मला अनेकदा अनेकांनी विचारलं असेल, तुझा वाढदिवस कधी? मात्र आजही मी या प्रश्नाचं
उत्तर देणं टाळते. यामागचं कारण काय हे मला आजही सांगता येणार नाही.
बरीच वर्ष उलटून गेली आहेत आत्ता. मात्र शाळा आणि तिथले दिवस मात्र विसरता येत
नाहीत. प्राथमिक शाळेत असताना ज्यांचा वाढदिवस असे त्या मुलांना बाई समोर बोलावत.
अन्य मुलं त्यांना शुभेच्छा देणारा श्लोक म्हणत. त्यानंतर वाढदिवस असणारी मुले
वर्गातल्या सगळ्या मुलांना भेटवस्तू देत असत. त्या भेटवस्तूंची उत्सुकता इतकी असे
की बाईंच्या लक्षात नसलं तरी वर्गातली अन्य मुले त्यांना आठवण करून देत. कुणी
पेन्सिल, कुणी कंपास, तर कुणी अन्य नव्या नव्या वस्तू देई. कुणीतरी आपल्याला काही
दिलं तर आपणही द्यायला हवं ही समज तेव्हाही होतीच. पण ऐपत नव्हती. मग वाटायचं,
आपला वाढदिवस कधीच येऊ नये. तो कुणाच्या लक्षात असू नये. किमान आपल्या वाढदिवसाला
सार्वजनिक सुट्टीच असावी. माझा वाढदिवस मार्चअखेरीस असल्याने हे घडायचंही अनेकदा. पुढे
माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात आल्यावर मैत्रिणींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
पाहत आले. कुठेतरी हॉटेलमध्ये जायचं, मैत्रिणींना खाऊ घालायचं, महागडी गिफ्ट
द्यायची म्हणजे वाढदिवस हे समीकरण कळू लागलं आणि मग वाढदिवस हा शब्द ऐकला की मी
काढता पाय घेऊ लागले. आणि तसंही कुणी माझा वाढदिवस लक्षातही ठेवला नाही. तेव्हापासून
आजपर्यंत वाढदिवस या शब्दाची गूढ भीती कायम आहे.
गतवर्षी मी ठरवलं होतं, आपल्या वाढदिवसाला सुट्टीच घ्यायची. मात्र नेमका
त्याचदिवशी टीवायबीएच्या मुलांनी त्यांचा निरोप समारंभ ठेवला. मला कुणी अचानक
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर? या विचाराने हादरलेच होते मी. मनात प्रचंड
चलबिचल होती. मुलं वर्गाची सजावट करत होती. मी तयारी कुठवर आलीये हे पहायला गेले
तर त्यांनी मला हाताला धरून बाहेरच काढलं आणि दार लावून घेतलं. नंतर जेव्हा दार
उघडलं तेव्हा सुखद धक्काच बसला. फळ्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा, फुगे, केक आणि
मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद. मनात खोलवर जाणवलं, हा माझा खरा
वाढदिवस. केक कापल्यावर मुलांनी फुगा फोडला आणि त्यातून चिठ्ठ्यांचा पाऊस पडला. मी
प्रत्येक चिठ्ठी वाचली. मुलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आपण खूपच
स्पेशल आहोत हे तेव्हा जाणवलं. आपलं जगात येणं सार्थकी लागलंय असं वाटलं.
यावर्षी अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक सुट्टी होती. मात्र तरीही रात्री १२ वाजता
मुलांनी पाठवलेले शुभेच्छासंदेश यायला सुरुवात
झाली आणि हा ओघ संध्याकाळपर्यंत सुरु होता. प्रत्येकाचे संदेश लगेच वाचणं शक्य
नव्हतं. मात्र आपल्या शुभेच्छा बाईंनी वाचल्या नाहीत या विचाराने अस्वस्थ झालेल्या
काहींनी मग फोनवरून शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरा जेव्हा मोबाईल हातात घेतला
तेव्हा पाहिलं तर सोशल मिडीयावर तर शुभेच्छा होत्याच. मात्र मुलांनी त्याच्या
वैयक्तिक प्रोफाईल फोटो, स्टेटस यातूनही माझा वाढदिवस साजरा केला होता. रात्री खूप
उशिरा एका मैत्रिणीने विचारलं, आज काय काय गिफ्ट्स मिळाली. मी म्हटलं, मुलांच्या
मनातलं आदराचं स्थान, त्याचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा आणि त्यांच्या शुभेच्छा !
पुष्कळ झालं. अजून काय हवं.
मुलांनो, तुमचे आभार कसे मानायचे? मला खरंच सुचत नाही. पण तुमचा हा लोभ असाच
राहो हेच ईश्वराकडे मागणे. खूप मोठ्ठे व्हा !