साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथे एका सधन
कुटुंबात झाला. त्यांच्या मातोश्री सरलादेवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी
माँटेसरी शिक्षणपद्घतीवर आधारलेली खाजगी शाळा सुरू केली होती. तेथे विक्रम यांचे
आधीचे शिक्षण झाले. साराभाई कुटुंबाचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंध असल्याने
त्यांच्या घरी रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, व्ही. एस्. श्रीनिवास शास्त्री, मोतीलाल व जवाहरलाल
नेहरू, सरोजिनी
नायडू, मौलाना
आझाद यांसारखी मंडळी येत असत. या थोर व्यक्तींचा साराभाई यांच्या व्यक्तिमत्त्वावर
मोठा प्रभाव पडला.
साराभाई यांचे पुढील शिक्षण अहमदाबाद येथील
गुजरात कॉलेजमध्ये झाले. नंतर ते इंग्लंडला गेले व केंब्रिज विद्यापीठातील सेंट
जॉन्स कॉलेजातून १९३९ मध्ये रसायनशास्त्र व भौतिकी या विषयांतील ट्रायपास परीक्षा
उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी बी. ए. (१९४०) व एम्. ए. (१९४२) या पदव्या संपादन केल्या.
दुसरे महायुद्घ सुरू झाल्याने ते भारतात परत आले. त्यांनी बंगलोर येथील
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या मार्गदर्शनाखाली
विश्वकिरणांसंबंधी संशोधन केले (१९४२–४५). दुसरे महायुद्घ संपल्यानंतर १९४५
मध्ये ते केंब्रिज येथील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत दाखल झाले. तेथे त्यांनी
उच्च-ऊर्जावान प्रकाशकणाचे (फोटॉनाचे) शोषण झाल्याने युरेनियम (२३८) या
समस्थानिकाच्या (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या
प्रकाराच्या) झालेल्या भंजनाविषयी संशोधन केले. त्यांनी कॉस्मिक रे
इन्व्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्यूड्स हा प्रबंध लिहिला व त्याबद्दल त्यांना
१९४७ मध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली. विश्वकिरणांप्रमाणेच सौर भौतिकी व
आंतरग्रहीय भौतिकी या विषयांतही त्यांना रस होता. यासाठी त्यांनी भारतात बंगलोर,
पुणे, काश्मीर,
हिमालय इ. अनेक
ठिकाणी निरीक्षण केंद्रे उभारली.
साराभाई यांचा विवाह सप्टेंबर १९४२ मध्ये विख्यात
नर्तिका मृणालिनी यांच्याशी मद्रास (चेन्नई) येथे झाला. या दांपत्याला कार्तिकेय व
मल्लिका ही मुले झाली. यांपैकी मल्लिका या प्रसिद्घ नर्तिका आहेत.
भारतात परतल्यावर विक्रम साराभाई यांनी देशाची
गरज ओळखून भौतिकीची प्रयोगशाळा उभारण्याचे ठरविले. त्यासाठी मित्रांकडून आणि
साराभाई कुटुंबाच्या व्यवस्थापनाखाली एका विश्वस्त निधीमधून त्यांनी पैसे गोळा
केले. त्यांच्या आईवडिलांनी स्थापन केलेल्या अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम्.
जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधील काही खोल्यांमध्ये त्यांनी भौतिकीची प्रयोगशाळा
उभारली. अशा रीतीने ११ नोव्हेंबर १९४७ रोजी अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च
लॅबोरेटरीची स्थापना झाली. येथेच त्यांनी भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
१९६५ मध्ये ते या प्रयोगशाळेचे संचालक झाले. त्यांनी बहुतेक संशोधन येथेच केले.
विश्व किरणविज्ञान, अवकाशविज्ञान, अतिउच्च वातावरणविज्ञान, आयनांबरविज्ञान [⟶ आयनांबर], सैद्घांतिक
अणुकेंद्रीय भौतिकी व ⇨ आयनद्रायू भौतिकी या विषयांच्या
संशोधनाकरिता तेथे त्यांनी उत्कृष्ट योजना तयार केली. त्यांनी अहमदाबाद टेक्स्टाइल
रिसर्च ॲसोसिएशन या संस्थेची स्थापना करून भारतातील कापड उद्योगातील संशोधनाचा
पाया घातला.
होमी भाभा यांच्या सक्रिय पाठिंब्याने विक्रम साराभाईंनी देशातील
पहिले रॉकेट लाँचिंग सेंटर तिरुवनंतपूरम् (त्रिवेंद्रम) जवळ अरबी
समुद्रकिनाऱ्यावरील थुंबा या ठिकाणी उभारले (१९६३), कारण हे ठिकाण विषुववृत्ताच्या बरेच जवळ
आहे. तेथून २१ नोव्हेंबर १९६३ रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारतातून
पहिले रॉकेट यशस्वी रीतीने अवकाशात पाठविले. १९६५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या
सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय अवकाश सुविधा म्हणून या केंद्राला मान्यता दिली.
