बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

या ऋतूत ...

हा ऋतू आहे फुलांचा
आणि बागेत धडाडताहेत बंदुका

कुठे आहेत त्या चिमण्या ज्या
घरट्यासाठी तृणपाती घेऊन खुळावल्यागत
धावत असतात आसमंतात...

हा ऋतू आहे गाण्याचा
आणि माझ्या घरात नाचतेय भूक
कुठे आहेत ते स्वर जे
माणसाच्या महत्तेसाठी आपल्या रक्तानिशी
हवेशी झटापट करतात...

हा ऋतू आहे
मुलांच्या मोठे होण्याचा
स्वप्ने पाहण्याचा
आणि त्यांच्या स्वप्नात सुरु होताहेत युद्ध,
कुठे आहेत ती मुले
जी युद्धरत माणसाला त्याच्या स्वप्नासह
जमिनीवर आणतील...

ऋतूंच्या विरुद्ध असं का घडत आहे
हे जाणण्यासाठी 
कवी जेव्हा जेव्हा
उभा ठाकतो
सर्वांसमक्ष
मारला जातो
मात्र
कधीच नाही मरत कविता
खरं तर
ती फक्त अनुकूल ऋतूची पुनःचित्रित प्रतिमा असते.

एका कवीच्या मृत्यूचा अर्थ आहे,
पृथ्वीवर असंख्य कवितांचा जन्म...


आत्मा ...

मी फक्त
एक देह नाही
देहाच्या पिंजऱ्यात कैद
मुक्तीच्या कामानेत लीन
आत्मा आहे,
नृत्यरत आहे निरंतर,
बांधलेले शिष्टाचाराचे घुंगरू,
परत करू शकते मी आता देवदुतालाही
माझ्या स्वर्गाची रचना
मी स्वतः करेन.

मला पर्वा नाही
कोणत्याच परिवर्तनाची,
वयाच्या बरोबरीने उद्या
पिंजरा परिवर्तीत होईल
सुरकुत्यांनी भरलेल्या
एका जर्जर अवशेषात,
पण मी उतरवून
काळाची कात,
बनेन पुन्हा
चिर-यौवना,

मी निःस्पर्श आहे
श्वासांच्या त्या स्पंदनांपासून
जी मला संमोहित करून
कैद करू पाहतेय मला
आपल्या मोहपाशात,

मी बांधून घेतलंय
चंद्र आणि सूर्याला
माझ्या पदरात,
आता ते नियंत्रित नाही करणार
माझी दिनचर्या,

आणि आकाशाची सारी टोकं  
उघडली आहेत मी
आता माझ्या भरारीमध्ये
सीमेची बाधा नाही,

विचरण करतेय मी
निरंतर ब्रह्मांडात
ओढून मुक्तीचे कवच
कारण नियम आणि अपेक्षांचे
आवरण उतरवून ठेवलंय मी
केव्हाच
कल्पवृक्षावर....

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

इच्छा...

माझी अशी इच्छा आहे की,
काही अव्यावहारिक लोकांनी ही
जरूर चर्चा करावी
कि समस्यांना कसं वाचवलं जावं
त्यांना जन्म घेऊ द्यावा
त्यांना पूर्णपणे वाढू द्यावं
उभं ठाकू द्यावं
आणि दृश्य स्वरुपात आणावं
त्यांचीही एक भाषा असावी

आणि त्याचंही कुणीतरी ऐकावं...

परिघाबाहेर...

तू बनवलेल्या या सुंदर
विहिरीमधे
माझ्या दिशांचे सर्व
कोपरे
किनाऱ्यांवर आपटून
जखमी होत आहेत.

फक्त एकदाच मला सागरास स्पर्श करायचा आहे...



आता मला ठरवू दे...

तू नेहमीच ठरवल्यास
माझ्या सीमा
माझं असणं आणि नसणं ही...

तूच ठरवलंस
माझं अंतर्बाह्य
जीवन

माझी जीवनशैली
बोलणं-चालणं
माझ्या मित्रमैत्रिणी, कुटुंबही
ठरवून टाकलंस तूच.

आता
मला ठरवू दे
कि तुला
काय ठरवायला हवं आणि काय नाही...


सहभागी

मी राहिले सहभागी
तुझ्या जीवनात,
प्रत्येक चढउतारात,
आणि तू बनलास भागीदार
त्या कारस्थानाचा
जेव्हा 
तू ठरवलीस 
माझी खरेदी विक्री....

सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

माझा प्रकाश

काही प्रकाशवर्षांपर्यंत
पोहोचत राहील
माझा प्रकाश
तुझ्यापर्यंत
तेव्हाही
जेव्हा
नाही राहणार माझं अस्तित्व.

त्या प्रकाशाला शोधत
जेव्हा
पोहोचशील इच्छित स्थळी
मी बदलले असेन
एका कृष्णविवरात.

मग
तू
नाही पोहोचू शकणार माझ्यापर्यंत
ना
परत जाऊ शकशील
कधीही

या अनंत ब्रह्मांडात....