बुधवार, २८ जानेवारी, २०१५

हे भलते अवघड असते

गाडी सुटली, रूमाल हलले, क्षणांत डोळे टचकन ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले

गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटू दे म्हंटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते

गाडी गेली, फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली, डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे, ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता अन्‌ तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते

तरी असतो पकडायाचा हातात रूमाल गुलाबी
वार्‍यावर फडकवताना पाह्यची चालती गाडी
ती खिडकितून बघणारी अन्‌ स्वत:मधे रमलेली
गजरा माळावा इतुके ती सहज अलविदा म्हणते
हे भलते अवघड असते

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू
इतक्यात म्हणे ती "माझ्या कधी गावा येशील का तू ?"
ती सहजच म्हणुनी जाते मग सहजच हळवी होते
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते‌
हे भलते अवघड असते

कळते की गेली वेळ न आता सुटणे गाठ
आपुल्याच मनातील स्वप्‍ने घेऊन मिटावी मूठ
ही मूठ उघडण्यापूर्वी चल निघुया पाऊल म्हणते
पण पाऊल निघण्यापूर्वी गाडीच अचानक निघते
हे भलते अवघड असते

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी
ओठांवर शीळ दिवाणी बेफिकीर पण थरथरती
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले
मित्रांशी हसतानाही हे दु:ख चरचरत असते
हे भलते अवघड असते




संदीप खरे

मी पप्पाचा ढापून फोन

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण ?

"आमचे नाव खेलाशेठ, डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो साजूक तूप, साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव ?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण ?

"लक्षुमबाई मी जोशांघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
वरती कपभर दूध न्‌ साय, घरात आत्ता कोनी नाय
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव ?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण ?

"मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्‍त हजार
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव ?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण ?

"ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा"

"बाप्पा बोलतोयस, तर मग थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच होता सांगत पप्पा, तिकडे आलेत आमचे अप्पा
एकतर त्यांना धाडून दे, नाही तर फोन जोडून दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
म्हणले होते जाऊ भूर्र, एकटेच गेले केवढे दूर !
Detail सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा.. बाप्पा बोला राव, सांगतो माझं नाव न्‌ गाव"

कसले नाव नि कसले गाव, राँग नंबर लागला राव !




संदीप खरे

वाटेवर काटे वेचीत चाललो

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले ओझे सुखदुःखाचे
फेकून देऊन अता परत चाललो


अनिल






तुझे नि माझे नाते काय ?

तुझे नि माझे नाते काय ?

तू देणारी मी घेणारा, मी घेणारी तू देणारा
कधी न कळते, रूप बदलते, चक्राचे आवर्तन घडते
अपुल्या मधले फरक कोणते अन्‌ अपुल्यातून समान काय ?

सुखदु:खाची होता वृष्टी, कधी हसलो कधी झालो कष्टी
सायासाविण सहजचि घडते, समेस येता टाळी पडते
कुठल्या जन्मांची लय जुळते, या मात्रांचे गणित काय ?

नात्याला या नकोच नाव, दोघांचाही एकच गाव
वेगवेगळे प्रवास तरीही, समान दोघांमधले काही
ठेच लागते एकाला का रक्‍ताळे दुसर्‍याचा पाय ?


संदीप खरे

देवा मला रोज एक अपघात कर

देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर !

कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर !

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा-दारूमध्ये कुठे असतो असर !

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, "कुठे दुखते तुला ?"
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर !

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय ? पडे जगाचा विसर !



संदीप खरे

अजून तरी रूळ सोडून

अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा
आणि अजून तरी नाही अमच्या चारित्र्यावर धब्बा

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पूर
आम्हांलाही दिसल्या शम्मा अन् शम्मेचे नूर
अजून तरी परवाना हा शम्मेपासून दूर
मैत्रिणीच्या लग्‍ना गेलो घालून काळा झब्बा

कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ओठांची नाजुक अस्त्रे वापरली हुकुमी
अन्‌ शब्दांचे जाम भरोनी पाजियले कोणी
मैखान्यातही स्मरले आम्हां मंदिर-मस्जिद-काबा

कधी गोडीने गाऊन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुळ्यावाणी
सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी
अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा

कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते
वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुनही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा


संदीप खरे

अनाम वीरा

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्‍तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !



कुसुमाग्रज