शुक्रवार, ६ मार्च, २०१५

महिकावतीची बखर - भाग २


बखरीतील जुनी नावे ...

महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या एकूण शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी उर्फ फारशी शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १२ हजारात फक्त १०३ शब्द म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई - ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे सध्याची नावे कंसात दिलेली आहेत...

१. आगाशी (आगाशी- विरार जवळ)
२. उतन (उत्तन - भाईंदर जवळ)
३. कळवे (कळवा - ठाणे शहर)
४. कान्हेरी (बोरीवली)
५. कोंडीवटे (कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)
६. आन्धेरी (अंधेरी)
७. कानझुरे (कांझूर - कांझूरमार्ग)
८. कालिणे (कालिना - सांताक्रूझ)
९. कोपरी (कोपरी - ठाणे पूर्व)
१०. कोलसेत (कोलशेत - ठाणे - घोडबंदर)
११. उरण (उरण)
१२. आसनपे (आसनगाव)
१३. कल्याण (कल्याण)
१४. कांधवळी (कांदिवली)
१५. खरडी (खर्डी - कसारा जवळ)
१६. घोडबंदर (घोडबंदर ठाणे)
१७. चेउल (चौल - अलिबाग)
१८. डिडोशी (दिंडोशी)
१९. तांदूळवाडी पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)
२०. ताराघर (तारापूर - पालघरजवळ)
२१. तुरफे (तुर्भे)
२२. गोराई (गोराई)
२३. चरई (चरई - ठाणे पश्चिम)
२४. चेने (चेना - ठाणे घोडबंदर)
२५. चेंभूर (चेंबूर)
२६. जवार (जव्हार)
२७. डोंगरी (डोंगरी - मुंबई)
२८. दहीसापूर (दहिसर?)
२९. गोरगाव (गोरेगाव)
३०. चेंदणी (चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)
३१. जुहू (जुहू)
३२. तळोजे महाल (तळोजा - पनवेलजवळ)
३३. दांडाळे (दांडाळेतळे वसई)
३४. नागावे (नायगाव)
३५. बोरवली (बोरीवली)
३६. भाईखळे (भायखळा)
३७. महिकावती (माहीम - पालघर)
३८. बिंबस्थान (केळवे - पालघर)
३९. देवनरे (देवनार)
४०. नाउर (नाहूर - मुंबई)
४१. मणोर (मनोरी - मुंबई)
४२. मागाठण (मागाठणे - मुंबई)
४३. वरोळी (वरळी)
४४. वासी (वाशी)
४५. वाळुकेश्वर (वाळकेश्वर)
४६. वेउर (येऊर - ठाणे)
४७. वोवळे (ओवळे - ओवळा - ठाणे घोडबंदर)
४८. वरसावे (वर्सोवा)
४९. वांदरे (बांद्रा - मुंबई)
५०. विह्रार (विरार)
५१. माझिवडे (माजिवडा - ठाणे घोडबंदर)
५२. काशीमिरे (काशीमिरे - मीरारोड मधील)
५३. सीरगाव (शिरगाव - पालघर)
५४. मुंबई (मुंबई)
५५. मुळूद (मुलुंड)
५६. सानपे (सानपाडा?)
५७. साहार (सहार - मुंबई विमानतळ भाग)
५८. सीव (शिव - सायन)
५९. साष्टी (ठाणे परिसर)
६०. सोपारे (नालासोपारा)



महिकावतीची बखर - भाग 1


प्रस्तावना ...

महिकावतीची बखर हे इतिहासाचार्य कै. वि. का. राजवाडे यांचे आणि वरदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक वाचनात आले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली होती.  राजवाडे यांना ही बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. राजवाडे  यांनी बखरीचा अभ्यास करून एकूण ४९ मुद्यांवर ११० पानी जी प्रस्तावना तयार केली ती खूपच महत्वाची आहे. महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे मुंबईचे माहीम नसून पालघर येथील  केळवे उत्तर माहीम हे आहे. कोकणचा इतिहास सांगणारी ही बखर साधारणपणे १४व्या शतकात लिहिली गेली असून ह्या बखरीमधला इतिहास काळ शके १०६० म्हणजे इ.स. ११३८ पर्यंत मागे जातो. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ही अत्यंत जुनी अशी बखर आहे. ह्या बखरीचे एकूण ६ प्रकरणे असून त्यात विविध प्रकारची माहिती दिली आहे. ती कोणती ते आपण बघू...

