बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४
मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक: केशवसूत
केशवसुत : (७
ऑक्टोबर १८६६ — ७ नोव्हेंबर १९०५).
नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे,
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे...
असं म्हणत नव्या
विचारांची, परिवर्तनाची द्वाही फिरवणारे आणि आधुनिक मराठी
काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी म्हणजे केशवसूत. त्यांचे
पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. ‘काव्यरत्नावली’ ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस
यांच्या सूचनेवरून ‘केशवसूत’ या टोपण-नावाचा त्यांनी स्वीकार केला. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड ह्या गावी झाला. त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते. वडिलांच्या बदल्यांमुळे केशवसुतांचे शिक्षण
खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी झाले.. शिक्षणकालातच १८८० मध्ये त्यांचा
विवाह झाला. मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत त्यांनी निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे
प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत
दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून त्यांची फैजपूरला
मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे
शिक्षक म्हणून बदली झाली. १९०५ साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन
झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.
केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच
काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५
ते १९०५ हाच होय. या काळातील त्यांच्या सु. १३५ कविता आज उपलब्ध आहेत. नागपुरास
असताना रेव्ह. टिळक व कवी वसंत यांचा
सहवास त्यांना लाभला होता. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच
त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत
काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले.परंतु
इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स
यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. इंग्रजी
अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञानविस्तारातून प्रकाशित केलेल्या
भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या
काव्याच्या चिंतन मननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्मक स्फुट भावकविता लिहिली व
मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्माविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले.
त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्रीपुरुषांतील
प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ (सक्षात्कारी) अनुभूती
अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी
मनोवृत्तीचाच विविध रूपांनी झालेला हा आविष्कार आहे. ह्या मनोवृत्तीचा आविष्कार
मराठी काव्यक्षेत्रात निश्चितच क्रांतिकारक ठरला; म्हणूनच
केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या
काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.
नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा
दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते.
केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’
(१८९६),
‘कवितेचे
प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’
(१९०४)
या महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या
कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन
प्रेरकता जाणवते. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्ड्स्वर्थ व एमर्सन यांच्या
विचारांचा परिणाम झालेला दिसतो. सृष्टीतील सौदर्य काव्याला प्रेरक ठरते व तीत
मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा
दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’
(१८९२)
व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या
निसर्गकविता होत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या.
क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता
म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’
(१८९८)
व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. त्यांच्या सामाजिक
विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल
मानवतावाद ही आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीला ‘सुरलोकसाम्य’
प्राप्त
करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहिले होते.
त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितांतून आढळतो. गूढ अनुभूती व तिची
नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली ‘झपूर्झा’ (१८९३) ही
त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत ‘म्हातारी’
(१९०१)
व ‘हरपले श्रेय’ (१९०५) यांचा समावेश होतो. शैलीच्या
द्दष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे; पण काहीशी राकट
आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्यप्रकृतीशी सुसंगत ठरते.
केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही
परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची
आहे; असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट
स्वरूपाचे ठरते; अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा
मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी
काव्यातील सुनीत हा छंदःप्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन
मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली.
आयुष्याच्या शेवटीशेवटी आपली
काव्यशक्ती नष्ट झाल्याची जाणीव त्यांस झाली होती, असे त्यांच्या
एका पत्रावरून वाटते. काव्याशिवाय एक गद्य नाटकही त्यांनी लिहिले होते; पण
ते अप्रसिद्ध आहे. काही इंग्रजी कविताही त्यांनी रचल्या होत्या.
केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या
मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी १९१६ मध्ये प्रकाशित केला. गोविंदाग्रज, बालकवी,
रेंदाळकर,
सोनाळकर,
काव्यविहारी
यांसारखे कवी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत. ‘तुतारी-मंडळ’
या
नावाचे एक मंडळही स्थापन झाले होते.
केशवसुत हे आधुनिक मराठीतील सर्वांत
जास्त वादग्रस्त कवी आहेत. त्यांचे कवित्व, कवीपण, काही
दृष्टिकोन, काही कविता, क्रांतिकारकत्व
व श्रेष्ठत्व हे सर्वच वादाचे विषय ठरले. एकांगी समीक्षेने पुष्कळदा अशा वादांचा
जन्म होतो. ही वादग्रस्तता केशवसुतांच्या श्रेष्ठत्वाचाच एक पुरावा होय.
