सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

आस निरसली गोविंदाचे भेटी

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देउनि चपळा हाती गुढी ॥२॥
हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥
आरंधी पडिली होती तया घरी । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाही निद्रा डोळा । रूप वेळोवेळा आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधी ठावा तया नाही कोणा ॥६॥
आधी चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचये ॥७॥

आला त्यांचा भाव देवाचिया मना

आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणासाठी होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधी ॥२॥
आधी पाठीमोरी जाली तीसकळे । मग या गोपाळे बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणे जाऊनि पाताळा । जागविले काळा भुजंगासी ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरी । निर्भर अंतरी गर्वनिधी ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचे ॥६॥
चेंडुवाचे मिसे काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हे ॥७॥

आम्ही हरिचे सवंगडे

आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे । 
हाती धरुनी कडे । पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

निद्रा करिता होतो पायी । सवे चि लंका घेतली तई ।
वानरे गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥२॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण। 
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥३॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

आम्ही वैकुंठवासी

आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी । 
बोलिले जे ॠषी । साच भावे वर्तावया ॥१॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । 
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
 
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।
 विषयलोभी मन । साधने बुडविली ॥२॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । 
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
 
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
 तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ॥३॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । 
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥

आपुलाल्यापरी करितील सेवा

आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥
खेळ मांडियेला यमुने पाबळी । या रे चेंडुफळी खेळू आता ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वाटी गडिया गडी ॥३॥
गडी जव पाहे आपणासमान । नाही नारायण म्हणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदे सकळांचा भाव । तयांसी उपाव तो चि सांगे ॥५॥
सांगे सकळांसी व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुती हाल माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । न वजा बरळ एकमेका ॥८॥
एका समतुके अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा । आपण निराळा एकला चि ॥१०॥
चिंतूनिया चेंडू हाणे ऊर्ध्वमुखे । ठेली सकळिक पाहात चि ॥११॥
पाहात चि ठेली न चलता काही । येरू लवलाही म्हणे धरा ॥१२॥
धरावा तयाने त्याचे बळ ज्यासि । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुध्दि नाही त्याचे । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥
विचारी पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागे ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनिया ॥१७॥
या मागे जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठाया ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तया मागे त्याचे ते चि हाल ॥१९॥
हाल दोघा एक मोहरा मागिला । चालता चुकला वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालता न कळे । मागिलांनी डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाही । समान तो देही बाळकांसी ॥२२॥
सिकविले हित नायिके जो कानी । त्यामागे भल्यांनी जाऊ नये ॥२३॥
नये ते चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥
रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडूनिया मारितील हाका । कळले नायका वैकुंठीच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानी । सोयी चक्रपाणि पालविले ॥२८॥
साया धरूनिया आले हरिपासी । लहान थोरांसी सांभाळिले ॥२९॥
सांभाळिले तुका म्हणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखे॥३०॥

तुकाराम 

अवघी भूते साम्या आली

अवघी भूते साम्या आली देखिली म्या कै होती॥१॥
विश्वास तो खरा मग पांडुरंगकृपेचा ॥धृ॥