१.     पूर्वपरंपरा - वर्णउत्पत्ती - वर्णावर्ण व्याख्या : हे प्रकरण शके १५७८ (इ.स. १५००)च्या आसपास भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.

२.     राजवंशावळी : हे प्रकरण शके १४४८ (इ.स. १३७०)च्या फाल्गुन महिन्यात  केशवाचार्य या व्यक्तीने लिहिले.

३.     निवाडे व हकीकती : हे प्रकरण शके हे प्रकरण शके १४४८ (इ.स. १३७०) नंतर केशवाचार्य या व्यक्तीने लगेचच लिहिले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणाचा काळ हा पहिल्या प्रकरणाच्या आधीचा आहे

४.     श्रीचिंतामणीकौस्तुभपुराण :  हे प्रकरण शके १५०० (इ.स. १५७८) च्या आसपास  भगवान दत्त नामक व्यक्तीने लिहिले.

५.     पाठाराज्ञातीवंशावळी : हे प्रकरण शके १५३८ (इ.स. १४६०)मध्ये लिहिले गेले कर्ता मात्र अनामक आहे.
६.     वंशावळी : या प्रकरणाचा काळ शके १४०० (इ.स. १४७८) आहे असे ह्या प्रकरणाचा अनामक कर्ता सांगतो. पहिल्या ३ प्रकरणाप्रमाणे येथेही सहाव्या प्रकरणाचा काळ हा पाचव्या आणि पाचव्याचा काळ चौथ्या प्रकरणाआधीचा आहे हे असे का ते आपण आता बघुया.

वरील लिखाण नीट वाचल्यास हे स्पष्ट होते की प्रकरण २ व ३ ही सर्वात आधी लिहिली गेली. ती केशवाचार्याने लिहिली. ह्यात माहिम प्रांतामधील सर्व कुळांची वंशपद्धती आली आहे. प्रकरण २ व ३ नंतर थेट ६ वे प्रकरण लिहिले गेले. ह्यात  फक्त प्रकरण २ आणि ३ मध्ये राहून गेलेल्या कोळंबा- शिळंबा कुळांची वंशपद्धती आली आहे. त्यानंतर प्रकरण ५ वे लिहिले गेले. ह्यात महिकावती प्रांतात पाठारे प्रभू कसे आले त्याची हकीकत आहे. प्रकरण ५ आणि ६  यांचा कर्ता मात्र अनामक आहे. सुमारे ५० वर्षांनी भगवान दत्त नामक व्यक्तीच्या हाती ही ४ प्रकरणे गेली. त्याने प्रकरण २ व ३ वरती प्रकरण १ आणि ५ व ६ वरती प्रकरण ४ अशी स्वतंत्र प्रकरणे चढवली. अशाप्रकारे प्रकरण २ आणि ३ साठी प्रकरण १ आणि प्रकरण ५ आणि ६ साठी प्रकरण २ अशा  स्वतंत्र बखरी तयार झाल्या. पुढे कोणा एका दुसऱ्या अनामिकाच्या हाती ही सर्व प्रकरणे इ.स. १६०० च्या आसपास पडली त्याने ती एकत्र करून सबंध ग्रंथ तयार केला. थोडक्यात इ. स. १४४८ ते १९६० अशी १५० वर्षे  ह्या बखरीत लिखाणाची भर पडत गेली. मुळात केशवाचार्याने हे लिखाण का केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले ते आपण आता बघुया...
शके १३७०(इ.स. १४४८) मध्ये मालाड  येथील देसला उर्फ देसाई नायकोराव याने केशवाचार्याला वंशपद्धतीचे कर्म करावयास सांगितले.  बखरीतील पण क्रमांक ५३ वर केशवाचार्य लिखाणाचे कारण सांगतो.

"सर्व कोंकणप्रांत म्लेच्छानी आक्रमण करून, येथून तेथून चोहीकडे सर्वत्र म्लेच्छावर्णा खाली पृथ्वी बुडून गेली. वर्णावर्ण वोळख नाहीशी झाली स्वकुळाची वास्तपुस्त कोणाच्या गावी हि राहिली नाही. क्षत्रियांनी राज्याभिमान सांडिला, शस्त्रे सोडिली व केवळ कृषिधर्म स्वीकारुन कित्येक निव्वळ कुणबी बनले, कित्येकांनी कारकूनवृत्ती आदरिली, कांहिक सेवावृत्ति अंगीकारून निभ्रांत शुद्र ठरलेशाणी कित्येक नष्ट होऊन नामशेष हि राहिले नाहीत. बहुत आचारहीन झाले. गोत्र, प्रवर, कुळस्वामी, कुळगुरु ह्यांची बहुतेकांस आठवण हि राहिली नाही. अशी ह्या तीन शें वर्षात भ्रष्टता माजली व महाराष्ट्रधर्म अज्जी बुडाला. अश्या संकटसमयी श्रीदेवी कुळस्वामिणी, मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नात येऊन, सांगती झाली की, नायकोरावा, उठ, महाराष्ट्रधर्म रक्षिण्याकरीता अठरा पगड जातीचा मेळावा कर आणि केळव्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व गावचे, सर्व जातींचे व सर्व गोत्रांचे खलक जमवून, त्यांस केशवाचार्याच्या मुखे महाराष्ट्रधर्म सांगीव"

ह्यानंतर मालाडच्या नायकोरावाने केशवचार्याच्या संमतीने मालाड उर्फ म्हालजापूर येथील जोगेश्वरीच्या देवळापुढे विस्त्रीर्ण मंडप रचून, तीन हजार साहा शें पंचावन्न लोक जमा केले. त्यात नायक (नाईक), देसाई, पुरोहित, कुळगुरु, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य मुख्य वृतीवंत होते. पाचशें एकवीस  ब्राह्मणांनी लक्ष्मीसूक्ताने भगवती दुर्गादेवीचे स्तवन केले व श्रीदेवी आद्यशक्ति जगदंबिका महाराष्ट्रधर्म रक्षिका जी जगन्माता दुर्गादेवी ती तुम्हा सर्वांवर सुप्रसन्न असो असा आशीर्वाद दिल्यानंतर केशवचार्याने सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांस प्रस्तुत लिहिली गेलेली वंशपद्धती राजा बिंबापासून अद्ययावत कथन केली व महाराष्ट्धर्माचे निरुपण केले. त्या वंशपद्धतीच्या व महाराष्ट्रधर्म कथनाच्या सासष्ट (६६) नकला करून, साक्ष- शिक्यानिशी त्या नकला त्या- त्या कुळास, वंशास व जातीस प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनीवंशांनी व जातींनी त्या शिरी वंदन करून ठेविल्या. ज्या महाराष्ट्रधर्माचा उच्चार १७व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी आणि १९ व्या शतकात महादेव गोविंद रानडे यांनी केला तो मुळात प्रथम १५व्या शतकात केशवचार्याने केला होता. त्या ६६ नकलांपैकी आज एकही बखरप्रत उपलब्ध नाही. राजवाडे यांना मिळालेली प्रत ही देखील मूळ बखरीची नक्कल आहे. १५० वर्षे नक्कल करताना  भर पडत राहिलेल्या ह्या बखरीमध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. पण म्हणून ह्या बखरीचे महत्व कमी होत नाही. अजून काही नक्कल केलेल्या प्रती किंवा मूळ प्रती सापडल्या तर सध्या उपलब्ध असलेल्या प्रतीमधल्या त्रुटी सुद्धा कदाचीत भरून निघतील आणि उत्तर कोकणचा आणि महाराष्ट्रधर्माचा जुना वैभवशाली इतिहास नव्याने आपल्यासमोर मांडला जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

जनरीत

दिवस सुंदर, रजनी सुंदर,
अंतर सुंदर, सुंदराचे...

सुंदरच नाही, जगतात काही,
अंतरही नाही, माणसास...

जिव्हा करी वार, वाही व्यर्थ भार,
अहंकार सार, वर्तमानी...

जग चाले असे, काय सांगू कसे,
हित मनी वसे, जनांचिया... 

जशी होते तशीच.

परततेय पुन्हा माझ्यातच
मी जशी होते तशीच.
मन मोठ्ठ करून महान होण्याच्या
निष्फळ प्रयत्नांत
आता अडकायचंच नाहीये मला
हवीये पुन्हा तीच
उद्दाम वाणी
आधी जशी होती तशीच.



कोलंबसाचे गर्वगीत


क्षणिक




सर्वात्मका शिवसुंदरा