केशवसुतांनंतरच्या गेल्या सत्तर - ऐंशी वर्षांत आधुनिक मराठी काव्यात कितीतरी
परिवर्तने व प्रयोग झाले, तथापि केशवसुतांच्या काव्याची प्रेरकता
व महत्त्व ही कायमच राहिली.
महाराष्ट शासनातर्फे १९६६ मध्ये
केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने केशवसुतांच्या काव्यसंग्रहाच्या
हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती १९६७ मध्ये प्रकाशित केली.
संदर्भ : १. कामत, गजानन; नाडकर्णी,
सीताराम;
जोशी,
सुधाकर,
संपा,
केशवसुतसमीक्षा,
१९०६-१९५६, पुणे, १९६६, पुणे,
१९६६.
२. जोग, रा.
श्री. केशवसुत काव्यदर्शन, मुंबई, १९४७.
३. दामले,
द.
मो. सरस्वतीचे लाडके पुत्र, सोलापूर, १९६६.
४. दामले,
पं.
चि. संपा. केशवसुंत स्मृतिग्रंथ, पुणे, १९५५.
५. पंडित,
भ.
श्री. केशवसुत : पाच चिंतनिका, अमरावती, १९६१.
६. पंडित,
भ.
श्री. समग्र केशवसुत, पुणे, १९६४.
७. बेडेकर,
दि.
के. केशवसुतांची काव्यदृष्टी, मुंबई, १९६६.
८. माडखोलकर, ग.
त्र्यं.आधुनिक-कविपंचक, पुणे, १९२१.
कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र
असते व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या
दृष्टीने हा उत्सव साजरा करतात.
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद
पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात.
ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा
बहुधा ऑक्टोबरमध्ये असते.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या
दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर
लागू पडते असा समज आहे.
ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’
म्हणतात.
दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी; या
पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात
केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे,
जायफळ
वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला
जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह
स्वतःही सेवन करावेत. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध
मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.
अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तररात्री
साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को
जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते,
म्हणून
या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.
या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले
आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे,
उद्याने,
घाट
इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत.
सनत्कुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे.
प्राचीन काळी याच दिवशी ‘कौमुदी महोत्सव’ साजरा करीत. ‘कौमुदी
पौर्णिमा’ व ‘शरदपौर्णिमा’ अशीही नावे ह्या
दिवसास आहेत.
पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही
पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे.
या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला
पाहिजे. काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलश्यावर वस्त्राने झाकलेली सोन्याची
लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय
झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले १०० दिवे
लावतात. देवीला नैवैद्य दाखविला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व बर्याच
पात्रात भरून ती चंद्र किरणांखाली ठेवावी. तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला
अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून,
भजने
म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सुर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची
प्रतिमा गुरूजींना अर्पित करावी. अशीही काही ठिकाणी पद्धत,परंपरा आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी
महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणार्याला
प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धन-धान्य
देईन, असे ती म्हणते.
दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला
संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण
मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून
शरद पुनम नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी
लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला
ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.
आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या
पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या
पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या
दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
अशीही शरद पोर्णिमा सर्वांनी आज साजरी करूयात.
सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४
कुरुक्षेत्र...
मी नाही जन्मले
सूर्याकडून
कवचकुंडले घेऊन
माझ्यासोबत आहे
पिता स्वयं सत्य
जो कोणतेही युद्ध
जिंकण्यास सक्षम आहे.
मी नाही करत प्रयोग
त्या रथाचा
ज्याचा सारथी कृष्ण असेल
आणि नाही उचलत गांडीव
त्यांच्या कूटनीतीने
प्रेरित होऊन
मी तर स्वयंसिद्ध साधक आहे
माझी साधनाच बनवते मला
कर्मक्षेत्रातील
वीरांगना...
माझ्याकडे नाहीये
द्रोणांची विद्या
पितामहांचे आशीर्वाद
आणि मी काही
एकलव्याचा पुनर्जन्मही नाही,
माझ्याकडे आहेत
माझे दोन हात
जे संघर्षातून सुलाखून बनले आहेत
पोलाद
जे करू शकतात
कोणत्याही अन्यायाचा प्रतिकार...
मला नाही मिळालं
अंध गांधारीचं वरदान
महाराणी कुंतीच्या तपस्येचं
फळ
परंतु माझ्याकडे आहे
माझ्या निष्कपट आईचे पवित्र
दुध
जे बनवतं कोणत्याही विषाला
अमृत
आणि मी जिंकत जाते
एक एक कुरुक्षेत्र...
रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




