कर्नाटक
राज्यातील होयसळ कला-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले हसन जिल्ह्यातील एक प्रसिद्ध
ऐतिहासिक पर्यटन स्थळ. ते बेलूर तालुक्यात बेलूरच्या पूर्वेस सु. १७ किमी. व
हसनच्या उत्तरेस सु. २७ किमी.वर वसले आहे. याचे मूळ नाव हळ्ळेबीडू असे होते.
मध्ययुगात बहुतेक होयसळ राजांची (इ. स. १०२२–१३४२) येथे राजधानी
होती. तिचा नामोल्लेख दोरसमुद्र, द्वारवती, द्वारसमुद्र इ.
भिन्न नावांनी आढळतो. मलिक कफूरने इ. स. १३११ मध्ये ही राजधानी जिंकली आणि पुढे
मुसलमानी आक्रमणात हे शहर उद्ध्वस्त झाले. होयसळ वंशातील राजे कलाभिज्ञ होते.
त्यांनी हिंदू-जैन या धर्मांना राजाश्रय दिला आणि उत्तर चालुक्यशैलीतील मंदिरे
बांधली. यांपैकी हळेबीड येथील होयसळेश्वर मंदिर हे या शैलीतील आकाराने सर्वांत
मोठे आणि मूर्तिशिल्पांनी भरगच्च अलंकृत केलेले आहे. तसेच येथील केदारेश्वर मंदिर
लहान आहे; तथापि कलात्मक दृष्ट्या ते सर्व होयसळ मंदिरांत
कदाचित श्रेष्ठ ठरेल.
|
नृत्यमग्न गणेश |
होयसळेश्वराचे
मंदिर बिट्टिदेव ऊर्फ विष्णुवर्धन (कार. १११०–५२) याने साधारणतः
इ. स. ११४१–५० दरम्यान बांधले असावे,असे
तज्ज्ञांचे मत आहे. हे मंदिर
द्विकूट (दोन गर्भगृहे) पद्धतीचे जुळे मंदिर असून
सुरुवातीस होयसळेश्वर व त्याच्या शेजारी शांतलेश्वर अशी दोन स्वतंत्रमंदिरे होती.
यांचे मंडप जोडून ती एक केली गेली. या दोहोंची मिळूनलांबी ४५.५ मी., रुंदी
३६ मी. आणि कपोतापर्यंतची उंची ७.५ मी.आहे. याचे शिखर अस्तित्वात
नाही, मात्र मंदिराला पूर्वेस दोन आणि दक्षिणोत्तर
प्रत्येकी एक अशी चार प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचे विधान तारकाकृती
वा नक्षत्राकृती असून छायाप्रकाशाचा परिणाम साधण्यासाठी भिंतींची मांडणी स्वाभाविकच
बहुकोनांकित केलेली आहे. या परिसरा-तील स्थानिक खाणींमध्ये उपलब्ध असलेला मऊ
शंखजिरे (सोपस्टोन )हा दगड बांधकाम व कोरीव कामासाठी वापरलेला असून या
दगडाचेवैशिष्ट्य म्हणजे तो खाणीतून काढतेवेळी अतिशय मृदू असतो व वातावरणाच्या
साहचर्याने हळूहळू कठीण होत जातो. या गुणामुळेहोयसळ कलाकारांना अतिशय नाजूक व
बारीक कलाकुसर करणे शक्य झाले. केदारेश्वर हे येथील कालौघात पडझड झालेले दुसरे
मंदिर. ते त्रिकूट (तीन गर्भगृहे) पद्धतीचे असून दुसरा बल्लाळ (कार. ११७३–१२२०)
आणि त्याची कनिष्ठ राणी अभिनव केतलदेवी यांनी १२१९ मध्ये बांधल्याचा उल्लेख
शिलालेखात मिळतो. ते सोमनाथपूरच्या चेन्नकेशव मंदिराप्रमाणेच असून कलात्मक
दृष्ट्या होयसळ वास्तुशिल्पशैलीतील माणिक मानण्यात येते. होयसळ मंदिरांतील विमान
(शिखर) व त्यांची रचना, त्यांचे निरनिराळेघटक , स्तंभ
ही सर्व अंगे प्रामुख्याने द्रविड वास्तुशैलीची मानली जातात; परंतु
यांमध्ये अर्धस्तंभ व गोष्टपाञ्जर यांवर
शिखरांच्या ज्या लहान प्रतिकृती आहेत, त्या
नागर वा इंडो-आर्यन शैलीचे घटक मानले जातात. तसेच मंदिराच्या पायऱ्यांच्या दोहो
बाजूंस ज्या छोट्या देवळ्या आहेत, त्यांवरील शिखरे नागर – विशेषतः
माळव्यातील भूमिज – या उपशैलीची आहेत; मात्र या मंदिरात
उंचीची झेप नाही, म्हणून
या मिश्रशैलीस उत्तरचालुक्य-होयसळशैली असे संबोधितात.
|
शिव पार्वती |
मंदिराच्या विधानात
गर्भगृह, अन्तराळ, मंडप (नवरंग) आणि
मुखमंडप किंवा भद्र हे मुख्य घटक असून त्यांची
रचना चौथरा(पीठ) यावर केली आहे. पायऱ्यांच्या दोन्ही
बाजूंना छोट्या देवळ्या आहेत आणि समोर दोन स्वतंत्र नंदीमंडप आहेत. त्यांतील
नंदींच्या बैठ्या मूर्ती अनुक्रमे चार व दोनमी. उंचीच्या आहेत. येथील द्वारशाखा
अलंकृत असून चतुर्भुज द्वारपाल अत्यंत प्रेक्षणीय आहेत. ते नखशिखान्त अलंकृत असून
त्यांच्या मस्तकी उभट किरीट आहेत. त्यांच्या भालप्रदेशी तिसरा नेत्र आहे. त्यावरून
ते शिवगणांपैकी वाटतात. वर्तुळाकार आणि अनेक प्रकारच्या
कंगोऱ्यांनी अलंकृत केलेले स्तंभ , मनोहर दगडी जाळ्या
आणि दागिन्यांनी अलंकृत अशी अनेक स्त्री-पुरुषांची शिल्पे ही होयसळ मंदिराची
वैशिष्ट्ये येथेदृग्गोचर होतात.
पीठावर
खाली गजथर, त्यावर अश्वथर, कीर्तिमुख, शार्दूलथर, नरथर, व्यालथर, हंसथर
इत्यादींची रचना असून दोन थरांमध्ये एक खोल पट्टी आहे. त्यामुळे प्रत्येक
शिल्पपट्ट्याला आखून देणारी छायेची काळी पट्टीच तयार होते. यांतून लतांचाहीथर कल्पकतेने
योजलेला आहे. यातील गजथरात सु. दोन हजार हत्ती भिन्न ढंगांमध्ये आढळतात. या
स्तराचीलांबी २१३ मी. आहे. यात छायाप्रकाशाची योजना अप्रतिमपणे केलेली आहे. जंघेवर
वा भिंतीवर कोनाड्यांत अथवा नुसत्या भिंतीवर तीरशिल्पात देवदेवता, देवांगना, सुरसुंदरी, यक्षी, मदनिका
यांच्या मूर्ती आहेत. यांच्याही वर गोष्टपाञ्जर-अर्धस्तंभ इ. रूपके येतात.
केदारेश्वर मंदिरातील शरपंजरी भीष्म आणि राम व कांचनमृग ही शिल्पे महाभारत
-रामायणा तील कथा-विशेषांत अधिक बोलकी व लक्षवेधक आहेत. यातील दक्षिणेकडील
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंत पावणेदोन मीटर उंचीच्या द्वारपालिका आहेत. या
द्वारपालिका त्रिनेत्रयुक्त, सुळे स्पष्ट दाखविणाऱ्या, जटामुकुटधारी
आणि हातांत डमरू, नाग आणि चेतवलेला अग्नी घेतलेल्या असून अनेक
दागिने ल्यालेल्या आहेत. या द्वाराच्या गणेशपट्टीवर विविध शिल्पे, अंधकासुरावर
नृत्य करणारा शिव, नंदी, मकर-हंस आणि फुले, गंधर्व, सप्तमातृका, दिक्पाल, सिंह व
सैनिक असून उत्कीर्ण लेखात कलदासी या शिल्प-काराचे नाव दिलेले आहे. त्याने
केदारोजई याच्यासाठी ही शिल्पयुक्त गणेशपट्टी तयार केली असे नमूद केले आहे. होयसळ
नरेश पहिला नरसिंह (११५२–७३) याचा केदारोजई हा प्रमुख स्थपती होता.
|
स्तंभावरील नक्षीकाम |
होयसळेश्वर
मंदिरावर असंख्य शिल्पे, शिल्पपट, कथापट, पौराणिक
प्रसंग, शिव आणि विष्णू यांची कर्तृत्वदर्शक शिल्पे
त्याचप्रमाणे यक्षी, नृत्यांगना, विषकन्या यांचेही
शिल्पांकन आहे. एका पट्टीत देखाव्यामागून देखावे मांडलेले आढळतात. प्रारंभी भैरव, गण व
मृदंगधारी गायकदिसतात. पुढे समुद्रमंथनाचा प्रसंग आहे. त्यानंतर नर्तकांचा ताफा , ईशान्येच्या
बाजूस कृष्णलीला कोरल्या आहेत, तर दक्षिणेला महाभारत कथा साकार झालेली
आहे. येथील मोठ्या शिल्पांत वीणाधारी सरस्वती,अर्जुनाचा मत्स्यभेद, ऐरावतावरील
इंद्र-इंद्राणी, गजचर्मावर नृत्य करणारा शिव इ. शिल्पांचा अंतर्भाव होतो.
यांशिवाय वाली-सुग्रीव युद्ध, किराता-र्जुनीय, चक्रव्यूहात
अडकलेला अभिमन्यू , दिक्पाल, नृत्यगणेश, ब्रह्म, भैरव, गजासुरमर्दन,वेणुगोपाल, गजेंद्रमोक्ष, त्रिविक्रम, गोवर्धन-गिरिधारी, कैलास
हलविणारा रावण, विष्णु-लक्ष्मी आलिंगन मूर्ती, गरुड
आणिनाग , नृसिंह, वामन आणि सूर्य अशा
विविध देवतांची शिल्पे आहेत. मुकुट , कर्णभूषणे, गळ्यातील
विविध माला व हार,कंकणे, कमरपट्टे, बाजूबंद, तोडे, पैंजण
इ. अलंकारांची येथे खैरात आहे. त्यामुळे अनेक वेळा मूळ मूर्तीचे सौष्ठव व सौंदर्य
झाकले जाते.
|
स्तंभावरील नक्षीकाम |
येथील
मूर्तिकामात अलंकारांची रेलचेल, बुटकेपणा आणि दाट कलाकुसर आढळते. त्यामुळे
मूर्तीतील लालित्य लोप पावले आहे. प्रत्येक मोठ्या मूर्तीखाली शिल्पांची नावेही
आहेत. रूपण कलेतील लहान-मोठ्या मूर्तींची उधळण यांचा विचार केला
असता, हळेबीडची मंदिरे भारतीय वास्तुशिल्पकलेतील
परमावधीचा उच्च बिंदू वाटतात; मात्र त्यांतील संयोजनात समन्वय साधला
गेलेला नाही. त्यामुळे होयसळ मूर्तिकार हे उत्तम कारागीर होते; पण
कलाकार नव्हते, असेच म्हणावे लागते.
या दोन
मंदिरांव्यतिरिक्त इ. स. १२२० मध्ये बांधलेले वीरभद्र मंदिर तेथील होयसळ
घराण्याच्या बोधचिन्हाच्या भव्य शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. खड्गधारी शाल पुरुष आणि
भव्य व्याघ्र लक्षणीय असून शाल अत्यंत शांत व धीरोदात्त भासतो.
|
स्तंभावरील नक्षीकाम |
हळेबीडपासून
पाऊण किमी.वर बस्तीहळ्ळी नावाचे एक स्थान आहे. त्या ठिकाणी तीन जैन बस्त्या असून
त्यांतील पार्श्वनाथ बस्ती गोलाकार आणि अत्यंत गुळगुळीत
आरसपानी स्तंभांकरिता प्रसिद्ध आहे. तिच्यातील काळ्या वालुकाश्मात घडविलेली
पार्श्वनाथाची मूर्ती सु. चार मी. उंच आहे. मधल्या बस्तीत आदिनाथ आणि शेवटच्या
बस्तीत शांतिनाथ यांच्या मूर्ती आहेत. होयसळांच्या राज्यात राजघराण्यातील
स्त्री-पुरुषांनी व त्यांच्या मंत्र्यांनी बांधलेल्या सु. ७२० जैन बस्त्या
असल्याचे उल्लेख आढळतात. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे येथे एक
पुराणवस्तुसंग्रहालय (१९६१) असून त्यात परिसरातील भग्न मंदिरांचे अवशेष जतन
केले आहेत. याशिवाय ब्राँझ व काष्ठशिल्पे, भूर्जपत्रे, प्राचीन
हस्तलिखिते, नाणी, ताम्रपट व काही
शिलालेख यात असून या संग्रहालयातील नृत्यगणेश, ध्यानमग्न सरस्वती, दुर्गा, महिषमर्दिनी, तांडवनृत्य
करणारा शिव अशी काही शिल्पे लक्षणीय आहेत. येथील संग्रहालय प्रसिद्ध असून त्यात
पुरातत्त्वविद्या व वस्तुसंग्रहालयशास्त्रविषयक सुसज्ज ग्रंथालय आहे.शहरात शासकीय
उच्च माध्यमिक विद्यालय आहे. येथे शासकीय विश्रामधाम तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी
शासनाने हॉलिडे होम्ससारख्या अनेक सोयी केल्या असून शहरात हॉटेल व्यवसायही वाढत
आहे.
संदर्भ :
1. Anand,
Mulk Raj, Ed. Marg, Vol. XXXI No. 1 : In Praise of Hoysal Art,
Bombay, 1977.
2. Brown,
Percy, Indian Architecture (Buddhist and Hindu Period), Delhi, 1963.
3. Fergusson,
James, History of Indian and Eastern Architecture, Delhi, 1967.
4. Hukkerikar,
R. S. Karnataka Darshana, Banglore, 1995.
५. देशपांडे, सु. र.
भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.