शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

नको नको रे पावसा


नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्र्मौळी
आणि दारात सायली;
नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?
नको करु झोंबाझोंबी
माझी नाजुक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;
आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;
किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऎक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;
वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा,कडाडून
मागे फिरव पंथस्थ;
आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी बोलेन;
पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;
नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्र्मौळी
आणि दारात सायली…..


इंदिरा संत

गवतफुला


रंगरंगुल्या,सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरुन गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरुन शाळा,घर सारे.


इंदिरा संत

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्यांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे. गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.

पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

आधीं रचिली पंढरी ।



आधीं रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥

जेव्हां नव्हतें चराचर ।
तेव्हां होतें पंढरपुर ॥२॥

जेव्हां नव्हती गोदा गंगा ।
तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥

चंद्रभागेचे तटीं ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥

नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥

असे सुदर्शनावरी ।
ह्मणूनि अविनाशी पंढरी ॥६॥

नामा ह्मणे बा श्रीहरी ।
आह्मी नाचु पंढरपुरी ॥७॥

रचना - संत नामदेव
संगीत - अण्णा जोशी
स्वर   - मन्‍ना डे

          

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा ।



अमृताहुनि गोड नाम तुझें देवा ।
मन माझें केशवा कां बा नेघे ॥१॥

सांग पंढरिराया काय करुं यासी ।
कां रूप ध्यानासि नये तुझें ॥२॥

किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें ।
मन माझें गुंतलें विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति ।
नये माझ्या चित्तीं नामा ह्मणे ॥४॥

रचना - संत नामदेव
संगीत - बाळ माटे
स्वर   - माणिक वर्मा   

राग    - भीमपलास

अच्युता अनंता श्रीधरा माधवा ।

अच्युता अनंता श्रीधरा माधवा ।
देवा आदि देवा पांडुरंगा ॥१॥

कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना ।
तूंचि नारायणा नामधारी ॥२॥

मुकुंदा मुरारी प्रद्युम्‍ना केशवा ।
नाम सदाशिवा शांतरूपा ॥३॥

रूपातीत हरी दाखवीं सगुण
निरंतर ध्यान करी नामा ॥४॥

रचना - संत नामदेव
संगीत -
स्वर   - सुरेश हळदणकर
         

राग    - भैरवी

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार

जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार ।
तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥

जनक हा जगाचा जिवलग साचा ।
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥

नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥

निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण ।
विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥

रचना - संत निवृत्तीनाथ
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर   - पं. जितेंद्र अभिषेकी