शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

रखुमाई रुसली



सावळ्या हरीऐकू या  तरी
काय झाला रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली
चला जावू पुसायला …………

सांगा सांगा रखुमा आई
विठोबा दादानं खोड केली काही
कान धरून सांगू उठाबशा काढायला
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली
चला जावू पुसायला …………

असा कसा हा तुमचा हरी
नुसताच उभा विटेवरी
युगं लोटली कितीतरी
नाही तयार अजुनी खाली उतरायला
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली
चला जावू पुसायला …………

विठू तुमचा लेकुरवाळा
सदा भोवती गोतावळा
सारी याच्या कडेवरी
मी तरी पडणार किती पुरी
रांधून लागले हात माझे दुखायला
काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली
चला जावू पुसायला …………

कोण कुठला तो तुकोबा वाणी
त्याने काय लिहिली चार दोन गाणी
म्हणून काय हो विमान धाडायचं
फुकटात बसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली
चला जावू पुसायला …………

हा भक्तांचा कैवार घेतो
गोऱ्यासाठी चिखल होतो
जनीसाठी जातो दळण दळायला
अन पुस्ताय काय झालं रुसायला
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली
चला जावू पुसायला …………




कवी अज्ञात 

निसर्गरम्य तीर्थक्षेत्र : मार्लेश्वर



निसर्गरम्य तीर्थक्षेत्र : मार्लेश्वर


कोकणातली पावस, गणपतीपुळे, हेदवीचा गणपती अशी काही मोजकीच तीर्थस्थळं सर्वश्रुत आहेत. इथल्या छोट्या गावांमधून अनेक तीर्थस्थळंही आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर हे तीर्थस्थान आहे. शंकराचं जागृत देवस्थान म्हणून मार्लेश्वर ओळखलं जातं. संगमेश्वर बस स्थानकावरून देवरूखला जाणारा रस्ता जातो. ही वाट मार्लेश्वरलाही जाते. देवरूखपासून अवघ्या १८ कि.मीटरवर हे तीर्थस्थान आहे.
 
मार्लेश्वर शिवलिंग 
देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो.

सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगराला छोट्या आणि सपाट पायऱ्या आहेत. वृद्धानांही त्या चढताना त्रास होत नाही. वर्षभरापूर्वी मार्लेश्वरच्या डोंगराच्या पायथ्यापासून देवस्थान आणि धबधब्याला सांधणारा पूल बनवला आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं.
 
धारेश्वर धबधबा 
असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही. पावसाळ्यात डोंगर चढताना कायम पायाखाली पाहतच जावं लागतं. बरेचदा पायाखाली साप येण्याची शक्यता असते. विषारी, बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांच्या जाती इथे पाहायला मिळतात.

मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे.


मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.
मार्लेश्वरचा नयनरम्य निसर्ग 

उपेक्षितांची कैफियत तळमळीने मांडणारे संत : संत चोखामेळा



संत चोखामेळा

तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।
खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत.

संत चोखोबा हे संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत!  संत शिरोमणी नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे ते होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.

संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्र्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३ शतकात उदयाला आली म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ...

असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला. 

संत चोखोबांचे भावविश्र्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न,संवेदनक्षम,भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्‍या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम अभ्यंग अनंत भट्टहे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.

धाव घाली विठु आता। चालू नको मंद।
बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।
जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार।
बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।
आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।
ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।।
चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।
विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।

हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत.

चोखोबांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि वेदनेचा सूरही लागलेला दिसतो, जो आजही आपले अंत:करण हेलावून टाकतो.

आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।
जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।
आदि अंती अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।
चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण।।
या रचनांतून उपरोक्त उल्लेख केलेल्या भावभावना दिसात.
कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्र्वर।।

या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत चोखोबा ज्ञानेश्र्वर माउलींबद्दल प्राणसखाहा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या योजून जातात. यातून तेराव्या शतकातील या संतकवीचे साहित्यगुणही दिसून येतात.

त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग- रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला विठू पाटलाचा बलुतेदारम्हणून समजत असत.

संत चोखोबा मंगळवेढ्याचे (जिल्हा सोलापूर) होते. त्यांना उपेक्षित बांधवाच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.

गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना एका दुर्दैवी अपघातात त्यांचा अंत झाला, असे उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात आढळतात. संत नामदेवांनी त्यांच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यातून विठ्ठल विठ्ठलअसा नाद त्यांनी ऐकला. संत नामदेवांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखोबांची समाधी पंढरपूरमध्ये आहे. संत बंका (चोखोबांचे मेव्हणे) व संत नामदेव यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत -

चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तिचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।
(- संत बंका)


चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।
(-संत नामदेव)


थोर समाजसुधारक : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे



महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
(२३ एप्रिल १८७३ २ जानेवारी १९४४)
समाजशास्त्र अभ्यासणारे पहिले क्रियाशील अभ्यासक व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला अनुकूल पार्श्र्वभूमी तयार होईल असे पूरक कार्य करणारे थोर समाजसुधारक!

महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते.

जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. विठ्ठल रामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले. १८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले. मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून हिदुस्थानातील उदारधर्मया विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.

धर्मप्रचारकार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल्अ मिशन, उदारधर्मग्रंथ वाचनवर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबईबाहेरील प्रार्थनासमाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली. प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले. शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थनासमाजचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध १९१० मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले. १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. १९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.

भारतातील विविध प्रांतांत केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, अशी प्रेरणा शिंदे यांना झाली. त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते. १९०१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन, भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाया संस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९०६ मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे ह्या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे, हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला; तर उच्चवर्णियांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे, हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला. मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा अशांसारख्या भागांत त्यांच्यासाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवासदन सुरू केले. शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई-वडिल हे ह्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या. मिशनच्या स्थपनेनंतर सहा वर्षांतच एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ,१०० मुले, ५ वसतिगृहे, अन्य १२ संस्था व ७ आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांत वाढविला. १९१२ मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले. महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून, श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी अहल्याश्रमही सोयीस्कर इमारत बांधली. अस्पृश्यता निवारणकार्याचे १९२० पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले, तर विठठ्ल रामजी शिंदे हे ह्या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. १९२३ साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनीधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इ. बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती.
शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठयांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली; कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजनपक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक मुरळी प्रतिबंधक परिषदभरविली. १९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. पुणे येथे १९२८ साली भरलेल्या मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. १९२६ ते १९३२ या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.

शिंदे यांना संशोधन-लेखनाची ओढ असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर, वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्त्वपूर्ण लेखन केले. अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख आस्थाविषय होता. अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. बहिष्कृत भारत’ (१९०८), ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२), ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय. त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्वकाळापासून वर्तमानकाळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इ. विषयांचे विवेचन केले असून अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते; हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले आहे. कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर ऊहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे, हे त्यांनी दखविले आहे. भागवत धर्माचा विकासह्या लेखमालेमध्ये भक्ती या तत्त्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमानकाळापर्यंत कसकसा होत गेला, याचे विवेचन केले आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश (१९१२) या पुस्तकात प्राधान्याने धर्मपर लेख, तर पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक, शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख शिंदे लेखसंग्रह (१९६३) या पुस्तकात संग्रहीत करण्यात आले आहेत. त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासवर्णनपर, व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान (१९७९) ह्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे. शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजात (१८९८), इंग्लंडमध्ये (१९०१०३) व येरवड्याच्या तुरुंगात (१९३०) असताना लिहीलेली रोजनिशी (प्रकाशन १७७९) व माझ्या आठवणी व अनुभव (प्रकाशन १९४३; १९५८) हे पुस्तक त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे. या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष प्रत्ययाला येतात.

अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा कर्मवीरतसेच महर्षीया उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांचे पुणे येथे निधन झाले.

संदर्भ :
१. कदम, शंकरराव; मुलाटे, उषा; महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, औरंगाबाद, २०००.
२. चव्हाण, रा. ना. महर्षी शिंदे यांच्या आठवणी, वाई, १९७५.
३. दिघे, पी. डी. दोन कर्मवीर, कोल्हापूर, १९९२.
४. पवार, गो. मा. विठठ्ल रामजी शिंदे, नवी दिल्ली, १९९०,

५. बाबर, कृ. भा. कर्मवीर विद्यार्थी, भिलवडी १९३०.

गुरुवार, १ जानेवारी, २०१५

वर्षासर...

रिमझिम वर्षासरी
मेघ घेऊन हे आले,
मन तृप्त माझे
चिंब पावसात न्हाले...
काळ्या आभाळी भरला
मातीचा रंग ओला,
भग्न धरीत्रीच्या संगे
देह माझा सुखावला ...
हिरव्या रंगात नटले
पर्वतराज दूरवर,
गार वाऱ्यासंगे आली
पावसाची मुग्ध सर ...
पाचोळा गिरक्या घेत
दूर उडून चालला,
कुणी तृषार्त चातक
अमृतरस प्याला ...
काळे मेघ हे दाटले
आज आकाशा अंगणी,
दारातल्या पाण्यासंगे

उभे डोळ्यातही पाणी ...

बिकट वाट वहिवाट


बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट
मार्गा सोडु नको
संसारामधि ऐसा आपला, उगाच भटकत
फिरुं नको
चल सालसपण धरुनी निखालस,
खोट्या बोला बोलुं नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर
धरुं नको
नास्तिकपणि तूं शिरुनी जनाचा, बोल
आपणा घेऊ नको
आल्या अतिथा मुठभर
द्याया मागेंपुढतीं पाहुं नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारामंधी फसूं नको
कधीं रिकामा बसूं नको
परी उलाढाली भलभलत्या,
पोटासाठी करुं नको ॥१॥
वर्म काढुनी शरमायाला, उणे
कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्याचा ठेवा, करुनी हेवा, झटूं
नको
मी मोठा शहाणा, धनाढ्यही, गर्वभार
हा वाहुं नको
एकाहुनी चढ एक जगामंधी,
थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गोरगरीबांला तूं
गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपेश
माथा घेउ नको
उणी तराजू तोलू नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन
राहुं नको ॥२॥
उगीच निंदा स्तुती कुणाची,
स्वहितासाठी करुं नको
बरी खुशामत शाहण्याची,
परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजी-भाकरी, तूपसाखरे
चोरुं नको
दिली स्थिती देवाने तींतच मानी सुख,
कधिं विटूं नको
असल्या गांठी धनसंचय, कर
सत्कार्यी व्यय, हटूं नको
आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं
टाकू नको
सुविचारा कातरुं नको
सत्संगत अंतरुं नको
द्वैताला अनुसरुं नको
हरिभजना विस्मरुं नको
सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग
शंकाच नको ॥३॥
कवी - अनंतफंदी (अनंत
भवानीबावा घोलप)

पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ : डॉ. रघुनाथ माशेलकर



डॉ. रघुनाथ माशेलकर

(जन्म : १ जानेवारी १९४३)

भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि
पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त - शास्त्रज्ञ!

भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे.
माशेल (गोवा) येथे रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म झाला. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. गिरगांव चौपाटीवर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून त्यांनी अनेक शिष्यवृत्ती मिळवल्या. १९६६ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली.काही काळ युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड (लंडन) येथे व्याख्याता म्हणून काम केले. पुढे त्यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले.

त्यानंतर, अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी - एन.सी.एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) येथे संचालक म्हणून नेमणूक झाली. डॉ. माशेलकरांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अनेक शोध अमेरिका व युरोपमध्ये निर्यात होत आहेत. पॉलिमर सायन्स व अभियांत्रिकी ही त्यांची अभ्यासाची अन् संशोधनाची क्षेत्रे होत.

सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे महासंचालक झाल्यानंतर त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून देशाची प्रगती ह्या सूत्रावर भर दिला. या संस्थेच्या अनेक शाखा त्यांनी कार्यान्वित केल्या, तसेच या माध्यमातून त्यांनी असंख्य संशोधक तयार केले. बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीचे (पेटंट) धोरण याबाबत त्यांचे योगदान मोठे आहे.  ‘Patent or Perish’ असा इशाराच त्यांनी दिला होता.  हळद, बासमती व कडुलिंब यांच्या पेटन्ट्सबाबतचा लढा यशस्वीपणे लढून त्यांनी अमेरिकेकडून ही पेटन्ट्स परत मिळवली.  व्यवसायाभिमुख संशोधनया तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ज्ञान ही संपत्ती आहे ,तसेच ज्ञानातून  संपत्ती निर्माण होते’, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. डॉ. माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सुमारे २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. माशेलकर यांना पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मभूषण, पद्मश्री तसेच शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड हे त्यांपैकी काही होत. तसेच लंडन येथील जगद्विख्यात रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली.

अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. आजही ते कष्ट करण्याची क्षमता, शिस्त, बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, नेतृत्वगुण व प्रखर देशनिष्ठा या आपल्या गुणांसह- विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.