मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

नदीसाठी १


जेवढे जळ
ओंजळीत उचलु शकतो तुझ्यापासून
माझ्यासाठी तू तितकीच आहेस.
त्यातूनच भागवतो मी माझी तहान
त्यातूनच आपल्या आत उगवणाऱ्या सूर्याला
अर्घ्य अर्पण करतो.
आणि प्रत्येक वेळी रिती ओंजळ
डोळ्यांना आणि मस्तकाला लावून
अनुभव करतो
मी तुला
माझ्या आत

वाहताना पाहतो..

सोमवार, १ डिसेंबर, २०१४

योगायोगाने

मी एके दिवशी रस्त्यावर
एका माणसाला पाहिलं
आणि मला वाटलं, मी याला ओळखतो.

‘चूक’ – माझं मन म्हणालं.
‘तू याला माही ओळखत.’

ओळखतो – मी म्हणालो
हा तोच माणूस आहे
जो मला ट्रेनमध्ये भेटला होता.

‘एकदम चूक’ – माझं मन पुन्हा म्हणालं
‘हा तो नाहीये.’

आहे
नाही आहे –
मी खुप वेळ विचार करत राहिलो
तेवढ्यात मी पाहिलं
त्याच्या उन्हाने भरलेल्या चेहऱ्यावर तो चिकट द्रव
जो माणसाला वृक्षांपासून विलग करतो.

तोच – तोच –
हा तोच माणूस आहे –
मी स्वतःला सांगितलं
आणि अनेक दिवसांनतर
मला एवढा आनंद झाला
ज्याबाबत पुस्तकात
मी कुठेच काही वाचलेले नाही....




नव्या दिवसासोबत

नव्या दिवसासोबत
एक कोरं पान उघडलं
आपल्या प्रेमाचं

सकाळी,
यावर कुठेतरी आपलं नाव तरी लिहून जा...

अनेक अपशकुनी पानांमध्ये
यालाही कुठेतरी ठेवून देईन
आणि जेव्हा जेव्हा वारा येऊन
उडवेल अचानक बंद पानांना
कुठेतरी आत
मोरपिसाप्रमाणे ठेवलेलं ते नाव

वाचेन प्रत्येकवेळी.

खोलीतला दानव



घाबरत नाही
पण जेव्हा त्याला पाहतो
पाहवत नाही...

आजही उभा आहे तो
माझ्या दाराशी माझी वाट पाहत
मोठ्या मोठ्या पंखांचा खोलीतला दानव

फुलं कधी उमलतात
सण कधी येतात
अचानक वातावरण केव्हा बदलतं
त्याला सर्व माहित आहे.

म्हणून कधी काही विचारत नाही
जेव्हा मी बाहेरून येतो
गुपचूप आपले क्षत-विक्षत पंख उचलून
मला जागा देतो.

जणू तो सांगतो :
‘आता खूप थकलायस तू,
वीर योद्ध्या विश्राम कर.’

संध्याकाळच्या धुंदीत
उठणारे माझे हात
बांधले जातात.
कधी कधी त्याच्या खोल निळ्या डोळ्यांतून
करुणा बरसते
आणि मला वाटतं
याच्याशी काय लढायचं?

आणि कधी असंही होतं
परतताना वाटेत
निश्चय करतो
आज जाऊन त्याला आव्हान देईन
लढेन
पराभूत करेन
त्याचे काळे काळे पंख छाटून टाकेन

पण जेव्हा परततो
त्याला पाहतो त्याचप्रकारे
माझी वाट पाहत दारात उभा तो
खोलीतला दानव
अनिमिष, उदास.
माझ्या हातातून निसटतो संकल्प
घाबरत नाही
पण जेव्हा त्याला पाहतो
गुपचूप, अनिमिष, उदास

पाहवत नाही...

वसंत



आणि वसंत परत येतोय
शाकुंतलाचं एक पान
माझ्या कपाटातून निघून
वाऱ्यावर तरंगत आहे
तरंगत आहे कि उठावं
आणि आजूबाजूला पसरलेल्या वस्तूंच्या कानात
सांगावं ‘नाही’
एक दृढ
आणि छोटंस नाही
जे साऱ्या आवाजांच्या विरुद्ध
माझ्या उरात सुरक्षित आहे.

मी उठतो
दारापर्यंत जातो
शहराकडे पाहतो
हलवतो हात
आणि जोरात ओरडतो
नाही नाही नाही
मी अस्वस्थ आहे
मी किती वर्ष गमावली
रुळावरून चालत
आणि जगाला म्हणत

हो, हो, हो...

सीमा सुरक्षा दल




सीमा सुरक्षा दल
स्थापना : १ डिसेंबर १९६५


सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवून सीमेचे शांतता काळात संरक्षण करण्यासाठी नेमलेले सैन्यदल. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण हे सैन्यदलाचे प्राथमिक कर्तव्य असले, तरी सदासर्वकाळ-विशेषतः शांतताकाळातही-सैन्य तैनात करणे, हे एकूण सैन्याच्या युद्घक्षमतेला हानीकारक आहे. काही अशांत व जागृत सीमांवर सैन्यदलांच्या तुकड्यांची उपस्थिती अपरिहार्य असली, तरी बाकीच्या सीमांवर सैनिकीसम दलाची ( पॅरामिलिटरी फोर्स ) योजना करणे, हे सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने इष्ट ठरते. या सैनिकीसम दलाचे किंवा पोलीस दलाचे प्रमुख काम हे सीमोल्लंघन आणि तस्करीविरोधी स्वरूपाचे असते. किंबहुना हे काम सैन्यदलांच्या कक्षेबाहेरील आहे. यासाठी १९४७ ते १९६५ दरम्यान भारताच्या धोकाविरहित सीमापट्ट्यांवर संबंधित राज्यांच्या जबाबदारीखाली राज्य सशस्त्र पोलिसांच्या (स्टेट आर्म‌्ड पोलीस) तुकड्या तैनात केल्या जात असत. जम्मू व काश्मीरमधील काही भाग वगळता बाकी सर्व सीमापट्टा या पोलीस दलाच्या अधिक्षेत्राखाली होता. पाकिस्तानने कच्छ विभागातील सरदार पोस्ट, छाड बेट आणि बेरिया बेट या गुजरात राज्यातील सशस्त्र पोलिसांच्या चौक्यांवर ९ एप्रिल १९६५ रोजी अचानक हल्ले चढवल्यानंतर मात्र हे सर्व बदलावे लागले. राज्य सशस्त्र पोलीस दल शत्रूच्या सैन्याकडून होणाऱ्या पद्घतशीर हल्ल्याचा प्रतिकार करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी लागणारे युद्घसाहित्य, प्रशिक्षण आणि सैनिकी सामर्थ्य स्वाभाविकच सशस्त्र पोलिसांकडे नव्हते. त्यामुळे शत्रूच्या हल्ल्यानंतर माघार घेण्याशिवाय त्यांच्यापुढे अन्य कोणताच पर्याय उरला नव्हता.

या बाबतीत सर्व दृष्टींनी विचारविमर्ष झाल्यावर पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर एका विशेष, केंद्रनियंत्रित आणि शत्रूच्या हल्ल्याचा समर्थपणे प्रतिकार करु शकणाऱ्या पोलीस दलाची आवश्यकता असल्याची खात्री केंद्र शासनाला पटली आणि सीमा सुरक्षा दल या विशेष पोलीस दलाची रचना करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार १ डिसेंबर १९६५ रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली. भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी के. एफ्. रुस्तमजी यांची पहिले दलप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत या दलाचे कार्य चालते.


भारताच्या सीमांची सुरक्षितता आणि त्याच्याशी निगडित असलेले विषय ही सीमा सुरक्षा दलाची प्राथमिक भूमिका होय. सीमा सुरक्षा दलाचे काम शांतताकाळ आणि युद्घकाळ या दोन्हींत सातत्याने चालू असणे आवश्यक असल्याने या दोन वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांच्या कामांची जंत्री अशी :

शांतताकाळात : सीमा प्रदेशात राहणाऱ्या जनतेत सुरक्षिततेच्या भावनेची जोपासना करणे; सीमापार गुन्हे आणि अवैध प्रवेश-निर्गमनावर प्रतिबंध लादणे आणि चोरीची आयात-निर्यात आणि इतर अवैध कारवायांवर नियंत्रण ठेवणे.


युद्घकाळात :  दुय्यम धोक्याच्या क्षेत्रांमध्ये शत्रूच्या हल्ल्याविरुद्घ संरक्षणफळी उभी करून महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. तसेच विस्थापितांचे नियंत्रण-पुनर्वसन करून निर्देशित क्षेत्रात घुसखोरीविरुद्घ कारवाई करणे.

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापनेपासून आजतागायत हे दल राष्ट्रसेवेसाठी झटत आहे. भारत-पाक यांच्यामधील १९७१ चे बांगला देश युद्घ आणि १९९९ चे कारगिल युद्घ या दोन्हींमधील त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून सीमासंरक्षण करणाऱ्या या दलाचे कार्य सुकर आणि परिणामकारक होण्यासाठी भारतपाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा आणि जम्मू व काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लोखंडाचे अभेद्य कुंपण बांधून रात्री दोन्ही बाजूंचे क्षेत्र स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे घुसखोरांचे प्रमाण कमी होऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या कामास मदत मिळाली आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्षेत्रास वेगवेगळे नवे पैलू प्राप्त झाले आहेत. या दलाच्या तुकड्या संयुक्त राष्ट्रांमार्फत शांतता प्रस्थापनेसाठी कोसोव्हो आणि बोस्नियामध्ये पाठवल्या गेल्या. केवळ पाकिस्तान सीमेपर्यंतच मर्यादित न राहता सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या उपद्रववादी विरोधी कार्यवाहीसाठी मणिपूर राज्यातही तैनात आहेत. गुजरातमधील जानेवारी २००१ मधील भूकंप आणि इतर जातीय दंगलींदरम्यान सीमा सुरक्षा दलाने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. या दलाच्या उपलब्धींचा धावता आढावा घ्यायचा म्हटल्यास १९९० ते २००८ या एकोणीस वर्षांच्या कार्यकाळात दलाने ४,८११ दहशतवादी ठार केले, ११,७८७ घुसखोर पकडले, १५,७५६ शस्त्रे जप्त केली, ,९२३ कोटी रुपये मूल्यांची चोरटी आयात-निर्यात पकडली आणि १३,६५४ किग्रॅ. स्फोटके जप्त केली. या कालखंडात सुरक्षा दलांच्या १,३७३ जवानांनी प्राणाहुती दिली, तर ५,६६५ जवान जखमी झाले. ही आकडेवारी सीमा सुरक्षा दलाच्या सर्वोच्च राष्ट्रसेवेची द्योतक होय.

सीमा सुरक्षा दलाला १ महावीरचक्र, ४ कीर्तिचक्रे, ११ वीरचक्रे, १० शौर्यचक्रे आणि ५६ सेनापदके या वीरसन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक सन्मान त्याच्या अधिकारी आणि जवानांना व्यक्तिगत पातळीवर प्राप्त झाले आहेत.


राष्ट्रसेवेसाठी वाहून घेतलेल्या सीमा सुरक्षा दलाचे हे धवल राष्ट्रकार्य भविष्यातही चालू राहील यात तीळभर संदेह नाही.

हरवलेल्या वाटा
शोधता न आल्या
अशा जुन्या स्मृती

पुन्हा जाग्या झाल्या