माझी कोणी धरो शंका हो का लोका निर्द्वंद्व ॥२॥

विश्वास तो खरा मग पांडुरंगकृपेचा ॥धृ॥

तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे ॥३॥

विश्वास तो खरा मग पांडुरंगकृपेचा ॥धृ॥

तुकाराम 

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

असेच काही अवांतर १


इयत्ता सहावीत असताना पहिल्यांदाच इतिहासाच्या पुस्तकात कैलास मंदिराचं चित्र पाहिलं होतं. तेव्हापासून मनात वेरुळच्या लेण्या पाहण्याची इच्छा होती.आणि जेव्हा ही इच्छा पूर्ण झाली तेव्हा मात्र आनंदापेक्षा अस्वस्थताच जास्त जाणवली. हजाराहून अधिक प्राचीन असलेल्या त्या लेण्यांतील तथागताच्या चेहऱ्यावर प्रेम, करुणा, शांती दिसलीच नाही मला. काहीशा चिंतेतच तथागत ओढीत होते हातातली जपमाळ. अन् स्तुपातला काळोख अधिकच गडद होत चालला होता. खोदलेले मोठे चौकोनी खांब अन् त्यावर अपुरी राहिलेली शिल्पे पाहताना नकळत त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न मनात सुरु झाला. लेण्यांतला काळोख पडदा झाला. अन् त्यावर सुरु झाला भूतकाळाचा कल्पित चित्रपट. छिन्नी-हातोड्याचे नाजूक घाव घालत पाषाणातून आकार घेत गेलेली शिल्पे, विविध रूपे घेत जगाला शांतीचा संदेश देणारे बोधिसत्त्व, जातक कथा त्या एकसंध पाषाणातून चित्रित होत होत्या. बुद्धं शरणं गच्छामि म्हणत साधना करणारे भिक्षू, पिढ्यानपिढ्या खर्चून ते अप्रतिम शिल्प साकारणारे ते अज्ञात शिल्पकार कुठे अदृश्य झाले? काय झालं त्याचं? कठोर पाषाणाचे स्तंभ बनवून झाले होते. मग त्यावर शिल्प कोरण्याआधीच कुठे निघून गेले ते? काय कारण असावं? एखादा भूकंप झाला असेल का? की एखादा प्रलयंकारी पूर आला असेल? की धारेच हृदय आटवणारा एखादा दुष्काळ पडला असेल? पण एवढे शिल्पकार, एवढे भिक्षू सारेच कसे एखाद्या नैसर्गिक आपत्तीत परागंदा होऊ शकतील? असं काही घडलंच असतं तरी आपत्ती सरल्यानंतर त्या शिल्पकरांनी परत येऊन आपलं अधुरं काम पूर्ण केलंच असतं ना? आपल्या पूर्वजांनी एवढ्या कष्टाने, आस्थेने आणि समर्पित वृत्तीने निर्मिलेल्या या कलाकृतींना का बरं असं अपूर्ण ठेवलं गेलं? की काळानेच अशी काही कोलांटी घेतली होती की हे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे कुणाचेही धाडस झाले नाही? असंख्य अनुत्तरीत प्रश्न मन विलक्षण सुन्न करून गेले. चिंतामग्न भासणारा तथागतांचा चेहरा आणखीनच करून वाटायला लागला. सभोवतालचा अंधार अधिकच गडद होऊ लागला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार साऱ्या भारतवर्षातच नव्हे तर श्रीलंका, कंबोडिया, जावा-सुमात्रा द्वीपसमूह, ब्रह्मदेश या नजीकच्या देशातही केला. कर्मकांडाचे, वर्णव्यवस्थेचे प्रस्थ मोडीत काढले. माणसाला माणसासारखे जगण्याचे बळ दिले. प्रेम, शांती, करुणेचा संदेश आणि बोधीसत्त्वाचे तत्त्वज्ञान भारताची ओळख बनले होते. अन् त्याचवेळी मौर्य राजवंशातील अखेरचा सम्राट राजा बृहद्रथ याची त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने याने वसंतोत्सवाच्या उत्सवात केलेली निर्घृण हत्या केली. त्यानंतर मगधच्या साम्राज्याचा ताबा घेत केलेला अश्वमेध, आणि त्याबरोबरच तथागतांच्या प्रेमाच्या, सहिष्णुतेच्या आणि करुणेच्या शिकवणुकीपुढे निष्प्रभ झालेल्या वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन यांसाठी केलेले बौद्ध भिक्षूंचे शिरकाण. सारंच मन हेलावून टाकणारं. कडे-कपाऱ्यांतून साधना करणाऱ्या बौद्ध भिक्षुंना शोधून त्यांची केलेली हत्या प्राचीन भारताच्या इतिहासातलं एक काळे-कुट्ट पर्व आहे. असंच काहीतरी घडलं नसेल ना? या वेरुळच्या अपूर्ण लेण्या, ते अज्ञात शिल्पकार आणि त्या अपूर्णतेमधलं अनाकलनीय गूढ. या साऱ्यांची उत्तरं इतिहासाच्या पुनर्रचनेतूनच शोधावी लागतील. आपल्या धर्माचे वर्चस्व वाढवण्यासाठी नेहमीच एका धर्माने दुसऱ्या धर्मावर हल्ला चढवत रक्तपात केल्याचे दाखले इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात पाहायला मिळतात. आणि याला कोणताच धर्म अपवाद नाही. खेदाची बाब म्हणजे मध्य आशियात माजलेले अराजक, चाललेली युद्धे, होणारा रक्तपात आणि प्रबळ होत जाणाऱ्या धर्मांध शक्ती हा सारा उलटा प्रवास आपण सुरु केला आहे. महत्त्वाचे म्हणजे याची पुरेशी जाणीवही आपल्याला नाही. बदलत्या काळाची साद ऐकत विज्ञाननिष्ठेची कास धरून पुढे जाण्याऐवजी आपण जात, धर्म, वंश. प्रदेश यांच्या नावाखाली विभागले जातोय. स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी इतरांचा उपमर्द करतोय. धर्मसुधारणेची गरज असताना धर्मांधतेला खतपाणी घालतोय. आणि हे सारं आपल्या पाषाण नेत्रांनी पाहणारे तथागत म्हणूनच कदाचित इतके उदास आहेत, चिंतामग्न आहेत. साऱ्या जगभरातून लोप पावलेली आपली प्रेम, दया, शांतीची शिकवण शोधू पाहताहेत तथागत. शेकडो वर्षांच्या इतिहासात धर्माच्या नावावर झालेल्या हत्याकांडात बळी पडलेल्या लाखो निरपराधांचे रक्त वाहतंय तथागतांच्या डोळ्यातून अश्रू बनून, आणि आजही त्यांचा स्थितप्रज्ञ चेहरा देऊ पाहतोय सहिष्णुतेचा संदेश. आता गरज आहे फक्त तो संदेश समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची.