शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

नको नको रे पावसा


नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्र्मौळी
आणि दारात सायली;
नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?
नको करु झोंबाझोंबी
माझी नाजुक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;
आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;
किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऎक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;
वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा,कडाडून
मागे फिरव पंथस्थ;
आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी बोलेन;
पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;
नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्र्मौळी
आणि दारात सायली…..


इंदिरा संत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा