू नये कुणीच
नव्या विकासाच्या आश्वासनांनी
नव्या पिढीची मनं जिंकणाऱ्या
जर्मनीतील त्या समाजवादी
पत्रकार अडोल्फला,
विसरू नये कुणीच
काहीच
कधीच
महायुद्धे
विकासाची
प्रगतीची
आणि
अखेर संहाराची,
विसरू नये कुणीच
काहीच
कधीच
लोकशाहीच्या
अस्तित्वासाठी...



अनामिक २

क्रांती ही दीर्घकालीनच असावी, कारण अल्पकाळात घडलेली क्रांती ही अल्पकालीनच ठरते किंबहुना ती नव्या संकटांचा आवाहन करते. क्रांती मग ती समाजकारणातील असो, किंवा राजकारणातील. सजगपणे तिच्याकडे पाहणे गरजेचे आहे. शेवटी काय लोकशाही टिकून राहणे महत्त्वाचे...

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

स्वातंत्र्य ९

सर्वशक्तिशाली नियतीला
शक्य आहे सारं काही,
मला वाटतं
जर मिळाली तिला
जराशी सवड
तर तिने घ्यावा एक निर्णय,
तिने मला तोडावं
आणि पुन्हा जोडावं
मात्र अशाप्रकारे
कि समस्त जगाला
त्यावर काही आपत्ती नसावी,
तशी मी तिची संपत्ती नाही का?

पण
हे सर्वशक्तिशाली नियती
या स्वतंत्र भारतात
तुला तरी आहे का स्वातंत्र्य

तुझ्या निर्णयाचं?

रितं मन

प्रत्येक ऋतूचं कण्हणं
कानात गुंजत राहतं
हवेच्या कणाकणात
सामावलेली
संक्रामक वेदना
मला दंश करते,
आणि जगण्यासाठी
मी रित्या मनाने
मायेचा विसावा
शोधत राहते...

मला माणसं आवडतात
पण मला माहित नाही
कुठे आहेत माझी माणसं?
प्रत्येक ठिकाणी मला
मी एकटीच सापडते...




कागद आणि शाई



बरसणारी वर्षाधार
अवघ्या अवनीला
भिजवून गेली
तेव्हा
कडाडणाऱ्या विजेच्या प्रकाशात
मी पहिली
कोऱ्या कागदावर
पसरलेली काळी शाई,
लवंडलेली दौत उचलून
हातात घेतली
तेव्हा जाणवलं
तिच्या रिक्ततेत
एक कविता संपलेली...

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

पहाट

गारठलेल्या सत्वर हातांनी
उतरवल्या जातात एकामागून एक
अंधाराच्या पट्ट्या.

मी माझे डोळे उघडते,

अजूनही
माझ्या श्वासांच्या तारा
एखाद्या ताज्या जखमेच्या

मर्मस्थळाशी जुळलेल्या आहेत...