१९६७ मध्ये त्यांनी अहमदाबाद येथे एक्स्परिमेंटल सॅटेलाइट कम्युनिकेशन अर्थ स्टेशन
हे केंद्र उभारले. आर्वी येथे त्यांनी उभारलेल्या उपग्रह संदेशवहन केंद्राचे
त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी ‘विक्रम अर्थ स्टेशन’ असे नामकरण केले.
साराभाई यांनी अगदी वेगवेगळ्या पुढील अनेक संस्था
उभारल्या: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, इंडियन इन्स्टिट्यूट
ऑफ मॅनेजमेंट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (अहमदाबादमधील उद्योगपतींच्या
सहकार्याने उभारलेली), दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (अहमदाबाद; पत्नीसमवेत), विक्रम साराभाई स्पेस सेंटर
(तिरुवनंतपूरम्), स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर (अहमदाबाद; साराभाई यांनी स्थापन केलेल्या सहा
संस्थांचे विलिनीकरण करण्यात आल्या नंतर), फास्टर ब्रीडर टेस्ट रिॲक्टर (कल्पकम्), व्हेरिएबल एनर्जी
सायक्लोट्रॉन पोजेक्ट (कोलकाता), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
(हैदराबाद) आणि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (जादुगुडा, बिहार), कम्युनिटी सायन्स
सेंटर (अहमदाबाद).
विक्रम साराभाईहोमी भाभा यांच्या निधनानंतर
विक्रम साराभाई भारतीय अणु- ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा
विभागाचे सचिव झाले (१९६६–७१). ते अहमदाबाद टेक्स्टाइल इंडस्ट्रीज रिसर्च
असोसिएशनचे अध्यक्ष (१९४७– ५५), अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यागत प्राध्यापक (१९६१–७१), स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी सेंटर (थुंबा) व इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) येथे संचालक (१९६२–६५) आणि इंडियन नॅशनल कमिटी ऑफ
स्पेस रिसर्चचे चेअरमन होते. ते आंतरराष्ट्रीय पग्वॉश कंटिन्युइंग कमिटी, इंडियन पग्वॉश कमिटी,
संयुक्त राष्ट्र
भारतीय सल्लागार समिती आणि आंतरराष्ट्रीय सौरविज्ञान मंडळ यांचे सदस्य होते. लंडनची
फिजिकल सोसायटी आणि केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी यांचे ते सन्मान्य सदस्य (फेलो)
होते.
विज्ञानाचे व्यावहारिक उपयोग सर्वसामान्य
जनतेपर्यंत पोहोचायला हवेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी प्रगत
तंत्रविद्येत क्षमता मिळविण्याचा ध्यास घेतला होता. या तंत्रविद्येच्या मदतीने
त्यांना देशापुढील प्रश्न सोडवावयाचे होते. यातून त्यांना देशातील वास्तव
साधनसंपत्तीचे तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन करायचे होते. त्यांनी सुरू केलेल्या
भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाला जागतिक कीर्ती लाभली आहे. विविध आंतरराष्ट्रीय
वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्घ झालेले आहेत.
साराभाई यांना अनेक मानसन्मान मिळाले होते. उदा.,
शांतिस्वरूप भटनागर
पारितोषिक (१९६३), भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब (१९६६) आणि पद्मविभूषण (१९७२; मरणोत्तर). इंटर
नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेने चंद्राच्या २१° अक्षांश व २४.७° रेखावृत्त येथील ‘बेसेल-ए’ या विवरास साराभाई हे नाव दिले आहे.
त्यांचा ब्राँझचा पुतळा इस्रोच्या बंगलोरमधील अंतरिक्षभवन या मुख्यालयात २००४
मध्ये त्यांच्या जन्मदिनी बसविण्यात आला.
साराभाई यांचे तिरुवनंतपूरम् येथे निधन झाले.
संदर्भ : 1. Bhavsar, Praful; Joshi, Padmanabh, Dr.
Vikram Sarabhai : Visionary Scientist, 2000.
2. Joshi, Padmanabh K., Ed., Vikram
Sarabhai : The Man and the Vision, 1992.
3. Sarabhai, Vikram, Science Policy
and National Development, 1974.
4. Shah, Amrita, Vikram Sarabhai : a
Life, New Delhi, 2007.
५. पटेल, प्रल्हाद सी. विराट विभूती विक्रम साराभाई, २००१.
६. मंगलदास, लीना, व्यक्तिचित्रो, १९८२.